आपल्या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर देशोदेशी धर्माची दुकानं फोफावली आहेत. आपल्या देशात या धर्माच्या दुकानदारीवर किमान दोन कोटी लोकांचं पोट भरतं असा अंदाज आहे. त्यासाठी मंदिरं, मशिदी, चर्चेस किंवा गुरुद्वारा यासारख्या संस्था काढून त्यांचा वापर शाखांसारखा केला जातो. दहीहंडी ही त्याच प्रकारची एक शाखा आहे. मुंबई शहरात साजरी केली जाणारी दहीहंडी हा प्रकार इतरत्र कुठेही आढळत नाही. स्वतःला हिंदू म्हणवून घेणार्या जनसमूहाला दहीहंडीची ओळख नाही. कृष्ण या पौराणिक व्यक्तिमत्त्वाचा जन्म जिथे झाला असं मानलं जातं त्या मथुरेतही दहीहंडी साजरी केली जात नाही. स्वतःला कृष्णाच्या जातीचे असल्याचे दावा करणारे यादवही कृष्णजन्माष्टमीचा सोहळा दहीहंडी फोडून करत नाहीत.

मुंबई शहरात गिरण्यांमध्ये काम करून पोट भरण्यासाठी आलेल्या कोकणातील कष्टकर्यांनी स्वतःच्या करमणुकीसाठी शोधून काढलेला हा प्रकार कालपरवापर्यंत गल्लीबोळातील पोराटोरांचा गमतीचा खेळ होता. त्याला गल्लीतील दादांनी ताब्यात घेतलं आणि त्यात व्यायामशाळा आणल्या. लाठीकाठी दांडपट्टा, बोथाटीचे क्रीडाप्रकार दाखवून आपल्या अंगातील क्रीडानैपुण्य दाखवण्याची ही संधी घेण्यासाठी कोकणी बाले वर्षभर मेहनत करत असत. गल्लीच्या दादांनी या खेळातील चपळाईने खेळ करणार्या पोरांना जवळ केलं ते त्यांच्याकडे असलेल्या तलवार-जांबियाच्या वापरातील कौशल्यासाठी. यात कुलाबा म्हणजे आताचा रायगड तेव्हाचा रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यातील पोरं तरबेज होती. गिरण्या बंद पडल्यावर मुंबईत येणार्या या पोरांना असलेला गिरणबाबूंचा आधार तुटला. ते हाजी मस्तान, रमा नाईक, छोटा राजन, गुरू साटम, मन्या सुर्वे, गवळी, दाऊद, अमर नाईक आणि तत्सम लोकांची नावं आदराने घेऊ लागले आणि त्यांच्या हाती कट्टे आले. पहाता पहाता त्यातील हुशार आणि धोरणी म्होरके राजकारणाच्या वाटा धुंडाळू लागले. त्यातून सचिन भाऊ अहिरचा जन्म झाला. त्याने मुंबईत दहीहंडीला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्याला नुकत्याच जन्माला आलेल्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची साथ लाभली, राजीव के. बजाज नावाच्या संधीच्या शोधात असलेल्या तथाकथित पत्रकाराने त्याच्या हंडीला दिवसभराची प्रसिद्धी दिली. त्यातून स्फूर्ती घेऊन मग जितेंद्र आव्हाड, त्यांचा तत्कालीन सहकारी प्रताप सरनाईक, त्याच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे यांनी आपापला वाटा उचलायला सुरुवात केली. रवींद्र फाटक, संजय निरुपम हे शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले राजकीय नेते आपलं पूर्वायुष्य विसरू शकत नसल्याने त्यात सामील झाले.

राम कदम नावाच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमदाराने तर या रस्त्याचा राजमार्ग केला आणि त्याचा वापर करून थेट विधानसभा गाठली. त्याने दहीहंडीची दुकानदारी एवढी प्रभावीपणे राबवली की आता या पुढे सोडू म्हटलं तरी सचिनभाऊला आता दहीहंडीला सोडचिठ्ठी देता येणार नाही. राम कदम यांनी यावर्षी आपल्या दहीहंडीची शोभायात्रा काढली. राम कदमने आपल्या हंडीची जाहीर पूजा केली. दिवसभर जिथे दहीहंडी बांधायची त्या जागी भजन करणारी मंडळी बसवली. हे सारं डिजेच्या तालावर केलं. त्यांना धर्मरक्षक पोलिसांची साथ होती. राम कदम प्रसिद्धीच्या आणि लोकप्रियतेच्या लाटेवर दिवसभर आरूढ होते. चॅनेलवाले दिवसभराचा फुकटचा कंटेंट दाखवून आपली वेळ भरण्याचा उद्योग इमानदारीत करत होते. त्यांना लोकांच्या उत्साहाचा, धर्मपरायणतेचा पुळका आलेला होता.

या सार्या प्रकारासाठी लागणारे पैसे स्वतः राजकारणी लोकांनी खर्च केले असं कुणालाही खरं वाटणार नही. कारण तो त्यांनी ज्यांच्याकडून उभा केला त्यांचे हितसंबंध जपण्याचं काम हे राजकीय नेते चोखपणे करत असतात. किमान दोनशे कोटी रुपयांची उलाढाल यानिमित्ताने झाली. प्रचार झाला तो झालाच. घराघरात चर्चाही झाली.

६०० पेक्षा जास्त गोविंदा जखमी झाले. त्यांना कोणीही वाली नाही. त्यातील किती कायमस्वरूपी पंगू होतील याची गिनती नाही. मालाडला स्टेशनच्या जवळ त्रिवेणी नगरातील एक सात वर्षांची मुलगी मानवी मनोर्यावरून पडली. तिला पकडायला कुणीही नव्हतं. ती जागीच मृत्यू पावली. तिची बातमीही आली नाही. त्या हंडीला लावलेलं बक्षिस खूपच कमी रकमेचं होतं. तिथे इलेक्ट्रॉनिक मीडिया नव्हता. पडणार्या, मोडणार्या, मरणार्या आणि पंगू होणार्या गोविंदांना विचारणारं कोणीही नाही. एका चॅनेलने अशा दहीहंडीत मेलेल्या दुर्दैवी गोविंदांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाईकांची मुलाखत घेऊन त्यावर कार्यक्रम केला. एका पंगू झालेल्या मुलाची मुलाखतही घेतली. सरकारला आता म्हणे या दहीहंडी प्रकाराला क्रीडाप्रकार म्हणून मान्यता द्यायची आहे. स्पेनचे मानवी मनोरे रचणारे लोक मुंबईत आले होते. त्यांनी त्यांचं कौशल्य दाखवलं. त्यात धर्म नव्हता. त्यात कृष्णही नव्हता. लहान अल्पवयीन मुलांना मानवी मनोर्यांवर चढवलेलं नव्हतं. तो एक क्रीडाप्रकार होता. धर्मातीत होता, हे विशेष. त्यांना डिजेची गरज वाटली नाही. महाराष्ट्र पर्यटन खात्याने एक गोविंदा पथक म्हणे न्यूयॉर्कला नेलं आहे. ते न्यूयॉर्कच्या टाइम्स स्क्वेअरमध्ये दहीहंडी फोडणार आहेत. हे पर्यटनाच्या प्रचारासाठी केलं असं महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. जगदीश पाटील सांगत होते. अधिकार्यांचं या निमित्ताने पर्यटन झालं, हे खरं. परंतु अशाप्रकारे अंधश्रद्धांना पुढे नेणार्या कार्यक्रमांनाच जर महत्त्व द्यायचं तर भानामतीचे प्रयोग दाखवणार्यांनाही पर्यटनाच्या विकासासाठी वापरता येईल. यल्लम्माच्या यात्रेचाही त्यातच समावेश करता येईल. मांढरादेवी तर त्या दृष्टीने आदर्शच म्हणावी लागेल.

हे सारं संपतं न् संपतं तोच गणपती नावाची दुकानदारी सुरू होईल. किंबहुना सुरू झालेलीच आहे. कुणा एका हलवायाचा मुलगा अकाली मृत्यू पावला. त्याला म्हणे गणपती आवडत असे. म्हणून त्या हलवायाने रस्त्यावर गणेशोत्सव सुरू केला. त्याचं स्वातंत्र्यलढा, चळवळ यांच्याशी काहीही संबंध नव्हता. आज त्या गणपतीला एवढं महत्त्व प्राप्त झालेलं आहे की तो गणपतीच नवसाला पावतो असा लोकांचा विश्वास आहे. जर गणपती एकच असेल तर दगडूशेट हलवायाचा गणपती नवसाला पावतो आणि अन्यत्र असलेला गणपती पावत नाही असं का होईल असा साधा प्रश्न भाविक स्वतःच्या मनाला विचारत नाहीत. पुणेकरांनी हा गणपती डोक्यावर घेतला. त्यातून सार्वजनिक गणपतींचं पेवच फुटलं.

पैशांचा प्रचंड अपव्यय, त्याच्या मागे कामाचे काही लाख तास वाया घालवणं या सार्याला जबाबदार असलेल्या गणपतीचं भारतीय स्वातंत्र्यलढ्याशी नातं जोडल्यामुळे तो एकदम पवित्र होतो. खरोखरी त्या काळात जेव्हा लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणपती सुरू केला त्याचा खरोखरी स्वातंत्र्याच्या लढ्याशी किती संबंध होता आणि त्याचा कितपत परिणाम झाला? भावना बाजूला ठेवून याचा अभ्यास करून जागतिक परिस्थिती, जगात झालेली दोन महायुद्धं, तेव्हाचं जगातील तेलाचं राजकारण याचा विचार करून आपलं स्वातंत्र्य आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा कधीतरी एकदा विचार केला गेला पाहिजे. लोकमान्य टिळकांचा १९२० साली मृत्यू झाल्यानंतरच्या २७ वर्षांच्या काळात जग किती बदललं की जिथे होतं तिथेच राहिलं याचाही विचार करून त्यावेळी सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचा विचार आजच्या परिस्थितीत करून त्यांवर निर्बंध घातले जाणे आवश्यक आहे.

या गणपती उत्सवाचीही मोठी गंमत आहे. कोण्या एके काळी खूप प्रसिद्ध असलेला गिरगावचा प्रसिद्ध गणपती मागे पडला आणि त्याची जागा चिंचपोकळीच्या कमानीच्या पुलाखालच्या गणपतीने घेतली. तो गणपती काळाच्या ओघात मागे पडला आणि त्याची जागा रंगारी बदक चाळीच्या गणपतीने घेतली. रंगारी बदक चाळीच्या गणपतीला हुसकावून त्याची जागा मरोळच्या गणपतीला लोकांनी बहाल केली. मरोळचा गणपती प्रसिद्धीच्या झोतात आला आणि थोड्याच कालावधित मागे पडला आणि वरदा दादाचा गणपती लोकांच्या नवसाला पावू लागला. त्याला समांतर गणपती छोटा राजन या कुख्यात गुंडाने सुरू केला. तिथे गणपतीच्या सजावटीला लागणारे पैसे येतात कुठून याची चौकशी कुणीही केली नाही. छोटा राजनचा गणपती गर्दी खेचत असतानाच गणेशगल्लीतील लालबागचा गणपती प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याच्या जोडीने वडाळा-माटुंग्याचा जीएसबी मंडळाचा गणपती अचानक नवसाला पावू लागला आणि प्रचंड माया जमवू लागला. ती इतकी की त्याचा विमाच दीड दोनशे काटी रुपयांच्या घरात पोहोचला. जीएसबी गणपतीच्या उत्सवाची दोन शकलं झाली आणि एक गणपती पाच दिवसाचा तर मूळ गणपती १० दिवसांचा आहे त्याच जागी बसवला जाऊ लागला. तोपर्यंत लालबागचा राजा गर्दीचा राजा ठरू लागला होता. याचा काळात सुनिल माने नावाच्या बांधकाम व्यावसायिकाचा उदय झाला आणि त्याने लालबागच्या गणेशगल्लीच्या गणपतीपासून जवळच दुकानाच्या आडोशाने कनातींच्या आत ‘लालबागचा राजा’ या नावचा गणपती उत्सव सुरू केला. बाजूच्या सोयीच्या गरमखडा मैदानाची जागा मोकळी असतानाही अडचणीच्या जागेवरील हा गणपती दुकानांच्या आडोशाने जोरदार धंदा करू लागला. त्याचा प्रचार, प्रसिद्धी याचा वापर स्तिमित करणारा आहे. तिथे प्रवेश मिळावा यासाठी मोठमोठे नेते स्थानिक कार्यकर्त्यांना गळ घालू लागले. पहाता पहाता या गणपतीचं दुकान एवढं फोफावलं की त्या उत्सवामुळे होणार्या त्रासाबद्दल स्थानिक लोक ब्रही काढू धजत नाहीत. तिथे दर्शनही एवढं दुर्लभ की १६ तास रांगेत उभं राहणं हे ही लोक सहन करतात. जणू अन्यत्र असणारे गणपती हे गणपतीच नव्हे. सगळा प्राण जो काही आहे तो लालबागच्या गणपतीत आणून ओतला आहे. या अंधश्रद्धेबद्दल कोणी बोललं तर… आता तर नवा मार्गच सापडलेला आहे. सरळ सुपारी देऊन त्या विरोध करणार्याला उडवून टाका म्हणजे, प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघतो.

फक्त एकट्या मुंबई शहरात दोन लाख गणपती आणले जातात. त्यापैकी दहा हजार ३५०पेक्षा थोडेसे जास्त गणपती सार्वजनिक आहेत. या गणपती उत्सवाचं अंदाजपत्रक काही लाखांचं असतं. त्यात मिळणारे पैसे डेकोरेशन, ध्वनिवर्धक, पूजा आदींचा खर्च वजा जाता उरलेले पैसे वाटून घेण्याची बर्याच ठिकाणी प्रथा आहे. फक्त मुंबई शहरात एक लाख ८० हजार ६५० घरगुती गणेश मूर्तिचं विसर्जन गेल्यावर्षी केलं गेलं. यासाठी लागलेला पैसा, त्यात गेलेले निरर्थक श्रम याचा हिशेब न लावलेला बरा.

गणपती आणतो म्हणजे आपण मोठे धार्मिक आणि गणपती न आणणारे किंवा गणपतीची पूजा न करणारे पाखंडी असं वातावरण शहरात निर्माण होऊ लागलेलं आहे, ही गोष्ट चिंताजनक आहे. गणपती उत्सवाच्या या दुकानदारीत राजकारणी जरा जपूनच पाय टाकतात. ते हे दुकान हस्ते परहस्ते चालवतात. कारण त्यात थेट पूजाअर्चेचा संबंध आहे. ते प्रसंगी अंगाशी येऊ शकतं. सर्व तथाकथित हिंदू उत्सव हे प्रचंड गोंगाटाचे आणि कोलाहलाचे होऊ लागलेले आहेत. त्याच्या पावलावर पाऊल टाकून अन्य धर्माचे लोकही आम्हीही कमी नाही हे दाखवण्यासाठी आपलेही उत्सव कोलाहलपूर्ण करण्याच्या प्रयत्नाला लागलेले आहेत. ते गणपतीच्या मिरवणुकीला नाशिक बाजा लावतात मग आम्ही बाबासाहेबांच्या प्रतिमेसमोर नाचलो आणि बाजा वाजवला तर त्यात गैर काय असा प्रश्न जेव्हा विचारला जाऊ लागतो तेव्हा मनाला प्रश्न पडतो की आम्ही पुढे जाणार आहोत की ढोल ताशाच्या नादावर उड्या मारणार्या आदिम प्रवृत्तीच जोपासणार आहोत?

दहीहंडी आणि त्या पाठोपाठच्या गणेशोत्सवाच्या दुकानदारीला आळा घालण्याची वेळ आता आलेली आहे. वेळीच हे झालं नाही तर हा धर्मराक्षस फोफावत जाईल आणि त्यातून नाना प्रकारचे सामाजिक, राजकीय प्रश्न निर्माण होतील. आम्ही स्वीकारलेली राज्यघटना आणि संसदीय लोकशाही यांना छेद देण्याचा हा धार्मिक प्रकार आणि अट्टाहास वेळीच थांबवला पाहिजे.

‘Religion was invented, when the first conman, met the first fool’ हे उदृत मार्क ट्वेन यांचं आहे. या वाक्याचं प्रत्येकाने स्मरण ठेवलं पाहिजे.

1 Comment

  1. लेखातला शब्द न शब्द खरा आहे. अहो, पण असे वाटणारे तुमच्या आमच्यासारखे मूठभर आहेत. वी आर इन डायर मायनॉरिटी. बहुसंख्य लोकांना हेच हवे आहे. जो समाज, नवस, दर्शन अशा गोष्टींवर विश्वास ठेवतो तो याच लायकीचा आहे. हल्लीचे सर्वच आवाजी उत्सव वा सण ही सोशल इव्हिल्स आहेत. इतिहासात अशा अनेक संस्कृती रसातळाला गेल्या आहेत. आपणही त्याच मार्गावर आहोत. असल्या समाजात विचारवंतांना ‘विचारजंत’ असे हिणवले जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *