दंगलीचं असं एक शास्त्र असतं. हे शास्त्र सगळ्यांनाच जमतं असं नाही. भाजप हा पक्ष आणि त्याचे कार्यकर्ते मात्र यात पारंगत आहेत हे नव्याने सिद्ध झालं आहे. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील दंगल कशा पद्धतीने नीट घडवून आणण्यात आली ते पोलिसांनी उघड केलं असून भाजपच्या एका आमदाराला गजाआड केलं आहे. या दंगलीत केवळ जाळपोळ नाही तर दोन्ही समुदायातील सुमारे ३२ लोकांचा जीव गेला आणि अनेक लोक जखमी झाले आहेत. यात एका पत्रकाराचाही बळी गेला आहे. या जिल्ह्यातलं सारं जनजीवन अस्तव्यस्त होऊन गेलं आहे. ही दंगल आटोक्यात यावी यासाठी लष्कराला फ्लॅग मार्च करावा लागला. या सर्व प्रकरणाला कारणीभूत कोण आहे हे उघड होत असल्याने भाजपची खरी अडचण झालीय. हे असलं तरी देशात काय विष पेरण्याचा प्रयत्न होतोय यावर झगझगीत प्रकाश यानिमित्ताने पडला आहे.

मुझफ्फरनगर इथली परिस्थिती अचानक स्फोटक झाली आहे. का घडलं हे सगळं? खरंतर हा सगळा वाद उद्भवला तो छेडछाडीच्या घटनेवरून. २७ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. कवाल गावातील शहनवाज या तरुणाने आपल्या बहिणीची छेड काढली म्हणून गौरव आणि सचिन या दोन तरुणांनी शहनवाजवर चाकूने हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला शहनवाज यात मरण पावला. पण त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकर्यांनी गौरव आणि सचिन यांना धरून ठेवलं. गावकर्यांच्या सामूहिक मारहाणीत त्या दोघांचा मृत्यू झाला. अत्यंत भयानक असा हा प्रकार. या प्रकरणाने सामाजिक वातावरण बिघडलं. या भागात दहशतीचं वातावरण पसरत गेलं. मात्र या घटनेला जातीयस्वरूप देण्यासाठी भाजपसारखे पक्ष टपलेलेच होते. त्यातच खाप पंचायतीच्या सभेची घोषणा करण्यात आली. यातून सुरू झालेलं राजकारण पोलिसांच्याही लक्षात आलं. त्यामुळे या खाप सभेवर बंदी घालण्याचा प्रयत्न झाला. राज्यपालांनाही या सगळ्याची माहिती मिळाली. मात्र उत्तर प्रदेशचे तरुण मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी याबाबत निष्क्रियता दाखवली. याचाच फायदा जातीयवाद्यांनी घेतला.

या तिन्ही युवकांच्या खुनाने दोन्ही समुदायांमध्ये तीव्र संताप होता. मात्र त्या संतापाला फुंकर देण्याचं काम सुरू झालं. यातच फेसबुकवरून एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला. गौरव आणि सचिन या दोन तरुणांना कशा पद्धतीने हालहाल करून मुस्लीम समुदायाने ठार मारलं याचं चित्रण त्या व्हिडिओमध्ये होतं. अत्यंत क्रूरपणा त्या क्लिपमध्ये होता. या क्लिप संगणकावरून, मोबाईलवरून वार्यासारख्या पसरत गेल्या. या क्लिपचे पडसाद मग खाप पंचायतीत उमटले आणि वातावरण बिघडलं. आपल्या बहिणींचं रक्षण करणार्या हिंदू तरुणांना किती भयानक पद्धतीने मुस्लीम जमावाने मारलं पहा असं सांगणं सुरू झालं. त्या क्लिपमध्ये दाढी, टोप्या घातलेले मुस्लीम दिसताहेत. झालं, त्यातून मग संहार सुरू झाला.

भडकलेले लोक रस्त्यावर आले. मग मुस्लीम वस्तीवर हल्ले सुरू झाले. तलवारी, पेट्रोल, बॉम्ब याच्या सहाय्याने मग डोंब उसळला. रक्ताची थारोळी जमा झाली. महिला-लहान मुलंही यातून सुटली नाहीत. प्रचंड हाहाःकार उडाला. ज्यामुळे लोकांत संताप उसळून हा सगळा राडा घडला त्या वादग्रस्त क्लिपिंगचं रहस्य आता उलगडलं आहे. हा व्हिडिओ मिरूतमधील भाजपचे आमदार ठाकूर संगीत सिंग यांनी सोशल नेटवर्कवर टाकला. यातील क्लिपिंग आहे ते मुळी पाकिस्तानमधील. २०१० साली सियालकोट येथे दोन तरुणांना दरोडेखोर समजून तिथल्या नागरिकांनी क्रूरपणे मारलं होतं. त्या  घटनेचा व्हिडिओ मुझफ्फरमधील असल्याचं सांगत या आमदाराने अपलोड केला.

हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर आता ठाकूर संगीत सिंग या आमदाराला गजाआड करण्यात आलेलं आहे. अफवा पसरवण्याच्या गुन्ह्याखाली त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. खरा प्रकार उघडकीस आला खरा पण या अफवेने अनेकांचे जीव घेतले आहेत, मालमत्तेचं नुकसान झालं आहे.

खरंतर हा प्रकार काही पहिल्यांदाच घडलेला नाही. मुंबई आणि गुजरातमधील दंगलीत हेच घडलं होतं. १९९२-९३ च्या मुंबईत उसळलेल्या जातीय दंगली आधी अनेक अफवा पसरलेल्या होत्या. सशस्त्र माणसांचा एक ट्रक भेंडीबाजारहून निघाला आहे… अशा अफवा पसरल्या होत्या. ‘त्यांनी’ इथे इथे ‘आपल्या’ माणसांना ठार मारलं… असं सांगत ही दंगल नियोजनबद्ध पसरवण्यात आली होती.

गुजरातमधील दंगलीमागे हेच झालं होतं. गोध्रा येथे ट्रेन जळीत प्रकरणी अवघ्या गुजरातमधील मुस्लिमांना वेठीस धरलं गेलं. त्याच ‘पुण्याईच्या’ जोरावर नरेंद्र मोदी अजून सत्ता टिकवून आहेत. अफवा हे सत्तेच्या सोपानाकडे नेण्याचं साधनच आहे.

अफवा आणि सत्ताधार्यांचा नाकर्तेपणा या दोन गोष्टीतून दंगल भडकत असते. मुझफ्फरनगरमधील घटनेत याचीच पुनरावृत्ती झालेली आहे. अखिलेश यादवच्या निष्क्रिय राजवटीवरील लागलेला हा डाग आहे. खरंतर विरोेधक आणि सत्ताधिकारी एकत्र आलेत की काय, अशीही शंका अनेकदा अशा प्रसंगातून येत असते. कारण धार्मिक दंगलीमार्फत लोकांना असुरक्षित करणं आणि राजकारण्यांकडे अंकित करणं हा महत्त्वाचा हेतू या सगळ्यामागे असतो. ते आधी घडलंय, आताही तेच घडतंय…

3 Comments

  1. दलित चळवळीचे हुशार लेखक हे हिंदू आणि हिंदू धर्मासंबंधातील प्रत्येक बाब यांना देसेल तिथे आणि मिळेल तेंव्हा झोडपून काढीत असतात. म्हणूनच गुजरात दंगलीच्या विरुद्ध मुसलमानांपेक्षा हेच अधिक गळा काढतात !!! ( कदाचित हे हिंदुविरुद्धच्या लढ्यात कधीतरी ह्यांना support करतील अशी सुप्त आशा )

  2. प्रत्येक दंगलीची सुरवात धर्मांध मुसलमानांनी करायची आणि त्याला प्रतिकार केला तर खापर मात्र हिंदूंवर फोडायचे,ही तर या देशातील तथाकथित सेक्युलर पत्रकारांची फैशनच बनली आहे.गुजरात दंगलीला गोध्र्यातील कोंग्रेसचे धर्मांध नेतेच सर्वस्वी जबाबदार होते आणि आताच्या मुझफ्फरनगरच्या दंगलीला ही कवाल गावातील मुसलमानच जबाबदार होते..गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींविरूदध तुम्ही कितीही थयथयाट केला तरी न्यायालयात त्यांच्यावरचा एकही आरोप सिदध झालेला नाही..संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात गेल्या १० वर्षात असंख्य जातीय दंगली झाल्या आहेत,पण नरेंद्र मोदींचा गुजरात मध्ये एकही नाही..हेच त्यांचे मोठे यश आहे.

  3. तुम्ही लेखात अर्धसत्य लिहिलंय. त्या अभागी मुलांच्या बापाची मुलाखत ऐका. पोलिसांत आणि सरकार-दरबारी काहीच कृती न झाल्याने त्याच्या मुलांनी ही आततायी कृती केली. परदु:ख शीतळ असतं. तुमच्या कुणा नातेवाईकांमधल्या मुलीची कुणा गुंडाने छेड काढली तर तुम्ही गप्प बसाल का ?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *