मुंबईच्या दहीहंडी उत्सवाचा डान्सबार झालाय का? या ठुमक्यांसाठी कोट्यवधी रुपये उडवून राजकारण्यांना काय मिळतं? दहीहंडीच्या दिवशी मुंबईच्या नाक्यानाक्यावर नाचणार्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या मांदियाळीने हे प्रश्न उभे राहिलेत. राजकारण्यांनी आपली व्होट बँक तयार करण्यासाठी दहीहंडीच्या उत्सवाचा वापर सुरू करून आता जवळपास दशक उलटलंय. गेल्या विधानसभा निवडणुकीत याचा कळस रचला गेला. काही धनदांडग्यांनी १ करोड रुपयांची हंडी असा प्रचार करून आपला चेहरा जनमानसापर्यंत पोचवला. ते करोड कधीच कुणाला मिळाल्याचं ऐकीवात नाही. असो. मात्र दहीहंडीच्या प्रसिद्धीचं दही खाऊन नावारुपाला आलेल्या या आमदार होऊ पाहणार्या नेत्याला मराठी संस्कृतीचे रक्षक म्हणवणार्यांनी तिकीट दिलं. त्यांच्या सुदैवाने ते निवडूनही आले आणि राजकीय कार्यकर्त्यांना जणू निवडणुकीत तिकीट मिळवण्याची गुरूकिल्लीच मिळाली. मात्र खरंच मतदार या दहीहंडीबहाद्दरांना मतं देतात का? आणि देतात तर का देतात? हा प्रश्न कायम आहे. पैशांच्या जोरावर आणलेल्या या बॉलिवूडच्या बालांना पाहिलं की, मतदारसंघाचा विकास होतो का? हा पैसा आला कुठून असा प्रश्न मतदारांना का पडत नाही? की त्यांनी या बालांना पैसे देऊन आणलंय हेच त्यांना कळत नाही…? बॉलिवूडच्या अभिनेत्र्यांच्या या मादक अदांनी गोविंदा घायाळ करण्यासाठी त्यांचे नेते किती पैसे खर्च करतात हे ऐकलं तर कुणालाही आश्चर्य वाटेल.

विशेष म्हणजे हा सगळा पैसा रोख दिला जातो. रोख दिला जाणारा पैसा म्हणजे काळा पैसा… त्यामुळे त्याचा कुठेही हिशेब नसतो. दहीहंडीचा हा नवा अवतार फक्त मुंबईपुरता मर्यादित नाही. पुणे, कोल्हापुरातले राजकीय कार्यकर्तेही बॉलिवूडच्या बालांसाठी लाखो रुपये मोजतात. संस्कृतीचं माहेरघर म्हणवणार्या पुण्यातही या बॉलिवूड बालांचं काही उणं नाही. इथेही दादा-काकांच्या कार्यकर्त्यांनी बॉलिवूडच्या बालांना नाचवलं. यासाठी मुंबईहून आलेल्या बॉलिवूड बालेने त्याच्याकडून २२ लाख रुपये घेतले. दादा-काकांचा हा कार्यकर्ता येत्या निवडणुकीत तिकीट मिळावं म्हणून उमेदवारी करतोय आणि म्हणून स्वतःचं अस्तित्व तयार करण्यासाठी दहीहंडीतून प्रतिष्ठा मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न या कार्यकर्त्याने केला.

विकासाची नवी दिशा सांगणारी, सामाजिक सलोखा आणि एकसंघतेचं प्रतीक म्हणजे दहीहंडी… मात्र याच दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने राजकारणाला वेग येतो… प्रत्येक दहीहंडी मग ती शिवसेनेची, मनसेची, राष्ट्रवादीची… कुठे कोकणातल्या तर कुठे पश्चिम महाराष्ट्रातल्या दादांचे कार्यकर्ते या निमित्ताने सलामीला ५००० रुपये मोजताना पहायला मिळतात. मग गल्लीतले चिल्लेपिल्लेही दोन थर लावून ५००० हजार रुपये घेऊन खूश होतात. ५००० हजार रुपये देण्यालाही काही हरकत नाही. कारण त्या निमित्ताने मुलांना या खेळाबद्दल आकर्षण निर्माण होतं. मात्र या पाच-पाच हजारांचा हिशेब तो कुठे आणि कोणी लावायचा? निवडणुकीच्या अगोदरची प्रलोभनं नाहीत का ही…?

काही आमदारांनी दहीहंडीला राज्यसरकारने साहसी खेळ म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी क्रीडामंत्र्यांकडे केलीय. असं झालं तर क्रिकेटच्या खेळात चिअरलीडर चालतात मग दहीहंडीला का नको, अशी मुक्ताफळं उधळायला मोकळे.

या बॅलिवूडच्या बाला ज्या स्टेजवर नाचवतात तिथे त्यांची मुलं आणि बायकाही हजर असतात. त्यांच्यासमोरही या राजकीय नेत्यांना आपण काय करतोय याचं भान राहू नये हे दयनीय आहे.

ठाण्यातल्या काही दहीहंडी आयोजित करणार्या नेत्यांना यासंदर्भात विचारणा केली असता, आता काय लावणीलाही तुम्ही बंदी घालाल का, असा उलट सवालच हे नेते करतात. मात्र आमचा लावणीला विरोध नाही, लावणीच्या नावावर जो बिभत्स प्रकार हजारो युवकांसमोर केला जातो त्याला विरोध आहे. तर दुसर्या एका राजकीय नेत्याने येत्या विधानसभेच्या निवडणुकीअगोदर आणखी एक दहीहंडी अगदी गरज वाटली तरच करेन नाही तर दहीहंडी बंद असं सांगून प्रकरणावर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला.

पण परंपरागत दहीहंडीला हे भीषण स्वरूप का आलं? एकट्या ठाण्यात यावर्षी दहीहंडीच्या उत्सवात १०० कोटींचा चुराडा झालाय. हा पैसा कुणाच्या खिशातून आला? काही ठिकाणी राजकारणी स्वतःचा खिसा रिकामा करतात तर काही ठिकाणी आजूबाजूचे कारखानदार आणि मोठ्या व्यापार्यांकडून देणग्या घेतल्या जातात. देणगी मग ती कारखानदाराची इच्छा असो किंवा नसो. दुकानदारांनाही धमकावलं जातं. मग कुणाकडून १००० तर कुणाकडून ५०० रुपये या दराने खंडणी वसूल केली जाते.

एकंदरीत काय तर महाराष्ट्राच्या गल्लोगल्ली सडकछाप राजकारण्यांची संख्या वाढतेय. दहीहंडीच्या माध्यमातून राजकीय दही खाण्याचा या सडकछापांचा धंदाही जोरात आहे. याला जर कोणी जबाबदार असेल तर ते आपणच आहोत. कारण या गल्लीदादांना मग तिकीट मिळालं की आपण त्यांना मतं देतो, निवडून आणतो.

दरम्यान सरकार मात्र दहीहंडीचा वापर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी करण्याचा विचार करतंय. त्यासाठी पर्यटन विभागाने करोडोचा खर्च करून जाहिराती, होर्डिंग्सचा वापर केलाय. सरकारचा हेतू चांगला आहे. दहीहंडी हा साहसी खेळ, साहसी खेळ हे परदेशी पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रं असतात. परदेशी पर्यटक आला तर डॉलर येतो, आर्थिक विकासाला मदत होते. मात्र आता प्रश्न निर्माण होतोय तो हाच की, काय आपण पर्यटकांना दहीहंडीचं हे बिभत्स रूप दाखवणार आहोत का? मात्र दहीहंडीच्या नावावर वाढीला लागलेल्या विकृत धंद्याकडे शासनयंत्रणेचं पुरतं दुर्लक्ष होताना दिसतंय. सुजाण नागरिक-मतदार म्हणून आपलं नक्कीच याकडे दुर्लक्ष होणार नाही याची खात्री वाटते. एकूणच काय? तर या सडकछाप राजकारण्यांना रस्त्यावर आणण्याची ताकद आपल्याला राज्यघटनेने दिलीय. फक्त ती ताकद वापरण्यासाठी आपल्याला विवेकी रहावं लागेल.

हा लेख तुमच्या वाचनात येईल तेव्हा गणपतची लगबग असेल. मोठमोठाले देखावे असतील… काही किलोमीटरच्या रांगा असतील… प्रत्येक प्रवेशद्वारासमोर राजकारण्यांचे फ्लेक्स असतील आणि इथेही गणपतीच्या नावावर लक्ष्मीची आराधना करणारे तुमच्याच खिशातला पैसा उधळत असतील. जरा सांभाळून आपल्याच देवांना, सणांना, श्रद्धेला या पुढार्यांच्या हातचं खेळणं होऊ देऊ नका… निवडणुकीत अशांचं विसर्जन करा…

 

दहीहंडीचा रेट

बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्री – ५० लाख रुपये

ब्री ग्रेडच्या अभिनेत्री  किमान – २२ लाख रुपये

मराठी अभिनेत्री – ५ ते ७ लाख रुपये

– निलेश खरे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *