गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्णाचा जन्मदिवस. तो साजरा करण्यासाठी दहीकाला करण्यात येतो. मुंबईत कोकणातून आलेल्या चाकरमान्यांनी पुढे एकत्र येऊन हा सण दहीहंडी म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. पूर्वी गल्लीबोळांपुरता मर्यादित असलेल्या या छोट्या उत्सवावर काही वर्षांनी राजकारण्यांची नजर गेली आणि हळूहळू त्या उत्सवाचा मोठा इव्हेंट झाला. राजकारण्यांनी लाखो रुपयांच्या बक्षिसांच्या हंड्या बांधायला सुरुवात केली. त्या फोडण्यासाठी मुंबई-ठाण्यातल्या गोविंदा पथकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. गेल्या काही वर्षांपासून हे राजकारणी लाखो रुपये खर्चून अधिकाधिक लोकांना आपल्या दहीहंडीकडे आकर्षित करण्यासाठी हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतल्या कलाकारांना आमंत्रित करताहेत. त्यात अनेक सिनेतारका आयटम साँगवर थिरकत उपस्थितांचं मनोरंजन करताना दिसतात. यामुळे एका सणाचा इव्हेंट होऊन त्याचं बाजारीकरण झालंय का असा प्रश्न पडतोय. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या या सणाबद्दल कट्ट्यावरही अशीच चर्चा ऐकायला मिळतेय…

priya दहीहंडीची रूपरेषा बदलतीय…

श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांबरोबर दही खाण्यासाठी हा खेळ खेळायचा असं म्हटलं जातं. त्यामुळे दहीहंडी फोडण्याचा सण  साजरा केला जातो. मात्र तो प्रकार आता काळाच्या पडद्याआड गेलाय. तरुणांना पैशाची आणि राजकारण्यांना प्रसिद्धीची हाव  लागलीय. त्यामुळे आता मानाची हंडी बक्षिसाच्या रकमेवरती ठरते आणि सणाचं बाजारीकरण झालंय…

– प्रिया औटी, विद्यार्थिनी

 

srishtiस्पर्धेचं स्वरूप आलंय…

स्पर्धा ही बाजारीकरणाचाच एक भाग आहे. कुठेच मजा म्हणून हंडी फोडली जातच नाही. हंडी फोडायची दोनच कारणं राहिली आहेत, एक स्पर्धा आणि दुसरं पैसे. आमचेच दहा थर लागायला हवेत हा अट्टाहास आणि मी एवढ्या रकमेचं बक्षिस जिंकलं याची गुर्मी. या दोनच गोष्टी हल्ली दहीहंडीत पाहायला मिळतात…

– सृष्टी साळवे, विद्यार्थिनी

 

suchita बाजारीकरण नाही मात्र पाण्याचा अपव्यय होतो

आजही अनेकजण असे आहेत जे धार्मिक सण म्हणून दहीहंडी साजरी करतात. काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते,  त्याप्रमाणे हा सणदेखील बदललाय. आता या दहीहंडी स्पर्धांमध्ये पाण्याचा खूप अपव्यय होतो. या सणाच्या नावाखाली  पाण्याची जी नासाडी होते ती बंद होण्याची गरज आहे.

– सुचिता तेली, विद्यार्थिनी

makrandएकजुटीचा सण हा…

दहीहंडी म्हणजे एकजुटीचा सण मानला जातो. आता देशाविदेशातूनही लोक थर लावतानाच्या व्यवस्थापनाचा अभ्यास करायला इथे येतात. मात्र हल्ली झालेल्या बाजारीकरणामुळे या सणाचं स्वरूप पूर्णपणे बदललं आहे. त्यामुळे हळूहळू याबद्दलचं आकर्षण आणि सणाचं महत्त्व कमी होईल अशी भीती आहे.

– मकरंद मालडोकर, विद्यार्थी

 

sagar बाजारीकरणाबरोबर प्रदूषणात भर पडतेय

गेल्या काही वर्षांत दहीहंडीचं बाजारीकरण झाल्याचंच चित्र दिसत आहे. यामध्ये प्रचंड प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो.  यादिवशी मुंबई-ठाण्यात हंडी फोडण्यासाठी निघालेल्या गोविंदापथकांमुळे प्रचंड गर्दी आणि ट्रॅफिक होतो. त्यामुळे  वायुप्रदूषण आणि सर्वत्र वाजत असलेल्या डिजेमुळे ध्वनी प्रदूषणात भर पडतेय. दहीहंडीचं बाजारीकरण झाल्याचीच ही  लक्षणं आहेत.

– सागर कदम, विद्यार्थी

 

sukesh सणाच्या बाजारीकरणामुळे आयुष्यभराची सजा

दहीहंडी आता उत्सव राहिला नसून त्याच्या स्पर्धा सुरू झाल्यात. त्यामुळेच त्याचं बाजारीकरण झालंय. यात बक्षिस  जिंकण्यासाठी दहा-दहा थर लावण्याचा प्रयत्न करताना अनेकजण जखमी होतात. तर काही गोविंदांनी आपला जीवदेखील  गमावला आहे. सणाच्या या स्पर्धेमुळे आयुष्यभराची शिक्षा मात्र गोविंदांना भोगावी लागतेय.

– सुकेश बोराले, विद्यार्थी

 

संकलन ः प्रसाद माळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *