देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. परकीय सत्तेच्या अधिपत्याखाली असताना देशाच्या कानाकोपर्यातून क्रांतिच्या ज्योती पेटल्या होत्या. तसंच लहानांपासून-थोरांपर्यंत सगळेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सक्रिय झाले होते. जहाल-मवाळ विचारांच्या पार्श्वभूमीवर या क्रांतिचा प्रवास सुरू झाला आणि देशभरातून क्रांतिकारक या विचारांच्या मार्गदर्शनाखाली देशाच्या स्वातंत्र्यासाठी परकीय शक्तिशी लढू लागले. यात कोणी हिंदू, मुस्लीम, शीख, ख्रिश्चन नव्हता तर तो भारतीय होता. हेच प्रकर्षाने आपल्याला इतिहासानेही सांगितलं. पण काहीवेळा इतिहासालाही नजरेआड केलं जातं आणि समाजमनासमोर एक वेगळंच चित्र उभं केलं जातं. त्यामुळे नव्याने काही गोष्टी कराव्या लागतात किंवा सांगाव्या लागतात. याच अनुषंगाने लेखक य. दि. फडके यांनी ‘स्वांतत्र्य आंदोलनातील शीख’ आणि ‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ ही दोन पुस्तकं लिहिली. साने गुरुजी स्मारक ट्रस्टचादेखील उद्देश हाच असल्याकारणाने अनुवादासाठी या दोन पुस्तकांचा विचार केला गेला. मराठीत लिहिली गेलेली ही दोन पुस्तकं इतर भारतीय भाषांमधूनही उपलब्ध व्हावीत म्हणून या पुस्तकांचा अनुवाद करण्याचे ठरवण्यात आले. या पुस्तकाचा गुजराती अनुवाद ललितकुमार शाह यांनी केला आहे. ‘स्वातंत्र्य आंदोलनमां शीख’ असं या गुजराती अनुवादित पुस्तकाचं नाव असून साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे ते प्रकाशित करण्यात येत आहे.

मूळ मराठी पुस्तक हे समता आंदोलनतर्फे swatantryaप्रकाशित करण्यात आलं होतं. त्यामुळे समता आंदोलनाच्या प्रकाशक शिवाजी गायकवाड यांचं मतही महत्त्वाचं ठरतं. ते म्हणतात ‘आजच्या परिस्थितीत, ज्यांचा ज्यांचा धर्मावर आधारित असलेल्या राजकारणावर विश्वास नाही, त्यांनी पंजाबचा प्रदेश म्हणून असलेल्या राजकीय मागण्यांना पाठिंबा देणं आणि हिंदू-शीख अशी दरी न वाढवण्याचे जाणिवपूर्वक प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने शिखांचा इतिहास समजून घेण्यास हे पुस्तक उपयोगी पडेल.’ तसंच ‘आज भारतीय समाजात हिंदू-मुस्लीम, हिंदू-शीख असं संशयाचं वातावरण निर्माण झालं आहे. ते दूर करणं आणि स्वातंत्र्याच्या व्यापक राजकीय आणि सामाजिक हिताकरता ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध विविध धर्मीय जनसमूहांनी एकच भूमिका जाणिवपूर्वक का स्वीकारली हे जनसामान्यांपर्यंत पोहोचवणं हाही या योजनेमागचा एक उद्देश आहे.’

या पुस्तकात गुरू गोविंद सिंग यांचा धर्मगुरू म्हणून झालेला प्रवास वाचत आपण पुढे जातो तेव्हा या प्रवासात शिखांचे वेगवेगळे पैलू आपल्यासमोर येतात. यात धर्माच्या अनुषंगाने झालेल्या चळवळी तर आहेतच पण देश स्वातंत्र्यासाठी जगभरातून सक्रिय झालेले शीख आपलं लक्ष वेधून घेतात. गदर चळवळीची इंग्रजांना बसलेली दहशत आणि गदर वर्तमानपत्र यातून घडवून आणलेली क्रांती या सर्वांची माहिती आपल्याला या पुस्तकातून मिळते. जालियनवाला बागेतील हत्याकांड, त्याचे सूत्रधार, इतिहासातील या घटनेबद्दलची चीड आजही आपल्या मनातून जात नाही. सरदार उधमसिंगसारखा शीख तरुणही कसा या गोष्टीने होरपळला गेला आणि त्याचा इंग्रजांबद्दलचा सूड कसा वाढीस लागला याची माहितीही या पुस्तकातून समोर येते. असे अनेक दुवे जे कधीच सामान्यांपर्यंत पोहोचले नाहीत ते आपल्यासमोर उलगडतात.

या पुस्तकात इंग्रज राजवटीपूर्वीपासून ते स्वातंत्र्यापर्यंतचाच नाहीतर त्यानंतरच्याही अनेक गोष्टींचा ऊहापोह करण्यात आलेला आहे. इंग्रजीत उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे हे पुस्तक य. दि. फडके यांनी लिहिलेलं आहे.

‘स्वातंत्र्य आंदोलनातील मुसलमान’ हे पुस्तकही गुजरातीत अनुवादित झालेलं आहे आणि त्याचं प्रकाशन साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या साहित्य संवाद, २०१२ या कार्यक्रमात हिंदी कवी मंगलेश डबराल यांच्या हस्ते करण्यात आलं होतं.

‘स्वातंत्र्य आंदोलनमां शीख’ या गुजराती अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन १९ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता खालसा महाविद्यालयात मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागातील डॉ. गुरुबचनसिंग बचन यांच्या हस्ते होणार आहे. तसंच या विषयावर चर्चा होणार असून जी.एन. खालसा महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. अजित सिंग, ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई,  युवराज मोहिते हे उपस्थित राहणार आहेत. ज्येष्ठ समीक्षक आणि आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्राच्या अध्यक्ष पुष्पा भावे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *