शरद पवार येत आहेत होऽऽऽ… बुधवारच्या संध्याकाळी मुंबईच्या क्रिकेट आसमंतात ही आरोळी निनादली आणि क्रिकेटच्या कट्ट्याकट्ट्यावर पुन्हा पवारांच्या पॉवरची चर्चा रंगली. बरोबर एक वर्षापूर्वी शरद पवारांनी क्रिकेटमधलं आपलं अवतार कार्य संपवलं होतं. क्रिकेटच्या सगळ्याच पदावरील त्यांचा कार्यकाळ संपला होता आणि त्याचवेळी त्यांनी आता पुन्हा क्रिकेट नाही अशी घोषणाही केली होती. पण शरद पवार जे बोलतात नेमकं त्याच्या उलट वागतात हा इतिहास आहे. त्यांनी नाही म्हटलं की त्याला हो समजायचं. एकेकाळी महाराष्ट्र कुस्ती संघटनेचंही अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. त्यामुळे समोरच्या प्रतिस्पर्ध्याला धोबीपछाड देऊन कसं निसटायचं याचं ज्ञान शरद पवारांइतकं कुणालाच नाही आणि अखेर शरद पवारांनी घोषणा केलीच तेही मुंबई क्रिकेट संघटनेत परतण्याची…

गेल्या वर्षभरात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय… नव्हे मुंबई क्रिकेट संघटनेत आलेल्या त्सुनामीत तो पुलच वाहून गेलाय. विलासराव देशमुख यांचं झालेलं निधन त्यानंतर अध्यक्षपदासाठी रवी सावंत आणि प्रा. रत्नाकर शेट्टी यांच्यात झालेली लढत, त्यात सावंत यांनी मारलेली बाजी त्यानंतर प्रा. रत्नाकर शेट्टी यांची मुंबई क्रिकेट संघटनेतून त्यांनी केलेली हकालपट्टी, शेट्टी यांनी न्यायालयात घेतलेली धाव, तिथे राष्ट्रीय पातळीवर अध्यक्ष एन्. श्रीनिवासन यांनी पदावरून तात्पुरती दूर होण्याची नामुष्की आणि जगमोहन दालमिया यांनी बीसीसीआयच्या अध्यपदाची घेतलेली प्रभारी सूत्रं… दालमिया बीसीसीआयमध्ये सक्रिय होणं हीच खरी तर शरद पवारांसाठी चिंतेची बाब होती. कारण गेली १२ वर्षं क्रिकेट प्रशासक म्हणून त्यांची कारकीर्द वादळी राहिली. अनेक वादळं त्यांनी अंगावर घेतली आणि आपल्या अंगभूत सामर्थ्याने त्यांचा मुकाबलाही केला. भारतीय क्रिकेटसाठी पवारांची ही कारकीर्द निर्णायकी ठरली. मुंबई क्रिकेट हा काही पवारांचा अंतिम टप्पा नव्हता. जिथे जाऊ तिथे नंबर एक बनलं पाहिजे हा त्यांचा ध्यास. त्यांना बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचं स्वप्न पडलं. पण तिथे जगमोहन दालमिया त्यांच्या आड आले. सार्वजनिक जीवनात पवार फक्त एकच निवडणूक हरले आणि तीही क्रिकेटच्या मैदानावर! दालमियांचे समर्थक रणवीर सिंग यांनी अवघ्या एका मताने पवारांना पराभूत केलं. दगा हा गाफील असतानाचा होतो तसं पवारांच्या बाबतीत घडलं. ज्या महाराष्ट्राने त्यांना घडवलं, राजकीय चेहरा दिला त्याच महाराष्ट्रातील, महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतील सुंदोपसंदीने पवारांचा घात केला… ज्ञानेश्वर आगाशे आणि अजय शिर्के या दोघांनी महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवर दावा ठोकल्याने महाराष्ट्राची मतच बाद करण्यात आली. दालमियांनी यात मोठं राजकारण केलं. त्यामुळे पवार आणि रणवीर सिंग यांना समसमान १५-१५ मतं पडली. अशावेळी दालमिया यांनी आपल्या अध्यक्षपदांचं मत रणवीर सिंग यांच्या पारड्यात टाकून पवारांचा रोष ओढवून घेतला. हार मानतील ते पवार कसले? पुढच्याच टर्मला फुल प्रूफ प्लॅनिंग करून पवार बीसीसीआयचे अध्यक्ष बनले आणि दालमियांवर १९९६ च्या भ्रष्टाचाराचे आरोप २००५ मध्ये ठेवून त्यांना क्रिकेटमधून बडतर्फ केलं. हे फक्त पवारच करू शकतात. पवारांच्या या १२ वर्षांत अनेक घटना अशा घडल्या ज्याबद्दल क्रिकेट वर्तुळात अजूनही दबक्या आवाजात चवीने बोललं जातं. शरद पवारांविरोधात वाडेकरांनंतर दुसर्या टर्मला एमआयजीचे प्रवीण बर्वे उभे राहणार होते. पण रातोरात बर्वेंच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड पडते काय आणि त्यांना नाना चौकशांना सामोरं जावं लागतं काय? बीसीसीआयची निवडणूक ज्या ज्ञानेश्वर आगाशेंमुळे गमवावी लागली ते आगाशे त्यांच्या उर्वरित आयुष्यात देशोधडीला लागले. बँक घोटाळ्याप्रकरणी तर त्यांना जेलही झाली. यामागे काही कार्यकारणभाव आहे की पवार फोबिया? याची उत्तरं येणारा काळच देईल. पण एक मात्र नक्की या घटनांवरून युद्धात, प्रेमात आणि क्रिकेटमध्ये सबकुछ माफ असतं अशी नवी म्हण जन्माला आली एवढं खरं… असो, पवार यांनी क्रिकेटमध्ये पॉवरफुल राज्य केलं. आधी म्हटल्याप्रमाणे मैदानावरील क्रिकेट एवढंच मैदानाबाहेरील क्रिकेटही त्यांनी रोचक आणि रोमहर्षक केलंय. थोडक्यात सध्या सावधान… क्रिकेट जगतात पुन्हा पवार येत आहेत होऽऽऽ… एवढंच आपण म्हणू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *