इंग्लंडमधील एका समाजलेखकाने म्हटलं होतं, ‘एक काळ असा येईल की जगात फक्त पाच राजे उरतील-इंग्लंडचा एक आणि पत्त्यामधले चार! युरोपात, आफ्रिकेत अनेक देशांत अजूनही राजघराणी अस्तित्वात आहेत. पण सर्वात ख्यातनाम आहे ती ब्रिटिश रॉयल फॅमिली. गेली ७०० वर्षं ती टिकून आहे. कारण सिंहासनावर बसलेल्या व्यक्तिची राजकारणात कधीच लुडबूड नसते. तो केवळ दंडकच नाही तर राज्यव्यवस्थेचा उभयपक्षी मान्य झालेला अविभाज्य भागच आहे. शिवाय सिंहासनाधिष्ठित व्यक्ती ही ‘चर्च ऑफ इंग्लंड’चीही प्रमुख असते. त्यामुळे तिच्या अस्तित्वाला धार्मिक अधिष्ठानही आहे. रोममधील कॅथेलिक धर्मप्रमुख पोपच्या अधिकारास इंग्लिश प्रॉटेस्टंट पंथीयांनी अशाप्रकारे तोलून धरलं आहे! फरक इतकाच की प्रत्येक पोपची निवड सुमारे १०० कार्डिनल्स बहुमताने करतात तर इंग्लंडचं राजघराणं हे वंशपरंपरागत सुरू रहातं. पूर्वी तर इंग्लंडच्या सिंहासनावर फक्त पुरुषालाच बसण्याचा अधिकार होता, पण आता तो मान स्त्रिलाही मिळू शकतो. त्याचमुळे राजघराण्यातली स्त्री गर्भवती झाली की तिला मुलगा होणार की मुलगी यावर प्रजाजनांचं लक्ष लागून रहातं.

आताची राणी एलिझाबेथ ही १९५३ साली अपघातानेच सिंहासनावर आरूढ झाली. तो मान तिच्या काकाचा, प्रिन्स एडर्वडचा होता. पण त्याने अमेरिकन घटस्फोट वॉली सिम्पसनबरोबर विवाह करण्याचं निश्चित केलं तेव्हा चर्च ऑफ इंग्लंडच्या तेव्हाच्या आर्चबिशपनी एडवर्डला सुनावलं होतं की विवाह केलास तर तुझा सिंहासनावरचा हक्क सोडून द्यावा लागेल. खर्या प्रेमवीराने तो हक्कच सोडून दिला म्हणून एलिझाबेथची वर्णी लागली. तिला पहिला मुलगा चार्लस्, मग मुलगी अॅना नंतर अँड्र्यू आणि शेवटी एडवर्ड अशी एकूण चार मुलं झाली. तिच्यानंतर सिंहासनाचा मान सरळ चार्लस्कडे जाईल. अॅना ही मुलगी असल्याने चार्लस्च्या मागोमाग अँड्र्यू आणि नंतर एडवर्ड असा क्रम होता. परंतु चार्लस्ला विल्यम आणि हॅरी दोन मुलं झाल्याने अँड्र्यूच्या आधी विल्यमचा नंबर परंपरेनुसार येतो. साहजिकच विल्यमची पत्नी केट मिडलटन हिने नुकत्याच जन्म दिलेल्या मुलाचा म्हणजेच प्रिन्स जॉर्ज याचा विल्यमनंतर क्रमांक आणि हक्क सिंहासनावर असेल. म्हणजेच त्याचे काका हॅरी, चुलत आजोबा अँड्र्यू आणि एडवर्ड यांना काही स्थान उरणार नाही. परंपरा शाबूत ठेवण्यातच कृतकृत्यता मानणार्या ब्रिटिश लोकांना ही पद्धत चांगलीच मानवते.

आता बाप झालेला विल्यम हा राज्यकन्या डायनाचा पहिला मुलगा, तो जन्मला तेव्हा त्याचे वडील चार्लस् हॉस्पिटलमध्ये जातीने हजर होते. तसंच आपल्या बाळाच्या जन्माच्यावेळीसुद्धा हजर राहण्याची विल्यमची इच्छा होती. आणि ती इच्छा पूर्ण झाली. कारण तो सध्या वेल्स राज्यात Rescue Pilot म्हणून काम करत असतो. नेमक्या बाळाच्या जन्माच्या वेळेस जर विल्यमला ड्युटी आली असती तर त्याचा नाइलाज झाला असता. मात्र मुलाच्या जन्माच्यावेळी तो हजर होता. त्याची पत्नी केट ही मिडलटन घराण्यामधली मुलगी. ती आपल्या कुटुंबीयांच्या म्हणजेच आईवडील आणि बहिणीच्या मानसिकदृष्ट्या खूपच जवळची आहे. तिचे आईवडील आपल्या नातवाच्या जन्माच्यावेळी जातीने उपस्थित राहिले. हे बाळंतपण लंडनमधील सेंट मेरीज् हॉस्पिटलमध्ये ‘लिंडोविंग’ या विभागात पार पडलं. त्यावेळी जगातल्या बहुतेक देशांतल्या प्रमुख वृत्तपत्रांचे वार्ताहर हॉस्पिटलच्या बाहेर ठाण मांडून बसले होते. केटला विल्यमशी लग्न केल्यानंतर राणी एलिझाबेथने Dutchess of Cambridge असा किताब बहाल केला म्हणजेच तिच्या राजघराण्यातील प्रवेशाला औपचारिकरित्या मान्यता दिली. कारण या राजघराण्यातल्या प्रत्येकाच्या मागे कोणत्या तरी बिरुदाचं शेपूट आवश्यक असतंच, जसा चार्लस् हा प्रिन्स ऑफ वेल्स तर त्याचा बाप प्रिन्स फिलीप हा ड्युक ऑफ एडिंबरो या नावाने ओळखला जातो!

ज्या लोकांना इंग्लंडची रॉयल फॅमिली ही बांडगुळासारखी वाटते, त्यांना केटचे वा कोणत्याही राजघराण्यातील व्यक्तिचे फाजील स्तोम माजवलं जातं असंच वाटतं. ही मंडळी समाजासमोर कोणता आदर्श ठेवतात, त्यांना कोट्यवधी पौंडाचे वार्षिक तनखे का द्यायचे असा त्यांचा सवाल असतो. चार्लस्ने डायनाशी घटस्फोट घेऊन त्याची जुनी प्रेयसी कॅमिला पारकर हिच्याशी पुनर्विवाह केला. अँड्र्यूने सॅरा फर्ग्युसनशी दोन मुली झाल्यावर घटस्फोट घेतला. राजकन्या अॅनाने तिच्या नवर्यास काडीमोड दिला. ही यांची वैयक्तिक आयुष्यं. जेव्हा विंडसर येथील राजवाड्यास आग लागली तेव्हा त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च ब्रिटिश जनतेनेच करावा अशी राणी एलिझाबेथची इच्छा होती. पण तेव्हा प्रचंड गदारोळ उठला. राणीला फक्त उपभोग हवे आहे, पण ती राजेशाही लाईफस्टाईल मात्र जनतेच्या पैशांनी शाबूत ठेवायला पाहिजे आहे, असा टीकेचा भडिमार होता. गेली दोन दशकं राणी तिच्या ‘उत्पन्नावर’ म्हणजेच तनख्यावर ४० टक्के आयकर भरते आहे. ते सुद्धा जनतेच्या दडपणाखाली. त्या आधी ती एक पाउंडसुद्धा कर भरत नव्हती! वास्तविक राणी ही जगातल्या अत्यंत श्रीमंत व्यक्तिंपैकी एक आहे. तिचे अनेक रेसचे घोडेदेखील आहेत. पण जोपर्यंत फुकटात, खर्च न करता, भागत होतं, तोपर्यंत राणी पदरला एक पाऊंड खर्चायला तयार नव्हती.

अनेक देशातल्या जनतेला हे आकलनच होऊ शकत नाही की जगामध्ये लोकशाही सर्वत्र रुजते आहे. अशा पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या राजघराण्याचे कशाला डांगोरे पिटले जातात? कारणं दोन. इंग्लंडच्या धाडशी दर्यावर्दींनी आणि शिस्तबद्ध राजकारण्यांनी एकेकाळी निम्म्या जगावर राज्य केलं. कारभाराबरोबरच आपली भाषाही त्या त्या देशांमध्ये रुजवली. त्यामुळे इंग्रजी भाषा येणं हे प्रतिष्ठेचं लक्षण बनलं. त्याचा पडताळा भारतातही येऊ शकतो. महाराष्ट्रात मराठी शाळा ओस पडत आहे पण इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्यासमोर पालक हातात देणगीचे चेक्स् घेऊन रांगा लावत आहेत. राजघराणं शाबूत रहाण्याचं दुसरं कारण म्हणजे सर्वसामान्य जनतेला राजा, राजेशाही, राजघराणं याचं सुप्त आकर्षण आणि धाक शेकडो वर्षं वाटत आला आहे. भारतातली संस्थानं विलीन झाली ती १९४७ मध्ये, संस्थानिकांचे तनखे बंद केले इंदिराजींनी १९७१ मध्ये, तरीही पूर्वीचे राजे राजकारणात विनासायास निवडून येतातच की. मग ते ग्वालियरचे शिंदे असोत की मध्यप्रदेशातलं वसुंधरा राजेंचं घराणं असो. महाराष्ट्रातही सातारकर उदयनराजे असतातच.

विसावं शतक लागून तीन दशकं उलटली तरी ब्रिटनमधली सरंजामशाही ही अस्तित्वात होतीच. राजघराण्याला वारस निर्माण होण्याच्यावेळी देशाचा गृहमंत्री आणि त्याचा सहकारी उपस्थित रहायलाच पाहिजे अशी परंपरा होती. म्हणजे अगदी ऑपरेशन थिएटरमध्ये नसला तरी हॉस्पिटलमध्ये असायलाच हवा अशी जणू सक्तीच असायची. त्याचंही कारण ३०० वर्षांचं जुनं होतं. दुसरा जेम्स तेव्हा राजा होता. त्याची पत्नी मेरी ऑफ मॉडेना या नावाने ओळखली जायची. तिने आपण गर्भवती आहोत अशी खोटीच हूल उठवली. कारण राजघराण्याला वारस देणं ही तिची जबाबदारी मानली गेली होती. तिची घटका जेव्हा भरली तेव्हा तिचं बाळ म्हणून एक नुकताच जन्मलेला मुलगा बाहेरून त्या बाळंतिणीच्या खोलीत आणला गेला आणि तो मेरीचा मुलगा म्हणून जाहीर केला गेला अशी अफवा होती. त्याला पुष्टी दिली ती राणी मेरीच्या सावत्र मुलीने. तिने जाहीरच केलं की जोपर्यंत मी मेरीला स्वतः मुलास जन्म देताना पहात नाही, तोपर्यंत तिने पुत्रजन्म दिला हे मी मानायलाच तयार नाही! अर्थात, जर मेरीला मुलगा झाला नाही, तर या सावत्र मुलीसच राज्यभिषेक होणार होता, म्हणून स्वार्थापोटीही तिने तशी घोषणा केली असेल. या सावत्र मुलीस-अॅना तिचं नाव, १७ वेळा गर्भवती रहाण्याचा योग आला होता पण प्रत्येकवेळी तिचा गर्भपात झाला होता!

मातृत्व म्हणजे स्त्रीत्वाची पूर्ती वगैरे भारतीय दृष्टिकोन या राण्यांना मान्य नसावा. व्हिक्टोरिया राणीची नऊ बाळंतपणं झाली. प्रत्येकवेळी हा देवाने स्त्रियांना दिलेला शाप आहे, अशी तिची प्रतिक्रिया असायची. लहान मूल म्हणजे आनंदाचा ठेवा असं कोणी म्हटलं की तिची प्रतिउत्तरं तयार होती. कसला आनंद? त्याच्या लहान बेडकासारख्या हालचाली, त्याचं रडणं, त्याला छातीला लावून धरणं – सर्वांचा मला अतोनात तिटकारा आहे. मात्र तिचा नवरा अल्बर्ट याला मुलांची खूप हौस असल्याने प्रत्येकवेळी व्हिक्टोरियास गर्भधारणा ही व्हायचीच! मेरी नावाची राणी तर सरळ म्हणायची, ‘मी गर्भार राहिली की राजवाड्याच्या भोवती वार्ताहररूपी गिधाडं घिरट्या घालायला लागतात. मला कसली कडू औषधं पौष्टिक म्हणून रिचवावी लागतात. शीः, काय हा भोग स्त्रिच्या वाट्याला येत असतो. त्याचं पुरुषांना कौतुक नसायला काय झालं? त्यांना प्रसूतिवेदना सोसायच्या नसतात.’ काही शतकांपूर्वी बाळंत होण्याआधी एक महिना आणि मूल झाल्यानंतर एक महिना राजघराण्यातली स्त्री एकाखोलीत कोंडून ठेवली जायची. तिथे पुरुषांना मज्जाव होता. त्यामागे सबळ कारणंही होती. वैद्यकशास्त्र एवढं प्रगत नव्हतं. बाळंतीण मरण्याचीही शक्यता अधिक होती. शिवाय वंशाला दिवा हवा असायचा. ते स्त्रिच्या हातात नसलं तरी तिच्यावर प्रचंड मानसिक ताण यायचा. आठव्या हेन्रीने तर मुलगा हवा म्हणून अगदी आकाशपाताळच एक केलं होतं.

जेव्हा बाळंतपणाच्या वेदना असह्य झाल्या तेव्हा व्हिक्टोरिया राणीने सरळ क्लोरोफॉर्म घेण्यासही कमी केलं नाही. त्यावर अर्थातच धर्ममार्तंडांनी टीका केली पण तिच्या निर्णयाला ब्रिटिश मेडिकल जर्नल्सनी पाठिंबा दिला होता. डायनानेही कोणतंही गुंगीचं औषध न घेता आपल्या दोन्ही मुलांना जन्म दिला होता. प्रिन्स अलबर्ट आणि एडवर्ड या दोघांनी आपल्या पत्नीच्या जवळ राहून बाळाचा जन्म कसा होतो हे प्रत्यक्ष पाहिलं होतं. पण चार्लस्चा बाप, आताच्या राणीचा नवरा, फिलीप मात्र चार्लस्च्या जन्माच्यावेळी स्कॉश हा खेळ खेळण्यात मग्न झाला होता!

प्राचीन काळी राजघराण्यात जन्मलेल्या बाळाला त्याच्या जन्मावस्थेतच वार्ताहरांच्या वा जन्माच्या साक्षीदारांसमोर सादर केलं जात असे. हेतू हा की बाळ निरोगी आणि निर्व्यंग आहे हे सर्वांना समजावं. रूढींना घट्ट चिकटून रहाणारं ब्रिटिश राजघराणं विसाव्या शतकाच्या शेवटी थोडंसं बदललं. डायनाने हॉस्पिटलमध्ये आपल्या मुलांना जन्म दिला. १९३० साली सध्याच्या राणीची धाकटी बहीण मार्गारेट जन्मली तेव्हा ब्रिटनचे गृहमंत्री हजर होते. त्यानंतर लोकप्रतिनिधींनी हजर राहण्याचा पायंडा मोडीत निघाला. नामवंत स्त्रियांची बाळंतपणं ही एक बहुचर्चित घटनाच होते. जेव्हा ऐश्वर्या राय-बच्चनने तिची मुलगी आराध्याला, अंधेरीच्या सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये जन्म दिला तेव्हादेखील लोकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

डायनाच्या मागे नेहमीफोटोग्राफर्सच्या झुंडी लागायच्या. त्यांच्या कॅमेर्यांपासून बचावण्याकरता तिच्या ड्रायव्हरने तुफान वेगाने गाडी चालवली आणि चाकावरचा ताबा सुटल्यावर भीषण अपघातात डायना, तिचा बॉयफ्रेंड डोडी आणि ड्रायव्हर हे तिघं तत्काळ निधन पावले होते. पूर्वी राज्याला वारस आला की जनतेला हत्तीवरून साखर वाटून गोड बातमी दिली जायची. आता ते संभवत नाही. तरीही बकिंगहॅम राजवाड्याच्या बाल्कनीतून नवजात अर्भकास जनतेला दाखवणं वगैरे प्रकार होणारच. आपण कोठे जन्म घ्यायचा हे कोणीच ठरवू शकत नाही. जन्मानंतर काय करावं याची फार तर रूपरेषा आखू शकतो. पण केटच्या भावी अपत्यास ते करण्याचीही गरज पडणार नाही. कारण त्याचं इंग्लंडच्या सिंहासनावर आरूढ होणं हे अटळ आहे. कपाळावर सटवाईने हे लिहूनच ठेवलेलं असणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *