चांगलं रुग्णालय म्हणजे काय?

झकपक इन्टीरिअर डेकोरेशन असलेलं, स्वच्छता, टापटीप असलेलं, सौजन्याने वागणार्या स्वागतिका, रुग्णालयाच्या दर्शनी भागात सहसा एखादी आकर्षक देवाची मूर्ती, स्वच्छ जीने आणि लिफ्ट असलेले-एखाद्या पंचतारांकित हॉटेलचा भास होईल असं रुग्णालय हे चांगलं रुग्णालय म्हणायचं का?

चांगले डॉक्टर म्हणजे कोण?

तुमच्याशी अनावश्यक प्रेमाने, आपुलकीने चेष्टा करत बोलणारे, तुमचं किंवा तुमच्या नातेवाईकांचं कौतुक करणारे, तुमच्या प्रकृतीविषयी काळजी वाटणारे परंतु फटाफट चाचण्या करायला सांगणारे आणि भरमसाठ औषधं लिहून देणारे (रुग्णाला घाबरवून सोडणारे) डॉक्टर चांगले, का सभ्य शब्दांत योग्य ती चौकशी करून किमान वैद्यकीय चाचण्यांचा सल्ला देणारे, सुरुवातीला एखाद्-दोन औषधं देणारे, तुमच्या आजाराबद्दल योग्य ती माहिती देऊन तुमचं मनोधैर्य वाढवणारे, तुमच्या प्रश्नांना उत्तरं देऊन तुमचं समाधान करणारे डॉक्टर चांगले?

असे प्र्रश्न आपण आपल्याला विचारतो का? विचारले पाहिजेत.

हल्लीचे दिवस असे आहेत की ‘पंचतारांकित’ रुग्णालयं शहराशहरांत वाढत आहेत. बहुतेक ठिकाणी अशी पंचतारांकित रुग्णालयं चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित केलेली असतात. चॅरिटेबल ट्रस्ट म्हणजे विश्वस्त संस्थेचं रुग्णालय. या कायद्याखाली असं गृहीत धरलेलं आहे की, ही समाजसेवेसाठी वैद्यकीय सेवा लोकांना पुरवण्यासाठी चालवली जातात. या ‘पंचतारांकित’ रुग्णालयाचं विश्वस्त मंडळ सदस्यांची नावं तपासली तर त्यात रुग्णालयातील प्रमुख डॉक्टर्स, त्यांचे नातेवाईक, अन्य भागधारक डॉक्टर्स अशांची नावं आढळतात, यात गैर काही नसतं. चार-पाच उच्चशिक्षित, विशेषज्ञ डॉक्टर्स अशारितीने अत्याधुनिक वैद्यकीय सेवा देणारं रुग्णालय उभं करतात. त्याचा रुग्णांना निश्चितच लाभ होत असतो. अशा रुग्णालयांचं व्यवस्थापन करणं अवघड असतं. अशी मोठी रुग्णालयं उभारणारे डॉक्टर्स नक्कीच अभिनंदनास पात्र असतात. त्याचं कर्तृत्व आणि कौशल्य वाखाणण्यासारखंच असतं.

मात्र अशा पंचतारांकित रुग्णालयांचा डोलारा सांभाळणं, आर्थिक शिस्त पाळणं ही तारेवरची कसरत असते. विश्वस्त असली तरी ‘ना-नफा, ना-तोटा’ या तत्त्वावर चालणारी ही संस्था नसते. म्हणूनच कायदेशीर तरतुदीप्रमाणे या रुग्णालयांना किमान १५ टक्के गरीब, गरजू रुग्णालयांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचं बंधन असतं. (हे प्रत्यक्षात घडत नाही किंवा त्याचा गैरवापर केला जातो) तसंच या रुग्णालयांनी रास्त दरात रुग्णांना वैद्यकीय सेवा द्यावी अशी अपेक्षा आहे. मोठी आर्थिक उलाढाल असलेल्या या रुग्णालयांतील अनेक तक्रारी आता पुढे येत आहेत. अनेक धनदांडगे प्रचंड आर्थिक गुंतवणूक करून रुग्णालयं उभारताना दिसतात. एकूणच विश्वस्त संस्थेच्या तरतुदींचा फायदा घेऊन ही रुग्णालयं विविध मार्गांनी रुग्णांची लूट करतात असा अनेकदा अनुभव येतो.

अशा मोठ्या ‘पंचतारांकित’ रुग्णालयात हल्ली नवीनच पद्धत सुरू झाली आहे. ती म्हणजे, रुग्णांना लिहून दिलेली औषधं रुग्णांनी आपल्या रुग्णालयातील औषधांच्या काऊंटरवरूनच खरेदी करावी अशी ‘सूचना’ दिली जाते. या रुग्णालयांच्या व्यवस्थापनाचा असा दावा असतो की रुग्णांना त्वरित औषधं मिळण्यासाठी केलेली ही सोय आहे. प्रत्यक्षात या औषध विक्रीतील नफा मिळवण्यासाठी अशी औषधांची दुकानं उघडलेली असतात. काही चिकित्सक, जागृत लोक आपण बाहेरून औषधं आणतो असं म्हणतात. पण रुग्णालयं त्यांना विरोध करतात, त्यांच्यावर दबाव आणतात.

पुण्यातील अशाच एका बड्या रुग्णालयात रुग्णालयाच्या डॉक्टरांनी लिहून दिलेलं औषध त्यांच्याच औषध काऊंटरवरून आणण्याची सक्ती रुग्णांच्या नातेवाईकांवर केली गेली. नातेवाईकांचं म्हणणं होतं आम्हाला हीच औषधं (त्याच कंपनीची) वितरकाकडून निम्म्या किमतीत मिळत आहेत तेव्हा सक्ती का? यावर व्यवस्थापनाने त्यांना सांगितलं की, ‘इथून औषधं घेणार नसाल तर रुग्णाला घरी घेऊन जा’, नातेवाईकांनी नाईलाजाने औषधं तिथेच खरेदी केली. परंतु नंतर ग्राहक न्यायालयात त्यांनी दावा केला आणि तो जिंकलाही!

रुग्णाने आमच्याच दुकानातून औषध घ्यायला हवं असं धोरण रुग्णालयं रुग्णांवर लादू शकत नाहीत, असा निर्णय ग्राहक न्यायालयाने दिला आहे. हे रुग्णालय अपीलात गेलं असल्याचं समजतं.

त्याचा निकाल काहीही लागो, पण रुग्णालयांची ही प्रथा सर्वथा चुकीची आहे, अशाचप्रकारच्या अनेक युक्त्या ही बडी, पंचताराकित रुग्णालयं वापरत असतात. तेव्हा रुग्णांनी जागृत होणं आवश्यक आहे.

त्यासाठी नेहमी चौकस दृष्टिकोन ठेवा, प्रश्न विचारा. आपले डॉक्टर आणि रुग्णालय काळजीपूर्वक निवडणं हाच शहाणपणा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *