‘तेरी जवानी… तपता महिना…’ या गाण्यावर लौंडा थिरकत होता. कंबर हलवत, मादक अदा करत, बेभान नाचला. गाणं संपताच त्याने बघणार्यांना विचारलं. ‘मजा आ रहा है?’ पाहणारे फार उत्साहाने प्रतिसाद देत नव्हते. ते पाहून पुढे तो म्हणाला ‘ये यहाँ सोने आये है, कि पैसे खर्च करके देखने आए है?. त्यानंतर प्रेक्षकांनी त्या लौंड्याबरोबर ठेका धरायला सुरुवात केली.

ओरिसाचा गोटीपुआ, बंगालचा जात्रा, छत्तीसगडचा नाच आणि महाराष्ट्राच्या तमाशाप्रमाणेच बिहार आणि उत्तर प्रदेशातील लौंडा हा एक पारंपरिक नाच आहे. या नाचात पुरुष महिलांचे कपडे घालतात आणि सांस्कृतिक कार्यक्रम, सण आणि उत्सवात हा नाच सादर करतात. लौंडा पारंपरिक नाचाची सुरुवात ११व्या शतकापूर्वीची आहे. लेखक ज्योतिश्वर ठाकूर यांनी दक्षिण भारतातील अनेक भाषांपैकी एका भाषेत लिहिलेल्या ‘वारणा रत्नाकर’ या पहिल्या विश्वकोषात विदावत शब्दाचा उल्लेख आहे. विदावत म्हणजे सादरकर्ता (परफॉर्मर). विदावत या शब्दाचा अपभ्रंश होऊन त्याचा विदापत हा शब्द तयार झाला. आणि नंतर विदापतातूनच १५ व्या शतकात लौंडा नाचाचा जन्म झाला.

‘लौंडा बदनाम हुआ’चे निर्माता मृत्यंजय प्रभाकर असून त्याचं लेखन, दिग्दर्शन आणि सादरीकरण करणारे एकमेव पंकज पवन म्हणतात, ‘महिलांची भूमिका पुरुषांनी सादर करण्याची परंपरा फार जुनी आहे. सरंजामशाहीच्या काळात महिला केवळ मंदिरात आणि शाही लोकांसमोर नाचत असत. सार्वजनिक ठिकाणी लोकांसमोर नाचायला महिलांना बंदी होती. त्यामुळे जनतेचं मनोरंजन करण्यासाठी पुरुष महिलांची वेशभूषा करून नाच सादर करत असत. पारसी थिएटरमध्येही पुरुषच स्त्री पात्रांचं काम करत असत. आणि ते एवढं लोकप्रिय झालं होतं की श्रीमंत घराण्यातील महिला गृहिणी म्हणून आपल्या जबाबदार्या समजून घेण्यासाठी ही नाटकं बघत असत. लोक आता लग्नात, समारंभात नाच करण्यासाठी पुरुष कलाकारांना आमंत्रित करत नसल्यामुळे या लौंडा नाच या लोककलेचा र्हास होत आहे.’ याबाबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे संशोधक-अभ्यासक प्रभाकर यांनी सांगितलं की, ‘हळूहळू लौंडानृत्याची जागा मनोरंजन कार्यक्रमातील नवनवीन पद्धतींनी घेतली आहे.’ बिहारच्या सोपोलमधील पंकज पवन यांना त्यांच्या वडिलांनी लौंडानाच सादर करण्यासाठी जरी विरोध केला असला तरी लहानपणापासूनच त्यांना लौंडा नाचाविषयी खूप माहिती होती.

जेव्हा पंकज पवनचे कुटुंब दिल्लीत राहायला गेलं तेव्हा ते एका नाटकाच्या ग्रूपमध्ये सामील झाले. चार वर्षांपूर्वी एका परिचित व्यक्तिने बिहारच्या बेगुसरायमधील एका ब्राह्मण कुटुंबातल्या आपल्या मित्राबद्दल त्यांना सांगितलं की, तो स्वतःला स्त्री समजत होता आणि एखाद्या स्त्रिप्रमाणेच राहण्याची त्याची इच्छा होती. पंकज पवन जेव्हा त्या मुलाला भेटायला गेले तेव्हा त्यांना तो आपल्या कुटुंबाच्या दबावामुळे अपराधी भावनेत घुसमटलेला आढळून आला.

सहा महिन्यांनंतर पुन्हा जेव्हा पंकज त्याला भेटायला गेले तेव्हा समजलं की तो घर सोडून गेलाय आणि स्वतःच्या मर्जीप्रमाणे जगण्याची हिंमत त्याला मिळाली आहे. पंकज पवन म्हणतात, ‘या घटनेने माझ्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला होता. त्यामुळे या विषयावर मी जेवढं शक्य होईल तेवढं वाचन केलं. यामध्ये भिखारी ठाकूरच्या यांच्या ‘बिदेसिया’ आणि जयशंकर सुंदरी यांच्या ‘कुछ आँसू कुछ फुल’चे संदर्भही शोधून काढले आणि बालगंधर्वांचाही अभ्यास केला. यामधून मला या कलेतील सौंदर्य जाणवलं आणि या कलेचा होत गेलेला र्हास बघून मला खूप वाईट वाटलं आणि आपणच एक नाटक लिहिलं पाहिजे असं मला जाणवलं.’

या नाटकात पवन या कलेच्या र्हासासाठी पुरुषांच्या मानसिकतेला दोष देतात. पवन म्हणतात, ‘पुरुष प्रथम महिलांना घराबाहेर जाऊन सादरीकरण करण्यास मनाई करतात. आणि स्त्रीची भूमिका साकारणार्या पुरुषांवर वाईट टीकाही करतात.’ दोन्ही बाजूने बोलणार्या पुरुषांवर टीका करताना पंकज पवन यांनी आपल्या नाटकातून प्रेम, लग्न, स्त्रीभ्रूण हत्या, महिलांविरुद्ध गुन्हे, अत्याचार तसंच सोनी सोरी आणि मनोरमादेवी यांच्यावरील बलात्कार अशा अनेक विषयांवर भाष्य करतात. पुरुष महिलांना उपभोगाची वस्तू समजतात. आणि हेच चित्र आपल्या समाजात निर्माण झालं आहे. यातूनच लग्नानंतर पुरुष हा केवळ आपल्या पत्नीचा नवरा न राहता तिचा मालकही बनतो अशी पुरुषांची धारणा झाली आहे.

आज या कलाकारांना आणि लोककलेला लोकांकडून मान्यता मिळत नाहीये, सरकारचं दुर्लक्ष होतंय तसंच लोकांना हवे असलेले ठरावीक नाच आणि कुटुंबांचा मुलांना या क्षेत्रात यायला असलेला विरोध या सर्व कारणांमुळे लोक कलावंतांना जगणं कठीण झालं आहे. आणि हाच राग पवनच्या नाटकामधल्या नाचामध्ये ठळकपणे जाणवतो. एकूणच पवनच्या स्वतःच्या दुःखाचं आणि वैफल्याचंच दर्शन आपल्याला नाटकात घडतं. पवन म्हणतात, ‘जरी माझ्या वडिलांनी मला कलाकार म्हणून स्वीकारलं असलं तरी अजूनही ते मला लौंडा बनून स्त्रिच्या रूपात स्वीकारायला तयार नाहीत.’ पवनच्या मनातील दुःख आणि नाटकाविषयी असलेली तळमळच त्याचं एकपात्री नाटक पाहण्यास भाग पाडतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *