श्रावण महिना सुरू झाल्यावर विविध सणांचीही सुरुवात होते. यातच तरुणांचा आवडता सण येतो तो म्हणजे गोपाळकाला. श्रावण वद्य अष्टमी, म्हणजेच जन्माष्टमीचा उत्सव आता केवळ कृष्णजन्मापुरता मर्यादित न रहाता ‘दहीहंडी’ म्हणून प्रसिद्ध झाला आहे. कृष्णाने शिंक्यावर बांधलेलं दूध आणि दही काढायला चार बालगोपाळांना जमवून घरातल्या घरात म्हणजेच नऊ फुटांपेक्षा कमी उंचीची दहीहंडी केली असेल पण आज मुंबईसारख्या शहरात मात्र या दहीहंडीने ३० फुटांहूनहीवर उंची गाठली आहे. आणि या दहीहंडीचा महत्त्वाचा साईड इफेक्ट आहे म्हणजे त्यात भाग घेणार्या गोविंदांना होणारे अपघात.

गोविंदाच्या या उत्सवात विविध वयोगटातले लोक सहभागी होतात. त्यामध्ये १५ ते ३० वयोगटातील मुलं आणि साधारण दोन टक्के मुली या हाड मोडणं, पाठीच्या कण्याला इजा तर कधी त्याने होणारे Paraplegia (पाय निकामी होणं), छातीच्या बरगड्यांना लागलेला मार, डोक्याला मार (Head Injury) अशा विविध अपघातांना सामोरे जातात आणि सणाच्या आनंदावर विरजण पडतं. यात एखादा जीवालाही मुकतो. विचार करा परंपरा जोपासताना त्याचं स्वरूप या थराला जावं का की दहीहंडीचे थर रचताना थरकाप होऊन निसटून पडल्याने उभं आयुष्यच निकामी व्हावं. काही वेळा अपघातांचा शास्त्रोक्त अभ्यास हा आपल्याला अपघात टाळण्याच्या दृष्टीने एक उपयुक्त दृष्टिकोन देऊन जातो.

२०११ साली केईएम मधील अस्थिव्यंग चिकित्सा विभागाने केलेला अभ्यास नुकताच वाचनात आला तो असा…

दहीहंडीच्या दिवशी झालेल्या अपघातांत ५० टक्क्यांहून अधिक अपघात संध्याकाळी सहानंतर घडले आहेत. यामध्ये दुसर्या, तिसर्या आणि चौथ्या थरावरच्या गोविंदांचं जखमी होण्याचं प्रमाण ५० टक्क्यांहून अधिक होतं आणि ८० टक्क्यांहून अधिक लोकांना हंडी उतरवत असताना अपघात झाला आहे. तर यामध्ये ३० फुटांहून अधिक उंचीवरच्या हंड्या फोडताना झालेले अपघात ५८ टक्के  होते.

हजारातील बक्षिसाची रक्कम आज लाखावर गेली आहे पण लाखमोलाचंच नव्हे तर होतकरू तरुणांचं अनमोल आयुष्य पणाला लावताना जास्त प्रशिक्षणाची निश्चित गरज आहे. दहीहंडीकडे एक Skilled Sport किंवा खेळाच्या स्वरूपाने बघितलं तर त्यातील अपघातांच्या अभ्यासावरून काढलेला निष्कर्ष बोलका ठरतो. दहीहंडीचा Pyramid उतरताना गोविंदा कोसळतात आणि त्यात अपघाताची शक्यता सर्वात जास्त असते त्यामुळे याचं नेमकंप्रशिक्षण व्यायामशाळांतूनदेता यायला हवं. ज्यांनी प्रशिक्षण घेतलेलं नाही अशा गोविंदांनी ते प्रशिक्षण पूर्ण करून पुढच्यावर्षी दहीहंडीत सहभाग घ्यावा. ३० फुटांच्या नव्हे तर २५ फुटांच्यावर दहीहंडी निश्चित असू नये आणि तरीही करायचीच असली तर सर्कशीत वापरलं जातं तसं सुरक्षेकरता जाळं लावण्याची व्यवस्था असावी आणि ती दहीहंडी ट्रॅफिक अडेल अशा जागी नक्कीच नसावी.

दहीहंडी फोडायची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच असावी, कारण सहा वाजल्यानंतर अपघातांचं प्रमाण दुप्पटीने वाढलेलं दिसतं. यासाठी कमी प्रकाश आणि दिवसभराचा थकवा ही दोन्ही कारणं असू शकतात. तेव्हा श्रावणातल्या सणांचं पारंपरिक महत्त्व जपत त्याचा Insurance काढण्याची वेळ आली असता तो claim करायला लागू नये याची काळजी ‘गोविंदांनी’ योग्य प्रशिक्षणाद्वारे जरूर घ्यावी हीच सदिच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *