भारतामध्ये सणांना विशेष महत्त्व आहे. भारतात सारेच सण गुण्यागोविंदाने  साजरे केले जातात. सगळे समूदाय एकत्र येऊन एकमेकांचे सण साजरे करतात त्यामुळे सगळ्याच सणाला खूप धमाल मस्ती असते. प्रत्येक सणाचं असं एक वैशिष्ट्य असतं आणि त्यामुळे प्रत्येक सणाला आवश्यक असलेल्या वस्तू त्यावेळी बाजारात मिळतात. दिवाळी आली की दुकानांमध्ये फराळ, दिवे, फटाके यांची रेलचेल असते तर ईदला खारीक, बदाम, काजू तर कपड्यांमध्ये पठाणी, शेरवानी याची विक्री बाजारात होताना दिसते. श्रावण महिन्यात तर नागपंचमी, दहीहंडी, गणेशोत्सव यांसारखे अनेक सण येतात. दहीहंडी तर काही दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि त्यामुळे दहीहंडीसाठी लागणार्या वस्तू बाजारात सर्वत्र दिसत आहेत. दहीहंडीमध्ये सगळ्यात जास्त विक्री ही मटक्यांची होती. कुर्ल्याला असंच मटक्याचं एक मार्केट आहे आणि इथे दहीहंडीसाठी वापरण्यात येणारी खास डिझाईनची मटकी मिळत असल्याने या बाजाराला गोविंदा बाजार असंच म्हटलं जातं.

कुर्ला रेल्वे स्टेशनच्या बाहेरच कुर्ला पश्चिमला हा गोविंदा बाजार भरतो. गेली ६० वर्षं दहीहंडी या सणाच्या सुमारास दहीहंडीसाठी लागणारं साहित्य इथे मिळतं. जेठवाजींच्या वडिलांनी सुमारे ६० वर्षांपूर्वी या ठिकाणी एक छोटसं दुकान सुरू केलं होतं. या दुकानात सगळ्या प्रकारची मातीची भांडी विकली जात असत. पण त्यांच्या मातीच्या भांड्यांची लोकप्रियता इतकी वाढली की त्याच मार्केटमध्ये त्यांनी चार दुकानं घेतली. सुरुवातीला सारी मातीची भांडी दुकानातच बनवली जात होती. पण कामाचा व्याप वाढल्यावर तितकी भांडी दुकानात बनवणं त्यांना आता शक्य होत नाही. त्यामुळे आता सारी मातीची भांडी, दहीहंडीसाठी लागणारं साहित्य म्हणजेच मटकी, दोरी सारं काही गुजरातमधून मागवलं जातं. पण मटक्यांवर नक्षीकाम आजही त्यांच्याच दुकानात केलं जातं. त्यांच्या दुकानात केलं जाणारं हे नक्षीकाम अप्रतिम असतं. दहीहंडीच्या या हंड्यांमध्ये गुलाबी, राणी, पिवळी, लाल आणि हिरवी असे प्रकार असतात. तर यात मध्यम, मोठी आणि जम्बो असे तीन आकार असतात.

हंड्यांच्या या आकारावरूनच त्या हंड्यांच्या किमती ठरतात. सगळ्यात लहान आकाराच्या हंडीची किंमत ही १२५ रुपयांपासून ते अगदी तीनशे रुपयांपर्यंत असते. मात्र राणी हंडी ही सगळ्यात महाग असते. अगदी छोटी आकाराची राणी हंडीदेखील बाकी इतर लहान हंडीच्या तुलनेत खूप महाग असते. या हंडीचा आकार जसजसा वाढेल तसतशी या त्यांची किंमत अधिक वाढत जाते.

हंडी ही ज्या रस्सीत ठेवून मोठ्या रस्सीला बांधली जाते तिला सिक्का असं म्हणतात. तो सिक्कादेखील इथे मिळतो, या सिक्क्याची किंमतदेखील हंडीच्या आकारानुसार वाढत जाते. म्हणजे सगळ्यात लहान हंडीच्या आकाराचा सिक्का हा २५ ते ३० रुपयांना मिळतो. तर मोठ्या आकाराच्या सिक्क्यासाठी याच्या पाच ते दहापट किंमत मोजावी लागते. तसंच साधी रस्सीही या मार्केटमध्ये १५ रुपये मीटर या दराने मिळते. हे मार्केट सकाळी दहा ते रात्री दहा या वेळात सुरू असतं. दहीहंडीच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी या मार्केटला यावेळी नक्कीच भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *