आजचा अंधेरी पूर्व येथील मरोळ हा परिसर कधीकाळी एका राज्याची राजधानी होता यावर तुमचा विश्वास बसतो का? नाही ना, पण तरीही ते एक ऐतिहासिक सत्य आहे. भीमदेव राजा आणि त्याचा पूत्र प्रताप याने चौदाव्या शतकात ठाण्याहून आपली राजधानी मरोळ येथे नेली. मरोळच्या परिसराला त्याने प्रतापपूर असं नाव दिलं होतं.

देवगिरीचा भीमदेव राजा दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीकडून पराभूत होऊन देवगिरीहून उत्तर कोकणात ठाणे ही राजधानी करून राज्य करू लागला. भीमदेव राजा लढवय्या होताच परंतु तो द्रष्टा राजा होता. राजा भीमदेव आणि त्याचा पुत्र प्रताप यांनी अनेक मंदिरं, तीर्थक्षेत्रं उभी केली. भीमदेव राजाने त्यावेळच्या महिकावती म्हणजेच आताचा माहिम किल्ला उभा केला होता. आजही हा किल्ला जीर्णावस्थेत आपल्याला पहायला मिळतो.

मरोळ त्यावेळी ठाण्यातील साष्टी तालुक्यातील गाव होतं. मरोळची वस्ती त्याकाळी देखील भरपूर होती. मरोळच्या आजूबाजूचा परिसर अतिपुरातन काळापासून पवित्र मानला जातो. मरोळपासून अगदी जवळ असलेली जोगेश्वरी गुंफा त्याचं ज्वलंत उदाहरण आहे. अतिपुराण काळापासून आदिमानव डोंगरदर्यांमध्ये गुहा खोदून रहायचे.

वनवासात आणि अज्ञातवासात असताना पांडवदेखील काही काळ या गुहेत राहिले होते. जोगेश्वरी गुंफेतून महाकाली येथे जाणारा भुयारी मार्ग होता आणि पांडव अज्ञातवासात असताना आपली ओळख कुणाला होऊ नये याकरता या मार्गाचा वापर करत असल्याचं म्हटलं जातं. अशा या ऐतिहासिक गुंफेच्या परिसरात रहाणार्यांनी हा परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिलं पाहिजे. मुंबई महानगरपालिका, राज्य सरकारनेही इतका प्राचीन ऐतिहासिक वारसा असलेल्या या ठेव्याला उत्तमप्रकारे जतन करून हा परिसर परदेशी पर्यटकांना आकर्षित करू शकेल अशा योजना राबवल्या पाहिजेत.

मरोळ आणि जोगेश्वरी गुंफा यांच्या मध्यभागी महाकाली गुंफा आहेत या गुंफाचा वापर बौद्धभिक्खूप्रार्थनेसाठी आणि वास्तव्यासाठी करत असत. महाकाली गुंफा म्हणून प्रसिद्ध असलेलं काळ्या पहाडात खोदकाम करून एकूण १९ गुंफांमध्ये उभारलेलं स्मारक कोंडीविटे गुंफा या नावाने ओळखलं जायचं. भीमदेव राजाचा पुत्र राजा प्रतापबिंब प्रजाहितदक्ष राजा होता. त्याने अनेक मंदिरं आणि तीर्थक्षेत्रं निर्माण केली. गुजरात येथील मलिक निकू या जुल्मी राजाने प्रतापपुरवर आक्रमण करून या परिसरातील मंदिरं उद्ध्वस्त केली आणि मूर्तिची मोडतोड केली.

मुस्लीम आक्रमकांनी त्यानंतर आपला मोर्चा महिकावती अर्थात माहिमच्या किल्ल्यावर वळवला आणि तो किल्ला जिंकला. १५ व्या शतकांत मुस्लीम संहारक मुबारक शहा याने मंदिरं आणि शहर उद्ध्वस्त केलं. भायखळ्याच्या युद्धात राजा नगरदेवाला हरवून मुंबई पादाक्रांत केली. हाजीअलीचा दर्गा आणि माहिमची मशीद याच काळात निर्माण झाली.

१६ व्या शतकात पोर्तुगीजांनी वांद्र्याच्या खाडीतील मुस्लिमांचा पाडाव केला. पोर्तुगीजांनीदेखील येथे चर्च उभारलं. १६६१च्या मॅरेज ट्रीटीनुसार पोर्तुगीजांनी मुंबई बेट ब्रिटिशांना आंदण दिलं. मात्र साष्टी बेट त्यांनी आपल्याकडेच ठेवलं.

१५७९ साली सुमारे ५०० कुटुंबीयांनी पहिलं धर्मांतर घडवून आणलं. यापैकी काही कुटुंबं मरोळ येथील होती. १५८८ साली दुसरं धर्मांतर झालं यावेळी मरोळगावतील बहुसंख्य लोक सामील झाले आणि अन्य १३ गावांतील लोकांनी त्यांचं अनुकरण केलं.

१५७९ साली कोंडीविटे येथे पहिलं चर्च स्थापन करण्यात आलं. या चर्चचं नाव सेंट जॉन बॅप्टिस्ट चर्च असं होतं. १८४० साली कोंडीविटे येथील चर्च मरोळ येथे स्थलांतरित करण्यात आलं. या चर्चचं नाव सेंट जॉन इव्हान्जेलिस्ट चर्च कधी झालं याचा काही पुरावा उपलब्ध नाही. या चर्चच्या प्रांगणात अवर लेडी वुईथ चाईल्ड जीजसची पुरातन मूर्ती आजही पहायला मिळते. कोंडीविटे येथील उद्ध्वस्त झालेल्या चर्चमध्ये १९७३ पर्यंत वर्षातून एकदा प्रार्थना होत असे. सरकारने सिप्झच्या निर्मितीसाठी ही जागा ताब्यात घेतली आणि त्या ठिकाणी प्रार्थना होणं बंद झालं. त्यानंतर ख्रिस्तींच्या वाढत्या लोकसंख्येनुसार १९४३ साली चकाला येथे होली फॅमिली चर्च तर १९८१ साली मरोळ मरोशी रोड येथे सेंट विन्सेन्ट पॅलोटी चर्चची स्थापना करण्यात आली.

सन १९२० साली ठाणे जिल्ह्यातील दक्षिण साष्टी तालुक्यातील ८६ गावं मुंबई शहरात सामील करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हा जाहीर करून मुंबईच्या हद्दी विस्तारित करण्यात आल्या. ८६ गावांपैकी अंधेरी तालुक्यात ५३ गावं आणि बोरीवली तालुक्यात ३३ गावं विभागली गेली. अंधेरी तालुक्यातील ५३ गावांपैकी १४ गावं आरे कॉलनीच्या निर्मितीसाठी समाविष्ट करण्यात आली.

१४ व्या शतकापासून आतापर्यंत मरोळचं मोठेपण सातत्याने वाढतच राहिलं. आखाती देशातून मसाल्याच्या पदार्थांचा व्यापार चालायचा. आखाती मसाल्याच्या पदार्थांची गलबतं माहिमच्या खाडीला लागायची आणि तिथून मिठी नदीच्या पात्रातून छोट्या बोटीद्वारे मरोळपर्यंत हा व्यापार चालायचा.

मरोळ परिसर पवई लेक, विहार लेक, तुलसी लेक या पाण्याचे साठे असलेल्या तलावांनी समृद्ध असा प्रदेश होता. मिठी नदीच्या दुतर्फांचा परिसर कसदार जमिनीमुळे शेतीला पुरक होता आणि पिकंसुद्धा डौलाने डोलायची. जागोजागी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी पिण्याचं पाणी पुरवायच्या आणि याच पाण्यावर आंब्याच्या वाड्या, काजुवाडी, चिकुवाडी आपली ओळख करून देत होत्या.

आजच्या आधुनिक काळातही आंतरराष्ट्रीय विमानतळं, पंचतारांकित हॉटेल्स्, वर्सोवा ते घाटकोपर या मरोळच्या वेशीवरून धावणारी मेट्रो, राहत्या घराच्या सुसज्ज वसाहती आरे कॉलनीसारखा घनदाट वृक्षराजींनी वेढलेला परिसर, सेव्हन हिल्ससारखे तारांकित हॉस्पिटल, टिव्ही चॅनेल्सचे स्टुडिओ अशा अनेक गोष्टी मरोळची शान आहे. महापालिकेत आणि राज्याच्या विधानसभेत या विभागातून प्रतिनिधित्व करणार्या मान्यवरांनी मरोळची शान आणि सौंदर्य वाढवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत अशी अपेक्षा आहे. मरोळगावातील रस्त्यांची दुर्दशा दयनीय आहे. पदपथ आणि रस्त्यावर अनधिकृत बांधकामांनी अतिक्रमणं केली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा गावकर्यांच्या सहभागाने वृक्षरोपणाची मोहीम राबवावी, ठरावीक अंतरावर स्त्री-पुरुषांसाठी स्वच्छ, सुंदर प्रसाधनगृहं व्हावीत, खेळण्याची मैदानं, बगिचे स्वच्छ-सुंदर राखली जावीत. मुलांना शाळा कॉलेजमध्ये सहजपणे प्रवेश मिळावा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व्यायामशाळा, ग्रंथालयं, विविध खेळांसाठी मार्गदर्शन केंदं्र उभारली जावीत.

चौदाव्या शतकात एका राज्याची राजधानी असलेल्या मरोळ परिसराला स्वच्छतेचं-सुंदरतेचं वैभव प्राप्त व्हावं असं कार्य लोकप्रतिनिधींकडून व्हावं हीच अपेक्षा.

 निलन हरिश्चंद्र मुरांजन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *