अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाचा सरकारने निश्चय केला आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे. परंतु इतिहासाची साक्ष असणार्या दुर्मीळ वस्तुंची जपणूक करण्यासाठी सरकार उदासीन असल्याचं नेहमीच दिसून येतं. औरंगाबादच्या डॉ. शांतीलाल पुरवार यांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य ऐतिहासिक वस्तुंच्या संग्रहासाठी वेचलं. पण आता त्यांच्या मृत्युनंतर त्यांनी तयार केलेल्या या संग्रहाचं व्यवस्थित जतन करण्यासाठी सरकारी इच्छेबरोबरच लोकसहभागाचीही गरज आहे.

महाराष्ट्राला खूप मोठा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा लाभला आहे. यामध्ये अनेक वास्तू तसंच वस्तुंच्या रूपात आपल्याला समृद्ध इतिहासाची साक्ष देतात. अशाच ऐतिहासिक वस्तुंचा संग्रह औरंगाबादच्या डॉ. शांतीलाल पुरवार यांनी केला आहे. आपलं अवघं आयुष्य त्यांनी या संग्रहासाठी वेचलं. स्वखर्चाने या वस्तुंचा योग्यप्रकारे संग्रह करून त्या वस्तुंचं जतन केलं. आता त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा प्रकाश पुरवार या वस्तुंचं संग्रहालय करण्यासाठी झटत आहे. पुरवार यांनी त्यांच्या घरातच या १७ हजार ऐतिहासिक वस्तुंचं संग्रहालय तयार करून त्याला आपली आई कौशल्या पुरवार यांचं नाव दिलं आहे.

औरंगाबादच्या या ‘मातोश्री कौशल्या पुरवार म्युझियम’मध्ये अश्मयुगीन ते ब्रिटिशकालीन अनेक दुर्मीळ वस्तू जतन करून ठेवलेल्या आहेत. त्यांच्याकडील हा संग्रह तर अतिशय अनमोल आहेच परंतु त्यातील काही वस्तुंचा ठेवा हा अतिप्राचीन, वैशिष्ट्यपूर्ण आणि विविधता जपणारा आहे. या संग्रहालयात त्यांनी विविध वस्तुंची विभागणी सोळा दालनात करून त्यांची जपणूक केली आहे. त्यामध्ये विषयानुसार या दालनांची विभागणी केलेली असल्यामुळे काळानुसार इतिहासाची माहिती मिळते.

पहिलं दालन – धर्म आणि ईश्वर तसंच देवदेवता यांचं दर्शन या दालनात घडतं. यात सर्व धर्मांचं तत्त्वज्ञान, ईश्वराची संकल्पना त्यावर आधारित दुर्मीळ पुराणवस्तू आणि ग्रंथ आहेत. यामध्ये औरंगजेबाने स्वतःच्या हाताने लिहिलेलं कुराण-ए-शरीफ आहे. त्याचप्रमाणे गुरूचरित्राचं एक हस्तलिखित आणि इतर धार्मिक ग्रंथही या दालनात पाहता येतात.

दुसरं दालन – हे दालन पाषाणयुगी वस्तुंचं आहे. यात औरंगाबाद परिसरातील अश्मयुगीन मानव वापरत असलेली दगडाची (जॅस्पर) हत्यारं, मातीचे दिवे पहायला मिळतात. टेरा कोटा हे सातवाहनकालीन पेण्टल आपल्याला पहायला मिळतं. त्याचप्रमाणे अश्मयुगीन मानवाच्या अंगठ्याचा ठसा असलेला वैविध्यपूर्ण दिवादेखील पहावयास मिळतो.

तिसरं दालन – हे निसर्गदालन असून यात प्रामुख्याने संस्कृतीच्या उदयाचे अवशेष, जीवाश्म, वनस्पती फॉसिल स्वरूपात मांडल्या आहेत. यात हडप्पापूर्व आणि हडप्पा नंतरच्या कालखंडाची माहिती मिळते. यात भारतीय संस्कृतीचा उदय, प्रगती, राज्य, संकल्पना संस्कृती विकास दाखवला आहे. सातवाहन, गुप्त, फुशाण, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकुट राजवटीची माहिती मिळते आणि त्याकालीन वस्तुही पहायला मिळतात.

चौथं दालन – हे शिल्पाचं दालन असून यात मृण्मूर्ती, पाषाण शिल्पं, धातू, ब्राँझ, काष्ठशिल्पं आहेत. यात स्फटिक, रत्न, चांदी, तांबं यांपासून बनवलेल्या मूर्तिही आहेत. या दालनात २३०० वर्षांपूर्वीची यक्षिणीची ब्राँझची मूर्ती आहे. फक्त ब्रुसेल्स संग्रहालयातच आढळणारी हयग्रीवाची मूर्तिही आढळते. तसंच नालंदा विद्यापीठात तयार झालेली एक टेराकोटाची बुद्धमूर्ती, यादवकालीन मूर्ती, सम्राट कृष्णदेवराय यांच्या काळातील नागदेवतेची मूर्ती स्फटिकाचा नृसिंह, सायफनचा (जलवहनाचं एक तंत्र) हत्ती आदी वस्तू तर आहेतच परंतु याबरोबर जहर मोहरा (एखाद्या द्रव्य पदार्थात विष असेल तर हा जहर मोहरा ताबडतोब रंग बदलतो) आदी वस्तू आहेत.

पाचवं दालन – हे चित्रांचं दालन असून खिळवून ठेवणार्या या दालनात कागद, हस्तिदंती, काचेवरील मुघल आणि राजपूत शैलीतील चित्रं आहेत. तसंच अजिंठा लेणीतील चित्राच्या प्रतिकृती, नक्कल, लघुचित्रंही आहेत.

सहावं दालन – यात हस्तलिखित पोथ्यांचं दालन आहे. सात विविध धर्म आणि भाषेतील धार्मिक सचित्र पोथ्या, ग्रंथ आदी आहेत. त्यात प्राकृत, फारसी, अरबी, उर्दू ग्रंथ आहेत.

सातवं दालन – हे शस्त्रास्त्रांचं दालन आहे. यात आदीमानवाच्या काळापासूनची शस्त्रं, त्यांचा विकास दर्शवला आहे. त्याचप्रमाणे दांडपट्ट्यासहित सोळा प्रकारच्या तलवारीदेखील या ठिकाणी आहेत आणि हलक्या आणि वजनदार धातुंची शस्त्रं, ग्रीक अरबांची इसवी सनापूर्वीच्या शुद्ध पोलादाच्या भारी तलवारी आहेत.

आठवं दालन – नाणी, मुद्रा, शौर्य पदकं या दालनात मांडली आहेत. इ.स.पूर्व ६०० या काळापासून ते आजपर्यंतची नाणी आपल्याला दिसतात.

नववं दालन – हे काष्ठशिल्प आणि काष्ठ कामाचं दालन असून यात जुन्या शैलीनुसार वास्तुशिल्पातील लाकडी खांब, कोपरे, कमानी, लाकडी मूर्ती आणि कलाशिल्पं आहेत.

दहावं दालन – विविध प्रकारच्या मण्यांचं हे दालन आहे. यात इ.स.पूर्व ९०० पासून ते विविध कालखंडात सापडणारे आणि आभुषणात वापरण्याचे मणी आहेत.

अकरावं दालन – हे वस्त्र, प्रावरणांचं दालन होय. यामध्ये मराठे, राजपूत, मोगल काळातील पोशाखापासून ते पेशवाईपर्यंतची वस्त्रं आहेत. यात मुख्य आकर्षण अर्थातच सातवाहन काळातील पैठण ते रोम, ग्रीस, इजिप्तपर्यंत जाणारी पैठणी ही आहे आणि तीही सुवर्णकाम असलेली.

बारावं दालन – हे आभूषण दालन म्हणजे अर्थात खजिना असून महिलांना ते अधिक भावतं. यामध्ये रत्नांचा आणि आभूषणांचा संग्रह आहे.

तेरावं दालन – या भौगोलिक दालनात आदिवासींच्या वस्तुंचा संग्रह आहे.

चौदावं दालन – हे सौंदर्य कलादालन असून यात विविध काळातील दिवे, गृहोपयोगी वस्तू, काचेच्या वस्तू, गंजिफा, दौती आदी वस्तू आहेत.

पंधरावं दालन – हे संगीत दालन आहे. यात वेगवेगळ्या वाद्यांचा संग्रह आहे.

सोळावं दालन – हे आयुर्वेद दालन असून यात प्राचीन काळापासून वापरात असणार्या वनस्पती तसंच त्या संबंधीचे प्राचीन ग्रंथ यांचा संग्रह आहे. याशिवाय युवादालन, आशिया दालनात परदेशातील वस्तुंचा संग्रह आहे. परदेशातील नाणी आणि चलनाचाही संग्रह आहे. तसंच बिद्री कलावस्तुंचंही दालन आहे.

डॉ. पुरवार यांनी हे संग्रहालय आपल्या घरातच उभारलं आहे. त्यामुळे हे पाहण्यासाठी पर्यटकांना पूर्व परवानगी घ्यावी लागते. मग पुरवार हे वस्तुसंग्रहालय दाखवण्याची व्यवस्था करतात. प्रकाश पुरवार यांनी प्रयत्नपूर्वक आपल्या वडिलांनी जमवलेला ऐतिहासिक वारसा जपला आहे. दि. डॉ. शांतीलाल पुरवार यांनी या संग्रहालयासाठी शासनाकडे जागा मागितली होती. त्यांच्या निधनानंतर प्रकाश पुरवार हेदेखील जागेसाठी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र शासनाकडून पुरवारांची उपेक्षा होत असून निराशाच पदरी पडत आहे. शासन याबाबतीत उदासीनच आहे. समुद्रात स्मारक उभारण्यासाठी उत्सुक असणारं शासन खर्या अर्थाने ऐतिहासिक आणि पुरातन वारसा जपणार्या या संग्रहालयाबाबत गांभीर्याने विचार करत नाही.

जर संग्रहालयासाठी जागा मिळाली तर त्या ठिकाणी संग्रहालय होऊन घरात अडकलेल्या पुरातन वस्तू सर्वांसाठी खुल्या करता येतील. औरंगाबादच्या ऐतिहासिक वैभवात भर पडेल आणि हा अनमोल ठेवा इतिहासप्रेमी आणि कलाप्रेमींसाठी खुला होईल. यासाठी शासनाबरोबरच लोकसहभागही महत्त्वाचा आहे. यासाठी औरंगाबादच्या या वस्तुसंग्रहालयाला एकवेळ अवश्य भेट देऊन इतिहासाच्या अनमोल ठेव्याचा विलक्षण अनुभव सर्वांनी अनुभवावा.

साईप्रसाद कुंभकर्ण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *