‘तुमच्याबरोबर आणखी किती लोकांना असा त्रास आहे?’ आमचे डॉक्टर पेशंटला विचारत होते… ‘जवळजवळ १५-१६ लोकांना हा त्रास आहे. पण सगळे आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवतात. इतक्या लांबवर यायला होत नाही.’ तो पेशंट एका पावडर निर्माण करणार्या फॅक्टरीमध्ये काम करत होता. पुढचे प्रश्न विचारताना लक्षात आलं की, त्यांना त्या पावडरमध्ये काय मिसळलं जातं याचा अंदाज नव्हता. ‘तुम्ही विचारू शकाल का?’ म्हटलं तर तेही त्यांना शक्य नव्हतं. मग ती चमचाभर पावडर ते टेस्टिंगकरता घेऊन आले आणि ती तपासून पाहिली असता त्यात दगडी भुकटी अर्थात Silica  होती. Silica ही वायुकोषात अडकून बसल्यावर Silicosis हा आजार होतो. यात रुग्णांना दम लागण्यास सुरुवात होते. विशेषतः चालल्यानंतर खोकला लागतो आणि फुप्फुसक्षमता दिवसागणिक घटून Progressive Massive Fibrosis (PMF) होऊन फुप्फुस निकामी होण्याचा संभव असतो. म्हणूनच आपण नेमकं कोणत्या घटकांच्या संपर्कात येतो याची माहिती करून घेऊन त्रास होण्याआधी योग्य प्रतिबंधात्मक उपाय करणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, योग्य मास्कचा वापर कामाच्या ठिकाणी धूळ न उडण्याकरता करण्याची योजना यातून हा त्रास टाळता येतो. परंतु आपण काम पोटासाठी करतो. अन्नदात्याला प्रश्न कसा करायचा हा प्रश्न कामगारांना पडलेला असतो आणि आजार लक्षात यायला १०-१२ वर्षांचा काळ लागतो. त्यामुळे कामामुळे त्रास झाला असेल हे लक्षातही येत नाही.

याकरता विविध कायदे तर आहेतच पण निदान आणि उपचाराकरता वेगळ्या हॉस्पिटलच्या सुविधादेखील आहेत यात Asbestosis आणि Silicosis हा Compensableआजार आहे. परंतु निदान होऊन सर्व प्रक्रिया पूर्ण व्हायला जो वेळ जातो आणि त्यातूनही ज्या फॅक्टरीज् अथवा इंडस्ट्रिज् कायद्यातून पळवाटा काढून Unorganised Sector मध्ये येतात आणि त्यांच्याकडे काम करणार्या कामगारांची संख्या ही ESIS या खाली येत नसेल तर मात्र त्यांना हे फायदे मिळत नाहीत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा रोजगार नोकरीवर अवलंबून असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारची तक्रार करायची नसते. हा विचार झाला व्यवसायजन्य आजारांच्या बाबतीतला.

आपण त्यांच्या कामातल्या कौशल्याचा आणि कार्यशीलतेचा विचार केला तर लक्षात येतं की आजारी माणसांकडून होणारं काम हे निरोगी माणसाच्या अर्ध्यावर येतं. त्याची काम करण्याची क्षमता मोजण्याला साधनं उपलब्ध आहेत. त्याला Disability Evaluation असं म्हणतात आणि काम करणार्या कामगारांची काळजी घेतली, त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन प्रतिबंधात्मक उपाय योजले तर कामाचा वेग निश्चित वाढेल. याकरता Central Labour Institite मध्ये प्रशिक्षण उपलब्ध आहे. कामाच्या ठिकाणी Safety Officer असणं तसंच जिथे त्रास होण्यासारखे वायू अथवा धुलीकण निर्माण होतात अशा इंडस्ट्रिज्मध्ये दरवर्षी Periodic Health Chart केल्याने त्रास लवकर लक्षात यायला मदत होते.

व्यवसाय हा आपण पोटापाण्यासाठी करतो पण तोच नेमका पोटावर पाय आणणाराच नव्हे तर जीवावर बेतणारा ठरूनये ही सदिच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *