१५ ऑगस्ट १९४७ रोजी ब्रिटिशांच्या जोखडातून आपला देश स्वतंत्र झाला खरा पण भारत-पाकिस्तान फाळणीचा मोठा घाव देशावर झाला. त्याची जखम अजूनही भळभळत आहे. तसंच भारतातली आजची स्थिती बघितली तर आपल्याला खरोखरीच स्वातंत्र्य मिळालंय का असा प्रश्न पडतो. यंदा स्वातंत्र्याला ६६ वर्षं पूर्ण होत आहेत…

भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा ६६ वर्षं पूर्ण होतील. पण याच १५ ऑगस्ट २००४ या दिवशी मात्र मुंबईतल्या एका रस्त्यावरून जाताना एक दृश्य पाहून मी खूपच विचलित झालो. १७-१८ वर्षांचा एक काटकुळा मुलगा चिखलात पडलेल्या आपल्या तिरंग्यावर पाय देऊन तो फाडण्याचा प्रयत्न करत होता. माझं त्याच्याकडे लक्ष असल्याचं पाहून माझ्यावर चिडून तो मला म्हणाला, ‘हा तुमचा तिरंगा झेंडा आहे ना? घ्या तुम्हीच आणि मिरवा.’ नंतर तुच्छतेचा कटाक्ष टाकून तिथून निघून गेला. परंतु त्या मुलाचे ते जळजळीत शब्द ऐकून मी मात्र सुन्न झालो होतो. मला खूप रडायला येत होतं. मला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तो दिवस म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७चा दिवस आठवत होता. माझ्या मोडलेल्या घराच्या छतावर तिरंगा लावून रात्री बरोबर १२ वाजता तो तिरंगा फडकवला होता आणि सारी रात्र त्याच्या खाली बसून स्वतंत्र भारत एक समृद्धशाली राष्ट्र बनेल यासाठी काही स्वप्नं रंगवली होती, काही दृढ निश्चय केले होते.

आज देशातल्या परिस्थितीकडे बघितल्यावर असं वाटतं की ८० टक्के जनतेचे १२ वाजले आहेत. १५ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री नेहरूंनी जी स्वप्नं भारतीय जनतेला दाखवली ती सर्व स्वप्नं चक्काचूर झाली आहेत.

हो, हे स्वातंत्र्य म्हणून आपल्याला जे मिळालं ते असं…

प्रत्येक गल्लीत, रस्त्यात बेधडक थुंकण्याचं स्वातंत्र्य.

कुठेही उभं राहून मोबाईल फोनवर दुसर्यांना त्रास होईल एवढ्या मोठ्या आवाजात बोलणं.

प्रत्येक परीक्षेत खुलेआम कॉपी करणं.

हुंडा दिला नाही म्हणून नववधुंना जाळणं.

आपल्याच मुलींवर, सुनांवर किंवा कोणत्याही अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणं.

कोणत्याही तरुणीला तंदुरच्या भट्टीत जाळून मारणं.

दुधात पाणी, तुपात चरबी, धान्यात घोड्याची लीद अशा कोणत्याही पदार्थात काहीही मिसळून भेसळ करणं.

सर्व धर्म, जाती, भाषा अशा मुद्यांवर अशिक्षित आणि भोळ्याभाबड्या जनतेला मूर्ख बनवण्याचं स्वातंत्र्यही मिळालेलं आहे.

पिवळा, पांढरा, लाल, हिरवा अशा रंगांची वस्त्रं परिधान करून ढोंगी साधुसंतांच्या गोड वाणीला भुलून लोकांना वेडं आणि कट्टरपंथीय बनवण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

लोकशाहीच्या नावावर जनतेने निवडून दिलेल्या नेत्यांना छोट्या छोट्या कामांसाठी लाच घेऊन काम करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

इमानदारीने काम करणार्याला महामूर्ख किंवा अव्यावहारिक म्हणण्याचं स्वातंत्र्यही मिळालेलं आहे.

लग्न, वाढदिवस, सुवर्णजयंती, रथयात्रा आणि सण-उत्सव यामध्ये अश्लीलतेचा दिखावा करण्याचंही स्वातंत्र्य आहे.

लोकशाही चालवण्यासाठी वारंवार पक्ष बदलण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

पुस्तकं, वृत्तपत्रं, फिल्म, व्हिडिओ आणि मोबाईलवर सेक्सविषयक मजकूर प्रदर्शित करण्याचं स्वातंत्र्य मिळालं आहे.

टी.व्ही आणि वर्तमानपत्रांमध्ये सुंदर मुलींची अश्लील छायाचित्रं छापण्याचं स्वातंत्र्य आहे.

हो, कदाचित आईच्या प्रेमाशिवाय कोणतीही अशी गोष्ट उरलेली नाहीये की ज्यामध्ये भेसळ झालेली नाही.

खरी गोष्ट ही आहे की हजारो वर्षं एकमेकांसोबत सुखाने नांदणार्या हिंदू-मुस्लिमांच्या मनाविरुद्ध आपले गुरू महात्मा गांधी यांना अंधारात ठेवून ६५ वर्षांपूर्वी नेहरू आणि जिन्ना यांनी फाळणीचा घाव घालून भारतमातेचे दोन तुकडे केले. आता त्यांची उरलेली कसर हे राजकीय नेते भरून काढत आहेत आणि भ्रष्टाचाराचं शिखर गाठण्यासाठी देश तयार झाला आहे.

हा सर्व विचार केल्यावर तिरंगा फाडणारा तो तरुण म्हणजे मीच होतो असं मला वाटतंय. गेली ६५ वर्षं मी आणि माझ्यासारख्यांनी हेच केलं आहे. आताही देशातल्या जनतेची अवस्था ६५ वर्षांपूर्वी होती तशीच आहे. त्यामुळे १५ ऑगस्ट हा दिवस भारतमातेचा स्वातंत्र्यदिन नसून भारतमातेच्या हत्येचा दिवस आहे. नेहरू आणि जिन्ना यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी या देशाचे दोन तुकडे केले. ‘माझ्या शवावर भारतमातेचं विभाजन होईल’ असं म्हणणार्या गांधीजींनी विभाजन झालं तेव्हा काहीच केलं नाही. ते गप्प राहिले. म्हणजे नेहमी सत्य बोलणारे गांधीजी तेव्हा खोटं बोलले होते का? नेहरूंनी शपथ घेतली तेव्हा गांधीजी त्या कार्यक्रमाला गेले नव्हते पण नेहरूंना आशीर्वाद द्यायलाही ते विसरले नव्हते. त्यामुळे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिन म्हणावं की भारतमातेची पुण्यतिथी म्हणावं हेच मला समजत नाही. आज ६५ वर्षांनंतरही सारा देश भूक, बेरोजगारी आणि अनारोग्य यांनी ग्रासलेला आहे. दक्षिण भारतात आत्महत्या आणि उत्तर भारतात बलात्कार, हत्या आणि भ्रूणहत्या या समस्या अजूनही त्रासदायक ठरत आहेत. निसर्गाचा प्रकोप, नदीला आलेले पूर, समुद्रात आलेली त्सुनामी याची शिक्षा देशातल्या ८० टक्के गरीब जनतेलाच भोगावी लागत आहे. देशातील नेते आणि सुशिक्षित लोक स्वतःच्या सुखासाठी अधिकाधिक साधनसंपत्तीचा वापर करत आहेत. देशातील ८० टक्के लोक निर्धन, अशिक्षित, बेरोजगार, आजारी, बेघर आहेत. त्यांचं जीवन केवळ दानशुरांच्या मदतीवरच अवलंबून आहे. अन्नासाठीही ते दुसर्यावर अवलंबून आहेत. प्रत्येक मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वाराच्या बाहेर ईश्वर, अल्लाह, गॉडच्या नावाने भाकरी आणि पैसे मागण्यासाठी गर्दी असते. काही गरीब, असाहाय्य स्त्रियांना नाईलाजाने देहव्यापार करावा लागत आहे तर तरुण चोर्यामार्यांमध्येच अडकले आहेत. भ्रष्टाचाराने आपल्या सगळ्या देशाला ग्रासलं आहे.

प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते निवडणुकीच्या काळात आपल्या उत्स्फूर्त भाषणात भारताला जगात सर्वश्रेष्ठ बनवण्याचं आश्वासन देतात. परंतु गेल्या ६५ वर्षांत तरी हे झालेलं नाहीये. सामान्य माणसाला या देशाचे मालक म्हणवणार्या नेत्यांना नागरिकांचं मत केवळ निवडणुकीच्या वेळीच आठवतं. जगातलीसर्वात मोठी लोकशाही असल्याच्या मोठ्या गोष्टी ते करतात. सामान्य माणसासाठी सहानुभूती दाखवतात. परंतु त्यांचंच शोषण करण्यात मागेपुढे पहात नाहीत. जनतेच्या कामासाठी दान, दया, आर्थिक साहाय्यता यांच्या नावावर विभागाच्या विकासनिधीतून पैसे वापरण्याच्या घोषणा करतात परंतु मिळालेला तो पैसा मात्र स्वतःच खातात. अशिक्षित, गरीब जनतेचे अंगठ्याचे ठसे घेऊन त्यांची फसवणूक केली जाते. लोकशाही केवळ एक निर्जीव गोष्ट बनून राहिलेली आहे. प्रत्येक नेता आणि बुद्धिजीवी ‘आम आमदी’या नावाची माळ जपत असतो, पण कुणालाही सामान्य माणूस होण्याची इच्छा नाहीये.हे लोक कोर्या कागदावर निळ्या, पिवळ्या, लाल, हिरव्या रंगात नकाशे तयार करून पृथ्वीवर स्वर्ग बनवण्याच्या योजना बनवतात. संसदेत देशसेवा करण्याचा संकल्प करून जाणारे हे उमेदवार लाखो रुपयांची संपत्ती असल्याची घोषणा करतात परंतु ही संपत्ती आली कुठून हे मात्र सांगत नाहीत.

स्वयंसेवी संस्था आणि काही सेवाभावी व्यक्ती जनकल्याण, समाजसेवा, मानवाधिकाराचं रक्षण या हेतुंसाठी परदेशी लोकांच्या मदत आणि फंडाद्वारे देशातील गरिबी, बेरोजगारी संपवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करत आहेत. अण्णा हजारे, मेधा पाटकर, सुंदरलाल बहुगुणा असोत किंवा विमला ठकार किंवा ब्रह्मदत्त शर्मा असोत ही सगळीच चांगली आणि खरी माणसं आहेत परंतु तेही या कामात पूर्णपणे यशस्वी होत नाहीयेत. अनेक साधुसंतांनीही आता राजकारणात प्रवेश केला आहे. तरीदेखील देशातील गरिबांच्या स्थितीत काहीही सुधारणा होत नाहीये. याला दिशा कोण देणार? रचनात्मक कार्यक्रमही अयशस्वी ठरतायत. मग क्रांती कशी होणार? कोण करणार? देशातील नेते हे होऊनच देत नाहीयेत. त्यांना कोण समजावणार? कसं समजावणार? मला तर तथाकथित स्वातंत्र्याचा १५ ऑगस्टचा हा दिवस केवळ भारतमातेच्या हत्येचा आणि शोक दिवसासारखा वाटतो. २६ जानेवारीही प्रजासत्ताक दिवस न वाटता प्रजासत्तेची अंत्ययात्रा वाटते.

देशाचं तथाकथित वर्तमान स्वातंत्र्य हे तेव्हाच खरं स्वातंत्र्य म्हणावं लागेल जेव्हा भारत खर्या अर्थाने अनारोग्य, बेरोजगारी, अज्ञान यांपासून मुक्त होईल. देशाचा खरा मालक मतदार होईल. कधीतरी सगळे देशवासी मातेचे खरे सुपुत्र होण्याचा प्रयत्न करतील.

कधी येईल असा दिवस जेव्हा ‘वसुधैव कुटुम्बकम्’ म्हणून सगळं विश्व एक होईल. देशातील कृत्रिम सीमा संपून जातील. वर्णभेदावर आधारित माणसामाणसातील भेद संपेल. भाषा, धर्माच्या आधारावर माणसाची ओळख ठरणार नाही आणि सारं विश्व खर्या अर्थाने प्रजासत्ताक होईल.

स्वप्नच आहे, परंतु कधी तरी पूर्ण होईल असा माझा अतूट विश्वास मात्र आहे.

– पद्मचंद्र सिंघी

(लेखक निवृत्त आयएएस अधिकारी आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *