आज मोबाईल फोन ही जगण्याची निकड बनली आहे. मोबाईल फोनशिवाय एक दिवसही आता लोकांना राहणं अशक्य झालंय. सामान्यातील सामान्य माणूसदेखील आज मोबाईल फोनचा वापर करतो आहे. खरं तर आज मोबाईल फोन माणसाच्या जगण्याशी जसा जोडला गेलाय तसाच तो लोकांच्या राहणीमानाशीही जोडला गेलाय. केवळ संपर्क साधण्याचं साधन म्हणून आता मोबाईल फोनकडे कुणीही पाहत नाही. तर तो एक फॅशन आणि उच्च राहणीमानाचाही विषय बनलेला आहे. आपल्याकडे जास्तीत जास्त चांगला पण किमतीने कमी असा मोबाईल फोन असावा अशीच धारणा आता प्रत्येक मोबाईल फोन घेणार्या ग्राहकाची झालीय. यातही आकर्षक लूक असलेला मोबाईलफोन हा तर तरुणांचा सर्वात जिव्हाळ्याचा विषय आहे. असा हा स्मार्टफोन कॅटेगरीत मोडणारा मोबाईल फोन पूर्वी केवळ परदेशी कंपन्याच बनवायच्या पण आता या उद्योगात भारतीय कंपन्यांनीही आपला झेंडा रोवलेला आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात वाढणार्या स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये भारतीय स्मार्टफोन कंपन्या कशा आघाडीवर आहेत याचा घेतलेला आढावा…

सध्याच्या इंटरनेट युगात ‘ऑनलाईन’ राहण्यासाठी तरुणाई मोठ्या प्रमाणात मोबाईल फोनचा वापर करत आहे. मोबाईलवर इंटरनेटचा वापर सहजगत्या करता यावा यासाठी ही तरुणाई ‘स्मार्टफोन‘चा वापर जास्त प्रमाणात करत आहे. स्मार्टफोनसारखी वस्तू कोणाला पसंत पडणार नाही? पण बाजारात या स्मार्टफोनच्या येण्याने लोकांच्या मोबाईल फोन वापरातल्या गरजा आणखी वाढल्या आहेत. त्यातच या स्मार्टफोनची किंमत इतर नावाजलेल्या मोबाईल फोनपेक्षा कमी असल्याने तरुणपिढीला या फोन्सनी भुरळ घातली नसती तरच नवल… या स्मार्टफोनची खासियत म्हणजे या स्मार्टफोनमध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि कॉम्प्युटरशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. तसंच इमेल, इंटरनेट, मल्टीमीडिया, इ-बुक रिडर अशा अनेक सुविधादेखील या फोनमध्ये असतात.

जागतिक स्तरावर या स्मार्टफोनचं उत्पादन करण्यात सॅमसंग, मोटोरोला, सोनी आणि एचटीसी या कंपन्या अव्वल आहेत. पण आता भारतीय कंपन्यांनीही या स्मार्टफोनच्या विश्वरूपी स्पर्धेत जोरदार एन्ट्री केली आहे. इतर स्मार्टफोनच्या तुलनेत कमीत कमी किंमत आणि जास्तीत जास्त नवीन फिचर्स देऊन या कंपन्या भारतीय बाजारपेठेत आपले पाय घट्ट रोवून आहेत. जगात सगळ्यात जास्त स्मार्टफोनची विक्रीकरणार्या देशांमध्ये भारत हा तिसर्या क्रमांकाचा देश आहे. तसंच सध्या भारतीय कंपन्यांचा देशातील स्मार्टफोनच्या विक्रीत ३० टक्के इतका वाटा आहे. ‘इंटरनेट डेटा कॉर्पोरेशन‘ या मार्केट रिसर्च करणार्या कंपनीच्या जून २०१३च्या रिपोर्टनुसार एक वर्षापूर्वी स्मार्टफोन विक्रीत एक टक्का वाटा असणार्या भारतीय कंपन्यांचं हे एक मोठं यश मानलं जात आहे. ‘१०,००० रुपयांत स्मार्ट फोन‘ या संकल्पनेमुळे ‘मायक्रोमॅक्स‘ आणि ‘कार्बन’ या दोन कंपन्या आजघडीला यात आघाडीवर आहेत. इतकंच नाही तर सध्या ‘सॅमसंग गॅलेक्सी एसआयव्ही‘ सारख्या महागड्या फोनच्या प्रेमात असणार्या मोबाईलप्रेमींना आपल्याकडे वळवण्याची तयारी या कंपन्या करत आहे.

मायक्रोमॅक्स ही कंपनी भारतीय बाजारपेठेत स्मार्टफोनच्या उत्पादनात तसंच विक्रीतही आघाडीवर आहे. मायक्रोमॅक्सचे स्मार्टफोन विदेशी स्मार्टफोनच्या तुलनेत स्वस्त आणि जास्तीत जास्त फिचर्स असणारे असे आहेत. ग्रामीण भागातील लोडशेडिंमुळे तिथल्या ग्राहकांना मोबाईल बॅटरी चार्ज करण्यात अडचणी येत असतात. याचाच विचार करून मायक्रोमॅक्स कंपनीने एकदा बॅटरी चार्ज केल्यावर त्याचा जास्तीत जास्त वापर करता येईल अशा प्रकारच्या फोनची सीरिजच बाजारात उपलब्ध केली आहे. भारतात स्मार्टफोन वापरणार्या तरुणाईला हायटेक फिचर्स, फाईन लूक स्वस्तात उपलब्ध करून दिल्यामुळे या कंपनीने भारतीय बाजारपेठेत आपलं स्थान अबाधित केलंय. मध्यमवर्गीयांपासून उच्चवर्गीय ग्राहकांना लक्षात घेऊन यावर्षी कंपनी आणखी ३० नवे फोन लाँच करणार आहे.

भारतीय बाजारपेठेत मोबाईल फोन विक्रीत दुसर्या क्रमांकावर असणार्या  ‘कार्बन’ मोबाईल कंपनीचं मुख्य कार्यालय बंगलोर इथे इंदिरा नगरमध्ये एका छोट्याशा गल्लीत आहे. यावर्षी संपलेल्या आर्थिक वर्षात या कंपनीची उलाढाल ‘फक्त‘ २,४०० करोड रुपये इतकी होती. सुपरस्टार रजनीकांत ब्रॅण्ड अॅम्बेसेडर असणार्या या कंपनीने कधीच विचार केला नव्हता की आपली कंपनी ५,००० रुपयांत सर्वाधिक फिचर्स असलेल्या फोनची विक्री करू शकेल. कार्बन मोबाईलचे स्मार्टफोन देशातील प्रत्येक फुटपाथवर, मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तसंच या कंपनीचे देशभरात ५०० वितरक असून देशातील ९० टक्के जिल्ह्यांतील ८५,००० रिटेल शोरूमसोबत स्मार्टफोन विक्रीसाठी त्यांनी टायअप केलं आहे. यावर्षी २५० करोड रुपये स्मार्टफोनच्या जाहिरातीसाठी खर्च करून जास्तीत जास्त स्मार्टफोन विक्रीचं टार्गेट त्यांनी ठेवलं आहे. मोठी टच स्क्रीन, कॉड प्रोसेसर आणि चांगला लूक असणारे हे फोन सॅमसंग कंपनीच्या तोडीचे असल्याचा दावा कंपनी करत आहे.

सध्या बाजारात चर्चेत असणार्या ‘झेन‘ या मोबाईल कंपनीने आपला पहिला फोन ब्रॅण्ड २००९मध्ये बाजारात आणला. तुलनेने छोट्या असणार्या या कंपनीचा गेल्या आर्थिक वर्षातील फायदा ४३० करोड रुपये होता. अल्ट्राफोन ७०१ एचडी हा स्मार्टफोन झेनने बाजारात आणला असून तो ग्राहकांच्या चांगल्याच पसंतीस उतरला आहे. या फोनमध्ये असणारे स्पेसिफिकेशन ब्रॅण्डेड स्मार्टफोनच्या तुलनेचे असून त्याची किमतही कमी आहे. ७० ते ८० टक्केस्मार्टफोन ग्राहक असणारी तसंच वर्षाकाठी एक लाख फोन विक्री करणारी ‘लावा‘ ही कंपनी भारतीय बाजारपेठेत पाय रोवू पाहत आहे. यावर्षी कंपनीने बाजारात आणलेल्या ‘झोलो’ या स्मार्टफोनमध्ये भारतात पहिल्यांदाच टेग्रा ३ चिपसेटचा वापर करण्यात आला आहे.

भारतातील मध्यमवर्गीय ग्राहकांना चांगल्या सुविधा कमी पैशांत हव्या असतात. येथील ग्राहक खरेदीच्या बाबतीत अधिक परिपक्व झाला आहे. स्मार्टफोन खरेदी करताना तो ‘बॅण्डेड’च असावा हा अट्टाहास आता राहिला नाही. नावीन्यपूर्ण, अधिकाधिक फिचर्स असणारे भारतीय कंपन्यांचे स्मार्टफोन घेण्याकडेच आता कल वाढत आहे. भारतात स्मार्टफोनचा वापर करण्यात होत असलेली प्रचंड वाढ तसंच येथील मध्यमवर्गीय ग्राहक यामुळे स्वस्तात स्मार्टफोन विक्री करणार्या भारतीय कंपन्यांना येत्या काही वर्षांत चांगलंच यश मिळेल असं निश्चित चित्र दिसत आहे.

 

टॉप ४ ‘स्वदेशी’ स्मार्टफोन्स

१) कार्बन टायटनियम एस५ किंमत ः ११,९९०/-

२) झोलो प्ले टी१०००

किंमत ः १५,९९९/-

३) इंटेक्स अॅक्वा आय ५

किंमत ः ११,९००/-

४) मायक्रोमॅक्स कॅनव्हास ४

किंमत ः १७,९९९/-

 

माझ्यासारखे दर सहा महिन्याला स्मार्टफोन बदलणारे लोक हे फक्त ‘स्वदेशी स्मार्टफोन‘च विकत घेत आहेत, कारण या मोबाईलची रिसेल व्हॅल्यू अधिक असल्याने ते सहजरित्या परत विकले जाऊ शकतात. तसंच हे स्मार्टफोन म्हणजे ‘फाईव्ह स्टारचं जेवण फास्ट फूडच्या किमतीत’ मिळण्यासारखं आहे. आजच्या काळात ग्राहक ब्रॅण्डपेक्षा टेक्नॉलॉजीचा जास्त विचार करत आहे.

– राकेश वत्स, विद्यार्थी

येतोय फेसबुकचा स्मार्टफोन!

आजकाल मोबाईलचा वापर संवाद साधण्यापेक्षा फेसबुकसाठीच लोक अधिक करतात. याच पार्श्वभूमीवर अनेक स्मार्टफोन्स्नी फेसबुक अॅप्स तयार केले आहेत. मात्र आता फेसबुकने स्वतःचाच स्मार्टफोन मोबाईल बाजारात आणण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी एचटीसी कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटवर अधिक सहजतेने फोटो पाहता यावेत, अपलोड करता यावेत, लाईक करता यावेत, यासाठी विशेष सुविधा देणारा हा स्मार्टफोन असणार आहे.

 

 विनोद तिडके

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *