२६ जून २०१३ हा यंदाच्या विम्बल्डनसाठी घात वार ठरला… एकाच दिवशी विम्बल्डन स्पर्धा सुरू असताना विम्बल्डन स्पर्धेतून सात खेळाडूंनी माघार घेतली. टेनिस स्पर्धेला व्यावसायिक स्वरूप आल्यानंतर गेल्या ४५ वर्षांतली ही अशी पहिलीच घटना आहे. हे सात खेळाडू कुणी एैरेगैरे नव्हते तर टेनिस करिअरमध्ये कधी ना कधी जागतिक टेनिस क्रमवारीत नंबर एक पटकावलेले खेळाडू होते. या खेळाडूंनी दुखापतीचं कारण पुढे केलं असलं तरी कुजबुज मात्र विम्बल्डनवरील धोकादायक गवताबाबतच अधिक होतेय… त्यातच विम्बल्डनच्या हिरवळीचा बेताज बादशाह आणि तब्बल सात वेळा विम्बल्डन जिंकणारा रॉजर फेडरर, माजी विम्बल्डन विजेते राफेल नदाल, मारिया शारापोव्हा, आणि सरेना विल्यम्सही पराभूत झाल्याने या चर्चेला उधाण आलंय… विम्बल्डनच्या गवताला जणू भाले फुटलेत…

मारिया शारापोव्हा एकाच टेनिस मॅचमध्ये तीन वेळा घसरल्याचं तुम्ही कधी पाहिलेलं आठवतंय का? पण यंदाच्या विम्बल्डनमध्ये ती चक्क तीनवेळा घसरून पडली. एकदा तर तिला त्यासाठी मॅच सुरूअसताना उपचारही घ्यावे लागले. त्याची परिणीती अशी झाली की या स्पर्धेत तिसरं मानांकन मिळालेल्या शारापोव्हाला जागतिक क्रमावारीत पोर्तुगालच्या मिशेलने ६-३, ६-४ असं हरवलं. इतर मानांकित खेळाडूंनी गवतावर भाष्य करणं टाळलं, पण मारिया शारापोव्हाने रणशिंग फुंकलं. विम्बल्डनचं गवत धोकादायक असल्याचं तिने जाहीर केलं.

दहाव्या मानांकित क्रोएशियाच्या मॅरिन सिलिकने तर अशा या धोकादायक गवतावर खेळणं टाळलं. विम्बल्डनच्या इतिहासातील हा काळा दिवस असल्याचं त्याने म्हटलंय. तर महिला टेनिसमध्ये दुसरं मानांकन मिळालेल्या व्हिक्टोरिया अझारेन्कानेही गवताच्या या दर्जावर नाराजी व्यक्त करत विम्बल्डनमधून माघार घेतली.

इतकंच काय यंदाच्या स्पर्धेत पहिल्याच फेरीत राफेल नदालसारख्या टेनिसमधील जगज्जेत्याला हरवणार्या बेल्जियमच्या स्टिव्ह डार्सिस यानेही या स्पर्धेतून पुढच्याच दुसर्या राऊंडमध्ये खांद्याच्या दुखापतीमुळे माघार घेतली. डार्सिसनेही गवताला दोष दिलाय. माझा समोरचा प्रतिस्पर्धी त्याचा काहीही दोष नसताना या गवतावरून घसरून पडताना पाहणं त्रासदायक होतं अशी टिप्पणी त्याने केलीय.

एक नजर टाकूया कुणीकुणी या विम्बल्डनमधून माघार घेतली त्याच्यावर… सगळ्यात पहिल्या क्रमांकावर अर्थात नदालला हरवणारा डार्सिस. त्याच्यासोबत सहावा मानांकित जो विल्फ्रेड त्सोंगा, दहावा मानांकित मॅरिन सिलिक, विम्बल्डनवर सर्वाधिक प्रदीर्घ वेळ मॅच खेळण्याचा विक्रम नावावर असणारा जॉन इश्नर, रॅडेक स्टेपनिक, यारोस्लोव्हा श्वेडोव्हा आणि महिलांमध्ये सातवी मानांकित व्हिक्टोरिया अझारेन्का अशा दिग्गज खेळाडूंनी माघार घेतली. त्यात भर म्हणून फेडरर पराभूत झाला तो जागतिक क्रमवारीत ११६ व्या क्रमांकावर असणार्या युक्रेनच्या सर्जिय स्टेकोव्हस्कीकडून. सर्जियने त्याचा ६-७(५), ७-६(५), ७-५, ७-६(५) असा पराभव केला. दहा वर्षांपूर्वी फेडरर फ्रेंच ओपन स्पर्धेच्या पहिल्या फेरीत पराभूत झाला होता. त्यानंतर त्याने सलग ३६ वेळा ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची क्वार्टरफायनल गाठली होती. हा विक्रम यावेळी मोडला गेला… टेनिस जाणकार म्हणतात, ‘गवताने फेडररचा घात केला.’

लिसिकीचा अनोखा विक्रम

हे कमी की काय म्हणून सरेना विल्यम्सही पराभूत झाली. सेरेनाला जर्मनीच्या सॅबिन लिसिकीने ६-२,१-६,६-४ असं पराभूत केलं. या लिसिकीने सेरेनाला हरवून अनोखा विक्रम केलाय. फ्रेंच विजेत्या महिला खेळाडूला विम्बल्डनमध्ये हरवण्याचा अनोखा चौकार तिने लगावला. २००९ मध्ये लिसिकीने स्वेटलाना कुत्झनेत्सोव्हाला विम्बल्डनमध्ये पराभूत केलं. २०११ मध्ये ली ना या फ्रेंच विजेत्या खेळाडूला पराभूत केलं. २०१२ मध्ये लिसिकाने मारिया शारापोव्हाला पराभूत केलं आणि यंदाची फ्रेंच चॅम्पियन होती सेरेना विल्यम्स. परंपरेनुसार लिसिकाने तिचाही पराभव करत फ्रेंच ग्रॅण्डस्लम विजेत्या खेळाडूला पराभूत करण्याची किमया साधली.

प्रत्यक्ष मैदानावर इतका गदारोळ होत असताना विम्बल्डन स्पर्धा संयोजकांनी मात्र सोयीस्कररित्या याकडे दुर्लक्ष केलंय. नील स्टुबली हा यंदाचा विम्बल्डनचा नवा ग्राऊंडस्मन आहे. विम्बल्डन स्पर्धेसाठी स्वतंत्रपणे मैदान तयार करण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे. असं असलं तरी ऑल इंग्लंड टेनिस क्लबने मात्र त्याला पुरतं पाठीशी घातलं आहे. ऑल इंग्लंड टेनिस क्लबचे कार्यकारी प्रमुख रिचर्ड लुईस यांनी तर स्वतःची पाठ थोपटून घेतलीय. ज्या खेळाडूंनी माघार घेतलीय त्याच्यामागे धोकादायक गवत हे कारण नाही, असं या लुईस महाशयांचं म्हणणं आहे. उलट बर्याच खेळाडूंनी यंदाचं गवत उत्तम असल्याचं म्हटलंय असंही लुईस म्हणतोय… ‘गिरे तो भी टांग उपर’ यालाच तर म्हणतात ना…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *