वैद्यकाचा बाजार…. आणि त्यातून सुटकेचा मार्ग हे डॉ. श्रीराम गीत यांचं पुस्तक मराठीतील आजच्या आरोग्य व्यवस्थेवर भाष्य करणारं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ठरलं आहे. स्वतः जनरल प्रॅक्टिशनर (जी.पी.) असणार्या डॉ. गीत यांनी आपल्या ४०-४५ वर्षांच्या पुण्यातील मध्यमवर्गीय वस्तीत वैद्यकीय व्यवसायादरम्यान बदलत्या आरोग्य व्यवस्थेचं अतिशय डोळस निरीक्षण केलं आहे. त्याचबरोबर सुशिक्षित मध्यमवर्गीय नागरिकांचा या बदलत्या आरोग्य सेवा व्यवस्थेला दिला जाणारा प्रतिसादही अभ्यासला आहे.

डॉ. गीत हे समाजभान असलेले संवेदनशील डॉक्टर आहेत यात शंकाच नाही. अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व्यवस्थेत वैद्यकीय सेवा उपकरणं, चिकित्सापद्धती, औषधं आणि औषध कंपन्या या घटकांचं वाढत चाललेलं महत्त्व याचा नेमका आवाका डॉ. गीत यांना आहे. तसंच सुशिक्षित, मध्यमवर्गीय रुग्ण आजारपण, शारीरिक व्याधी यांना तोंड देताना कसा निर्णय घेतात, त्यामागची त्यांची मानसिकता, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक नातेसंबंध, पुण्यातील (आणि तत्सम शहरांतील) छोटी, मोठी रुग्णालयं, त्यांचं अर्थकारण यांचा अभ्यास डॉ. गीत यांनी केलेला आहे. त्यामुळेच ‘वैद्यकांचा बाजार’ हे पुस्तक कोणतंही ‘तत्त्वज्ञान’ न मांडता सामान्य सुशिक्षित, मध्यमवर्गीय नागरिकांना खर्चिक, महागड्या होत चाललेल्या वैद्यकीय सेवांचा उपयोग केव्हा, कसा आणि किती घ्यावा याचं मार्गदर्शन करतं. ‘वैद्यकाचा बाजार’ या पुस्तकाची रचना मुख्य चार प्रकरणात असून पहिल्या प्रकरणात ‘आर्थिक खर्चाचा भोवरा’ मध्ये १९७५ पासून आजवर बदललेल्या आरोग्य सेवेचा आणि त्यातील वाढत्या आर्थिक बोजाचं विश्लेषण मांडलं आहे. मुख्य म्हणजे आजची वैद्यकीय सेवा व्यवस्था व्यापारप्रणित झाली आहे. हे सत्य डॉ. गीत ठामपणे अधोरेखित करतात. याच वैद्यकीय व्यवस्थेत व्यवसाय करणारे डॉक्टर अशी भूमिका मांडतात तेव्हा त्याला विशेष महत्त्व आहे.

पुढील प्रकरणात डॉक्टर, सामान्य रुग्णांना साधे आजार म्हणजे फ्ल्यू, अॅसिडिटी, मान, पाठ, कंबरदुखी, डोकेदुखी, नैराश्य, अॅलर्जी, कृशता आणि लठ्ठपणा, दातांच्या समस्या इत्यादीबाबतचे उपचार आणि त्याबाबत सामान्यतः डॉक्टरांचे दृष्टिकोन आणि रुग्णांचा व्यवहार याची माहिती देतात. विशेषतः रुग्ण या आजार-विकारात कसा व्यवहार करतात याचं थोडक्यात विवेचन करतात. त्यातूनच वैद्यक बाजाराचं अर्थकारण कसं बदलत जातं हे दाखवून देतात. एका बाजूला मध्यमवर्गीय समाजात वाढलेल्या शैक्षणिक आणि आर्थिक स्तरामुळे आरोग्यविषयक नवी जागृती आली आहे. इंटरनेट आणि प्रसारमाध्यमांमुळे प्रचंड ज्ञान, तपशील उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे खरंतर मध्यमवर्गीय, सुशिक्षित वर्ग काहीसा भांबावून गेला आहे. सुयोग्य उत्तम आरोग्य सेवा, वैद्यकीय उपचारपद्धत कोणती याविषयी एक संभ्रमावस्था या वर्गात आहे. तुलनात्मक आर्थिक सुबत्तेमुळे ‘पैसे खर्च झाले तरी चालतील पण ‘सर्वोत्तम’ उपचार हवेत’ अशी काहीशी भ्रामक धारणा या वर्गात रुजली आहे. म्हणूनच आपल्या आजाराचं स्वरूप आणि योग्य उपचारांचं इंगित समजून घेण्यात हा समाजगट कमी पडत आहे. एका अर्थाने वैद्यकीय सेवेच्या संदर्भात हा समाजपट सुशिक्षित ‘मागास’ ठरत आहे. याचाच गैरफायदा बाजारू वैद्यकीय व्यवसायिक घेतात.

पुढच्या प्रकरणात डॉ. गीत हार्ट अॅटॅक, पक्षाघात, मूत्रपिंड ते लिव्हरचे आजार, कर्करोग, सेप्टीसीमीया या गंभीर, जीवनसमाप्तीकडे नेणार्या आजारांच्या अर्थकारणाची चर्चा करतात. मध्यमवर्गीय, संपन्न रुग्णाची आणि कुटुंबाची या आजारांवरील उपचारात कशी फरफट होते याचं विश्लेषण त्यांनी केलं आहे. मोठी रुग्णालयं, पंचतारांकित कॉर्पोरेट रुग्णालयं, त्यांचं अर्थकारण, रुग्णांवर पडणारा त्याचा बोजा याविषयीचं सत्यचित्र वाचकांना दाखवण्यात हे पुस्तक यशस्वी ठरलं आहे.

मुख्य म्हणजे सुशिक्षित, मध्यमवर्गीयांनी साधे आजार असोत वा गंभीर आजार असोत – वैद्यकीय उपचार घेताना कुठे सावध असण्याची, कुठे डॉक्टरांच्या निर्णयावर अवलंबून रहाण्याची काळजी घ्यायला हवी हे डॉ. गीत छान समजावून देतात. आमचे डॉक्टर मित्र मुरलीधरन बरेच वेळा सांगतात की, ‘सामान्यतः ६५ वर्षांनंतर मोठी शस्त्रक्रिया केली तरी ती यशस्वी होते. हे आज शक्य आहे. परंतु जीवनात सक्रिय कार्यमग्नता नसेल, जगण्याचं उद्दिष्ट नसेल तर असा शरीरांतर्गत हस्तक्षेप (मोठं ऑपरेशन) शरीर स्वीकारेलच अशी खात्री नसते!’ उपलब्ध अत्याधुनिक उपचारपद्धतींमुळे सुशिक्षित मध्यमवर्गीय समाजगटात एक अवास्तव अपेक्षा तयार झाली आहे. ती म्हणजे या वैद्यकीय उपचारांमुळे आपण मृत्यू अनंतकालपर्यंत लांबवू शकतो! हा भ्रम टाकून देऊन जीवनसमाप्ती हे एक शाश्वत सत्य म्हणून स्वीकारणं गरजेचं आहे. अर्थात याचा अर्थ आधुनिक वैद्यकीय उपचार घेऊच नयेत असं नाही तर अत्यंत डोळसपणे, आर्थिक फरफट न होऊ देता, वैद्यकाच्या बाजारात व्यवहार करण्याचं भान येणं आवश्यक आहे.

याविषयी जागृती करणारं एक महत्त्वाचं पुस्तक डॉ. श्रीराम गीत यांनी सादर केलं आहे. त्यासाठी सर्व सुशिक्षित मध्यमवर्गीयांनी त्यांचं कृतज्ञ रहायला हवं. या पुस्तकातील सर्वात महत्त्वाची सूचना म्हणजे प्रत्येकाने आपलं ‘वैद्यकीय मृत्युपत्र’ लिहिणं आवश्यक आहे. आपल्याला गंभीर आजारात कोणत्या मर्यादेपर्यंत वैद्यकीय उपचार द्यावेत. याविषयी स्पष्ट नोंदी त्यात असाव्यात.

आपली शारीरिक आणि आपल्या कुटुंबीयांची आर्थिक कुतरओढ टाळण्याचा तो सर्वोत्तम मार्ग ठरावा. ‘समकालीन’ प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित करून समाजाला आरोग्यविषयक भान आणलं आहे, असंच म्हणावं लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *