‘मेडिकल टुरिझम’ – वैद्यकीय उपचारांसाठी पर्यटन हा एक नवा वाक्यप्रयोग अलीकडे प्रचलित झाला आहे. चेन्नई, दिल्ली, मुंबई, केरळ अशा ठिकाणी असलेली पंचतारांकित रुग्णालयं या मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून येणार्या प्रवासी रुग्णांद्वारे मिळणार्या महसुलावर आपला व्यवसाय (किंवा धंदा) वेगाने वाढवत आहेत.

दिल्लीतील इंद्रप्रस्थ रुग्णालय, चेन्नईतील अपोलो रुग्णालय, मुंबईतील ब्रिच कॅण्डी, पुण्यातील रुबी, जहांगीर रुग्णालयं अशा मोठ्या रुग्णालयांत अत्यंत आधुनिक वैद्यकीय उपचार उपलब्ध आहेत. गुडघ्यांचे सांधे बदलणं, कंबरेचे सांधे दुरुस्त करणं, हृदयाची झडप दुरुस्ती, बायपास सर्जरी, हाडांच्या कर्करोगावरील उपचारांसाठी बोन मॅरो शस्त्रक्रिया, लिव्हर ट्रान्सप्लांट अशा अत्याधुनिक उपचारांची सोय या रुग्णालयात आहे. तर तिथे उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी वृंद उपलब्ध असतो. अर्थातच हे सर्व वैद्यकीय उपचार भारतातील सर्वच रुग्णांना परवडत नाहीत. तर विशिष्ट उच्चवर्गीय, उच्च आर्थिक गटातील रुग्णांनाच केवळ परवडतात. याचा दुसरा अर्थ भारतात उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक वैद्यकीय विचारांतून सुमारे ९० टक्के समाज वगळण्यात आला आहे. व्यावसायिक धंद्याच्या भाषेत बोलायचं तर फार मोठा ‘कस्टमर बेस’ या रुग्णालयांनी नाकारला आहे!

तर दुसरीकडे अमेरिका, इंग्लंडसारख्या प्रगत देशातील मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग त्या देशात मिळणार्या वैद्यकीय उपचारांच्या प्रचंड वाढलेल्या खर्चामुळे बेजार झाला आहे. त्यांच्या देशात अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध आहेत. परंतु ते उपचार महागडे असल्याने त्यांना परवडत नाहीत. म्हणजे प्रगत देशातही भारतासारखीच परिस्थिती आहे. त्या देशातील मोठा समाजगट वैद्यकीय सेवांपासून वंचित रहात आहे!

आता, खरंतर याची दखल घेऊन दोन्ही ठिकाणच्या सरकारांनी आधुनिक वैद्यकीय उपचारांच्या किमती आवाक्यात ठेवण्यासाठी, किंमत नियंत्रणासाठी ठोस धोरण अवलंबणं हे माणुसकीला धरून ठरेल. परंतु तसं घडत नाही, घडणार नाही.

तर याचा फायदा घेऊन भारत, अर्जेंटिना, आफ्रिका इत्यादी देशातील मल्टी स्पेशालिटी, पंचतारांकित रुग्णालयं आणि वैद्यकीय उपचार संकुलं विकसित देशातील मध्यमवर्गीय, निम्न मध्यमवर्गीय रुग्णांना आपल्या सेवा उपलब्ध करून देत आहेत. तेही सरकारी सोयी सवलतींचा, पायाभूत सुविधांचा फायदा घेऊन!

म्हणजे असं की, अमेरिका आणि पश्चिम युरोपीय देशात हृदयाची झडप बदलण्याच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे दोन लाख डॉलर्स इतका खर्च येतो. तर भारतातील वर उल्लेख केलेल्या पंचतारांकित रुग्णालयात याच शस्त्रक्रियेचा खर्च केवळ दहा हजार डॉलर्स इतका येतो. यात येण्याजाण्याचा विमानप्रवास खर्च आणि थोडंफार पर्यटन याचाही समावेश आहे. याचप्रमाणे मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेत ३७०० डॉलर्स इतका खर्च येतो, तर दातांचा मेटल फ्री ब्रीज बसवण्यासाठी ५५०० डॉलर्स खर्च येतो, तर याच उपचारांसाठी भारतात अनुक्रमे ७३० डॉलर्स आणि ५०० डॉलर्स इतका कमी खर्च येतो. म्हणजे अमेरिका, इंग्लंड, पश्चिम युरोपीय देशांतील वैद्यकीय उपचारांच्या तुलनेत केवळ एक दशांश किमतीत भारतातील पंचतारांकित रुग्णालयं या परदेशी रुग्णांना ‘वैद्यकीय सेवा’ पुरवतात. आहेत की नाही आमचे उच्चशिक्षित, उच्चकुशलता प्राप्त डॉक्टर्स सहृदय, मानवतावादी!

परंतु केवळ भारतातील पंचतारांकित रुग्णालयंच हा धंदा करतात असं नव्हे तर जगातील सुमारे पन्नास देश अशा मेडिकल टुरिझमसाठी आता प्रोत्साहन देत आहेत. कारण मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून या देशांना मोठं परकीय चलन प्राप्त होत आहे. भारतात दरवर्षी मेडिकल टुरिझमद्वारे येणार्या रुग्णात सरासरी ३० टक्के वाढ होत आहे. सन २०१५ पर्यंत मेडिकल टुरिझम इंडस्ट्रीची उलाढाल ९५०० कोटी रुपयांची होईल. यामध्ये हृदयाची झडप बदलण्याची शस्त्रक्रिया, गुडघ्याचे आणि कंबरेचे सांधे बदलण्याची शस्त्रक्रिया, लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रिया या उपचारांचा ‘धंदा’ वाढणार आहे. यामध्ये चेन्नई शहर सर्वात आघाडीवर असून भारतात येणार्या टुरिस्टपैकी ४५ टक्के टुरिस्ट चेन्नईला पसंती देतात! चेन्नई, केरळ या ठिकाणची रुग्णालयं तर आपल्या परदेशी मौल्यवान रुग्णांसाठी ठोक ‘पॅकेज’ देतात. यात वैद्यकीय उपचारांचा तर समावेश असतोच. पण त्याचबरोबर उपचारानंतर आसपासची तीर्थक्षेत्रं, पर्यटन स्थळांचाही समावेश असतो. तर अशारितीने ‘वैद्यकीय व्यवसाय अधिक पर्यटनाचा आनंद’ असं नवं बिझिनेस मॉडेल भारतात प्रस्थापित झालं आहे. देशाला परकीय चलन, महसूल प्राप्त होत आहे. परदेशी रुग्ण उपचार घेऊन आनंदात परततात! छान!

तर ‘कोलकता येथे रुग्णालयांना आगी लागतात त्यात रुग्ण होरपळून मरतात,’ ‘जोधपुरमध्ये रुग्णालयातील उंदीर रुग्णांचे कान-पाय खातात,’ पैसे नाहीत म्हणून ग्रामीण महिलांना सरकारी रुग्णालयात बाळंतपणासाठीही दाखल करत नाहीत. अशा बातम्या आपण वाचतो. भारत देशातच असे दोन वेगळेच देश प्रत्येक क्षेत्रात जन्माला येत आहेत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *