दस्तुरखुद्द बाळासाहेबांच्या स्मारकावरून जे काही वाद कम घोळ घालण्यात आले, त्यातून तर नव्या नेतृत्वाच्या मर्यादा अधिक स्पष्ट झाल्या. तरीही उद्धवजी आपली उपस्थिती दाखवण्याचा अटोकाट प्रयत्न करत असतात. भारतातले पहिले हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर हिंदुत्वाच्या रिकाम्या झालेल्या सिंहासनावर नरेंद्र मोदींना बसवण्यासाठीची भाजपची लगीनघाई आणि स्वतः मोदींचा मी आलो, मी पाहिलं, मी जिंकून घेतलं सगळं अशा आर्विभावात जो थयथयाटी राष्ट्रीय संचार चालू आहे त्याला एक छोटा स्पीडब्रेकर लावून मोदींना मातोश्रीच्या पायर्या चढायला लावण्याचा ठाकरी झटका उद्धवजींनी दिला खरा पण त्या आधी त्यांच्यावर थेट केलेल्या टिकेवर नंतर सारवासारवी करण्याची त्यांची धडपड ठाकरे झटक्याचा तडका कमी करून साधं वरण करून टाकलं असं सैनिकांना वाटलं असावं.

तर उद्धवजी ठाकरे बाळासाहेबांच्या पश्चात, बाळासाहेबांची प्रतिकृती, उक्ती राज ठाकरे यांच्याशी मधूनच कौटुंबिक, मधूनच राजकीय हातमिळवणी तर मधूनच राजकीय शत्रुत्व अशा समद्विभूज त्रिकोणात समांतर लढत राहतात. छोटे ठाकरे ब्ल्यू प्रिंट खिशात ठेवून शांत बसून दादूची त्रेधातिरपीट बघत राहतात. भाजपने त्यांना दादर-बांद्रा शटल सुरू करा म्हणून हर प्रकाराने गळ घातली. घालत राहिले. त्याचा तिटकारा येऊन राज ठाकरेंनी भाजपची चड्डी काढण्याची धमकी दिली. थोडक्यात उद्धवजींची टाळी आणि सर्वांना एका गणवेशात आणण्याची भाजपची खेळी सपशेल आपटली.

अशा वातावरणात परवा उद्धवजींनी लखनभैय्या एन्काउंटर प्रकरणी जन्मठेप झालेल्या पोलिसांच्या मागे सेना उभी राहील असं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.

शिवसेना हा राज्यातील प्रमुख विरोधीपक्ष आहे. नवे शिवसेना अध्यक्ष बाळासाहेबांप्रमाणेच पक्षाच्यावतीने कुठल्याही घटनात्मक पदावर नाहीत. म्हणजे त्यांना विधिमंडळ किंवा तत्सम सभागृहात घेतलेल्या शपथांची बंधनं नाहीत. परंतु याचा अर्थ असा नाही की, त्यांनी भावनातिरेकात आणि क्षुद्र अस्मितेच्या राजकारणासाठी थेट न्यायव्यवस्थेवर अविश्वास दाखवत एका परिने न्यायालयाने दोषी ठरवलेल्या लोकांना निर्दोषत्वाचं सर्टिफिकेट द्यावं.

त्यातून हा खटला संवेदनशील होता. यात सरकारच्याच पोलीस खात्यातील अधिकारी ‘बनावट’ चकमकीत दोषी ठरले. त्यांना दोषी ठरवण्यासाठी एक रितसर न्यायप्रक्रिया पार पडलीय. मुळात गुंडांचा एन्काउंटर करणं हे धोरणच अजूनही विवादास्पद आहे. लोकशाही व्यवस्थेत आरोपीला स्वतःचा बचाव करण्याची पूर्ण संधी दिली जाते. अगदी पाकिस्तानी अतिरेकी कसाबलाही ती दिली. आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी अनभिज्ञ आणि भाबड्या तसंच पोशाखी देशप्रेमींनी कसाबला पोसण्याच्या खर्चावर बालिश चर्चा केली. शेवटी त्याला अनपेक्षितपणे फासावर लटकवल्यावर सगळ्यांची तोंडं बंद झाली. तर मुद्दा हा आहे की, फेक एन्काउंटरसारख्या संवेदनशील खटल्यात अशा पद्धतीने राज्याच्या प्रमुख विरोधीपक्षाच्या प्रमुखाने आरोपींच्या पाठीशी उभं रहावं हे एक तर त्यांच्या राजकीय भाबडेपणाचं निदर्शक आहे. किंवा ते जाणूनबुजून आगीशी खेळ खेळताहेत!

स्वतः बाळासाहेबांच्या हयातीत तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी अशी गवळीची हिंदू डॉन म्हणून जाहीर भलावण केली खरी त्यांनी पण याच गवळीने अखिल भारतीय सेना काढली तेव्हा शिवसेनेलाच त्याच्या मुसक्या बांधाव्या लागल्या. आजही पालिकेत गवळी कुटुंब सेनेसोबत आहे.

विरोधीपक्ष म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला गुंड म्हणायचं आणि स्वतःही न्यायालयाने गुंड ठरवलेल्यांच्या कुटुंबीयांची राजकीय मदत घ्यायची. यातून संसदीय राजकारण करणार्या सेनेला काय मेसेज द्यायचाय?

तुम्ही महाराष्ट्रीय हिंदू गुन्हेगार असाल तर आम्ही तुमचा वाल्याचा वाल्मिकी करणार पण तुम्ही परप्रांतिय परधर्मिय असाल तर तुमची बोटं कापणार किंवा वाघनखांनी कोथळा बाहेर काढणार, हीच काय ठाकरेंची लोकशाहीतील शिवशाही?

मुंबईतलं पहिलं एन्काउंटर झालेलं मन्या सुर्वे प्रकरण असो की अलीकडचं इशरत जहाँ व्हाया जावेद फावडा लखनभैय्या अशा अनेक चकमकी वादग्रस्त ठरल्यात. नव्वदच्या दशकात अंडरवर्ल्डमधील गटातटांनी इथलं पोलीस दल वापरून एकमेकांचे हिशेब चुकते केले. दाऊद आणि राजन यांच्या पे रोलवरकोण आणि किती अधिकारी आहेत याची राजकीय आणि माध्यम वर्तुळातील चर्चा उद्धवजींना माहीत नाही काय?

आणि न्यायाची एवढीच चाड उद्धवजींना असेल तर तो किणी प्रकरणात का नाही दिला? श्रीकृष्ण अहवाल का दडपला? दहा निरपराध दलितांच्या मृत्युस कारणीभूत मनोहर कदम कसा सुटतो? गुंडेवार आयोगाचं काय झालं? एन्काउंटर प्रकरणी पोलिसांच्या मागे उभे राहणारे उद्धवजी ठाकरे नक्षलवादी म्हणून ताब्यात घेतलेल्या कबीर कला मंचच्या कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहतील! एकदा हिंसेच्या समर्थनाच्या बाजूनेच उभं रहायचं तर मग नक्षलवादी चळवळीला पाठिंबा देणार का सेना? कारण पोलीस जसं गुंडाला ठार केलं म्हणजे रामाने रावणालाच ठार केलं असा युक्तिवाद करतात. तसाच नक्षलवादीही शोषणकर्त्यांना ठार करून शोषितांना न्याय देण्याची भाषा करतात. यावर सेनेचं काय उत्तर?

प्रमुख विरोधी पक्षप्रमुखांनी वादग्रस्त, संवेदनशील आणि न्यायप्रविष्ठ विषयावर अशा सवंग घोषणा करू नये. त्यांच्या राजकीय मित्र भाजप यांचं या विषयावरील मौन सूचक आहे. कारण ते अनेक राज्यांत सत्तेत आहेत. आणि एका गुजरातनेच त्यांना दमवलं. सत्तेत असताना सर्वच पक्ष पोलिसांना वापरून घेतात. पोलीस दलात राजकीय हस्तक्षेप नको हे जाहीर परिसंवादात बोलायला टाळीबाज वाक्य आहे. पण सत्ता येऊन मंत्रालयात बसलं की काय होतं याचा साडेचार वर्षीय अनुभव सेनेलाही आहे. खुद्द सेनाप्रमुखचमंत्रालयासारख्यांना तो आमचा शिवसैनिक आहे असं प्रशस्तीपत्र देत!

बाळासाहेब ठाकरेंना अशी वादग्रस्त विधानं करणं, बेधडक बोलणं, परिणामांची पर्वा नसणं हे त्यांच्या व्यक्तित्त्वाला आणि कर्तृत्वाला शोभणारं होतं. त्याची राजकीय किंमत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष मोजण्याची तयारी असे. ती त्यांची राजकीय खेळी असे. पण काही वजनं ठरावीक वजनाच्या पैलवानांनीच उचलायची असतात हा साधा नियम उद्धव ठाकरे विसरले?

ज्या पोलिसांवर आरोप झालेत, शिक्षा झालीय त्यांना सुप्रीम कोर्टापर्यंत आपली बाजू मांडता येणार आहे. आपल्याच पोलिसांवर खटले दाखल करून त्यांना जन्मठेपेला पाठवण्याची हौस कुठल्या सरकराला असणार? पण न्यायप्रक्रियेत हस्तक्षेप करू नये असा सभ्य संसदीय दंडक आहे. आंतरराष्ट्रीय उद्यानं, पर्यटन स्थळं यांचा डेटा ठेवण्यापेक्षा उद्धवजींनी जरा आपल्याच दिवाकर रावतेंसारख्या ज्येष्ठ नेत्यांकडून संसदीय कामकाज, कायदे, न्यायपालिका, गृहमंत्रालय, शासन या गोष्टी समजून घ्याव्यात. दरबारी राजकारणापेक्षा जनता दरबाराचं राजकारण करावं. मनोहर जोशी, सुभाष देसाई अशा व्हाईट कॉलर राजकारण्यांपेक्षा रावते, कदम, शिंदे अशा प्रत्यक्ष मैदानात उतरणार्या नेत्यांना जवळ करावं.

पक्षप्रमुखांनी एखादी भूमिका घेतली की त्याविरोधात न बोलता ती रेटून नेण्याची कसरत प्रवक्त्यांना करावी लागते. ‘सामना’चे कार्यकारी संपादक किंवा सोयीचं ऐकू येणारे मनोहर जोशी यांनी खर्या नेत्यांचं बोन्साय केलंय. मातोश्रीवरच्या चौकडीने भुजबळ, राणे, नाईक ते राज ठाकरे असे बिनीचे शिलेदार बाहेर काढले. आजही रामदास कदमांसारखे आत्मघातकी पथक कधी स्फोट करेल काही सांगता येत नाही. राणेंविरुद्ध दोन हात केलेले उपरकर बाहेर गेले. तर राणेंसोबत बाहेर गेलेले परब सन्मानाने आत आले. सरवणकरांच्याही आट्यापाट्या चालवून घेतल्यात. ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद सर्व ठिकाणी पदावरून संघटनेत संघर्ष आहेत. निवडणुका जवळ येतील तसं सापशिडीच्या आणि फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेला उधाण येईल. मनसेच्या प्रेमातील कमळाबाई धनुष्य बाण सोडून धावतं इंजिन पकडू शकते. बाळासाहेबांच्याच हयातीत साकारलेल्या शिवशक्ती भीमशक्तीचा शक्तिपात बाळासाहेबांनाच डोळे मिटण्याआधी पहावा लागला. त्यांची शेवटची आळवणी मला सांभाळलंत तसं उद्धवला, आदित्यला सांभाळा, ही सैनिकांचं हृदय हेलावणारी असली तरी सैनिकांना मनोभावे पटलेली नाहीये.

अशा पार्श्वभूमिवर, पक्षात ‘चैतन्य’ आणण्यासाठी भलत्याच असंमजस मार्गाला जाण्यात आपण खूप धूर्त राजकीय खेळी केलीय, असं उद्धवजींना वाटत असेल तर ते आजही चुकीच्या सल्लागारांच्याकोंडाळात आहेत. त्यामुळे त्यांनी हे लक्षात ठेवावं, अंगात फक्त ठाकरे रक्त असून चालत नाही, त्याचा मेंदूला नीट पुरवठा होतोय की नाही हे पण सतत पहावं लागतं!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *