आजच्या इंटरनेट आणि सोशल नेटवर्किंगच्या युगात तरुणपिढीला सर्व विषयांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध झाली आहे. पण यामुळे आजची तरुणपिढी साहित्य आणि पुस्तकं यापासून दूर जात आहे. मराठी भाषेलाही समृद्ध साहित्याची परंपरा लाभली आहे. यामध्ये कथा, कादंबर्या याबरोबरच नाटक, आत्मचरित्र, प्रवासवर्णनं अशा विविध साहित्यप्रकारांचा समावेश होतो. आजच्या तरुणांना याच समृद्ध साहित्याची ओळख व्हावी यासाठी गोरेगावातील काही तरुण एकत्र येऊन एक उपक्रम राबवत आहेत. फिनिक्स फाऊंडेशन या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून ते साहित्यिकांची आणि त्यांच्या साहित्याची ओळख करून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. प्रत्येक महिन्याला एक साहित्यिक निवडून त्याच महिन्याच्या शेवटच्या शनिवारी त्यांचं साहित्य लोकांसमोर आणण्यात येणार आहे.

या उपक्रमाची सुरुवात विजय तेंडुलकर यांच्या ‘मादी’, ‘अजगर आणि गंधर्व’ तसंच ‘ओळख’ या तीन एकांकिकांच्या प्रयोगाने करण्यात आली. श्रेया बुगडे, संकर्षण कर्हाडे, अनिकेत साने, अक्षता गायकवाड, प्रसाद मोडक, शिल्पा साने, देवेंद्र जोशी, करिश्मा साळुंखे, प्रितेश सोढा, वैभव केळकर या सिने-नाट्यसृष्टीत कार्यरत असणार्या तरुण कलाकारांनी या एकांकिका सादर केल्या. २९ जून रोजी पाटकर महाविद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. या पुढेही या उपक्रमास रसिक प्रेक्षक, आणि कलाकार आणि साहित्यिक यांचं असंच सहकार्य लाभेल अशी आशा फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने व्यक्त करण्यात आली. ज्या कुणाला या उपक्रमात सहभागी व्हायचं असेल त्यांनी सुदेश सावंत ९८२१३५५२६४ आणि गिरिश सावंत ९८६७४४४४१८ यांच्याशी संपर्क साधावा, असं फिनिक्स फाऊंडेशनतर्फे सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *