आगामी २०१४ च्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. कुठे आरोप-प्रत्यारोप, तर लोकसभा निवडणुकीतील जागांचे वाटपही जाहीर होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराला खर्या अर्थाने सुरुवात झाली ती सांगलीतील महापालिका निवडणुकीने. साधी महापालिकेची ही निवडणूक पण तिथे जी रणधुमाळी झाली त्याने आगामी सत्ताकारणाची झटापट कशी होईल याची चुणूक सगळ्यांनीच अनुभवली. सत्तेसाठी एकत्र येणारे प्रचारात गुरकावत एकमेकांवर अंगावर धावून गेले.

सांगली-मिरज-कुपवाडा अशी ही महापालिका. मात्र पुढच्या निवडणुकीचा हा सराव सामना म्हणूनच त्याकडे पाहिलं गेलं. दुसरं म्हणजे आपण कुठे आहोत हे आजमावण्यासाठी सत्ताधार्यांना ही लिटमस टेस्ट होती. खरंतर महापालिकेची ही निवडणूक म्हणजे फार काही मोठं राजकारण नव्हतं. पण सांगलीच्या पारंपरिक घराण्यांच्या राजकारण्यांची झालर या निवडणुकीला होती. वसंतदादा पाटील आणि राजारामबापू पाटील या दोन्ही मूळ काँग्रेसनेत्यांत जी राजकीय चढाओढ होती ती पुढच्या पिढीनेही कायम ठेवली आहे. या दोन घराण्यांतील वादातून संघर्ष पेटला. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असली तरी सांगलीत हे दोन्ही पक्ष एकमेकांचे वैरी आहेत. जयंत पाटलांनी काँग्रेसला बाजूला ठेवत थेट भाजपशी युती करत सत्ता आपल्या हातात ठेवली होती. मदन पाटील, प्रतिक पाटील यांना दूर ठेवलं. मात्र पाच वर्षांचा या अजब युतीचा कार्यकाळ तसा फार काही दैदिप्यमान नव्हता. पायाभूत सुविधांबाबत उदासिनता, पाणीपट्टी, वाढलेले कर, विकासातील अडथळे, गुन्हेगारांना राजकीय आश्रय या सगळ्या प्रश्नांबाबत लोकांत नाराजी होती. म्हणूनच यावेळी लोक काय कौल देतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासहित काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व मंत्री, दिग्गज नेते या महापालिकेसाठी प्रचारात उतरले होते. रोजच्या रोज एकमेकांचे कपडे फाडले जात होते. काँग्रेसने मात्र यावेळी एक वेगळंच तंत्र वापरलं. राष्ट्रवादीच्या भल्या नेत्यांची त्यातून भंबेरी उडाली. सांगलीतील राजकारणावर आपली मांड टाकू इच्छिणारे जयंत पाटील हेच काँग्रेसमध्ये येण्यासाठी आपल्या मागे लागलेत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी जाहीर केलं. तर हुसेन दलवाई म्हणाले की, ये अंदर की बात है, आरआर आबा हमारे साथ है… झालं यातूनच संभ्रम, गोंधळाला सुरुवात झाली. तर नारायण राणेंनी राष्ट्रवादी ही गुंडांची पार्टी कशी आहे यावर जोर दिला. अचानक असा हल्ला झाला आणि राष्ट्रवादी हलली. यावर काँग्रेसमध्ये जायला मला काय वेड लागलंय का, असा खुलासा जयंत पाटलांना करावा लागला. काँग्रेसने आक्रमक होत राष्ट्रवादीला बचावात्मक पवित्र्यात आणलं. मग प्रतिहल्ला सुरू झाला. नारायण राणे यांचं जुनं रेकॉर्ड अजितदादा पवार आणि आर. आर. पाटील यांनी काढलं. अजितदादांनी तर चेंबूरच्या त्या जुन्या गँगला उजाळा दिला. याशिवाय आर. आर. पाटील यांनी पुढचं पाऊल गाठलं. गुंडासोबत बसलो तर मांडी कापून देईन, या आपल्या डायलॉगवर झालेल्या टिप्पणीचा उल्लेख करत ते म्हणाले, मंत्रिमंडळाच्या बैठकीत राणेंच्या बाजूला मला बसायला लागत असल्याने दर बुधवारी मांडी कापून घ्यावी लागेल…

अशा सगळ्या आरोप-प्रत्यारोपात ही निवडणूक गाजली. या गदारोळातच एका पत्रकाराने सांगितलं की सांगली-मिरज-कुपवाडा या महापालिकेचा संक्षिप्त उल्लेख ‘सांगामिकुणाची?’ असा केला जातो. खरंच आहे ते, जणू निवडणुकीला स्वयंवराचंच स्वरूप आलं होतं. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या या संघर्षात शिवसेना-भाजप हे बाजूला फेकले गेले. निकालात शिवसेना-भाजप तर नामशेषच झाली. मनसेला मात्र एक जागा मिळाली. एकच गुच्छी (म्हणजे एकच फाईट) असे फलक सांगलीत फडकलेत. अनपेक्षितपणे अर्थात बाजी मारली ती काँग्रेसने. राष्ट्रवादीचं विमान खाली आलं. जयंत पवार आता फेसबुकवर स्टेटस अपडेट करून काँग्रेसने कसा गोंधळ घातला ते सांगतायत, पराभवाची जबाबदारी स्वीकारतायत. तर अजितदादांची चांगलीच सांगली झाली.

मुळात महापालिका निवडणुकीचा आणि विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीचा तसा अर्थाअर्थी काही संबंध नाही. या निवडणुकांची सगळी पार्श्वभूमीच वेगळी असते. पण या निवडणुकीत आज सत्तेवर असलेले हे दोन पक्ष एकमेकांचे लचके तोडायला कसे सज्ज आहेत ते स्पष्ट होतंय. आघाडी झाली तरी या निकालाच्या आधारे जागावाटप करताना संदर्भ लावले जातील. लोकसभेची निवडणूक आधी होणार, त्यात दोन्ही काँगे्रसची आघाडी होणार नाही असा होरा आहे. केंद्रात काय नवी समीकरणं घडतात यावर सगळं अवलंबून आहे. शरद पवारांसाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. आपलं संख्याबळ वाढवण्याचा राष्ट्रवादीचा आटोकाट प्रयत्न असणार. तो प्रयत्न महाराष्ट्रातच करावा लागणार. ज्येष्ठ नेत्यांना मैदानात उतरवण्याची तयारी झालेली आहे. त्यामुळे मोठा संघर्ष उडणार हे नक्की. आघाडी राहिली तर जागा वाटपावरून संघर्ष होईल, नाही झाली तर मग मोठा राडा होणार हे ओघाने आलंच. कोणकोणत्या मुद्यावर कोणाला टार्गेट करायचं याचा सराव आता झालेला आहे.

दुसरीकडे सांगली-मिरज-कुपवाडा महापालिकेच्या निकालाचे पडसाद युतीतही उमटू लागले आहेत. या निवडणुकीत शिवसेना-भाजपचा धुव्वा उडाला. गेल्या निवडणुकीत भाजपच्या जागा निवडून आल्या होत्या त्याला कारणीभूत होती ती मिरजमधील दंगल. दंगलीवर कसं स्वार व्हायचं ते भाजपला नीट माहीत. मात्र हा प्रयोग वारंवार होत नसतो. संधी मिळाल्यानंतर कर्तृत्व न दिसल्याने लोकांनी भाजपला नाकारलं. आता हम भी डुबे, तुम भी डुबे… अशी भावना या दोन्ही पक्षात आहे. त्याचाच फायदा घेऊन भाजपने शिवसेनेवर दबाव आणायला सुरुवात केलीय. या पराभवाचं विश्लेषण करण्याच्या भानगडीत न पडता भाजपने कन्नी कापली आहे. थेट लोकसभा निवडणुकीचीच तयारी केलीआहे. या निवडणुकीत जागा वाटप कसं असेल ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय. गोपीनाथ मुंडे अजून बोलायचे बाकी आहेत. पण तरीही मागच्या निवडणुकीत जो फॉर्म्युला होता तोच यावेळी कायम राहील असं भाजपचं धोरण आहे. म्हणजे २६ भाजपला तर २२ शिवसेनेला. मात्र यावर शिवसेनेने काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. सांगलीच्या चटक्याचा शिवसेनेने बोध घेतलाय की नाही ते अजून कळलेलं नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *