पंधरा वर्षांनंतर ‘न्यू इंग्लंड’ म्हणून ओळखल्या जाणार्या राज्यामध्ये पुन्हा एकवार बृहन् महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन भरणार होतं. १९९७ साली बॉस्टनला झालेल्या समारंभात लता मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, प्रा. राम शेवाळकर हे कला-संस्कृती आणि साहित्य या क्षेत्रांमधले अत्युच्च मान्यवर हजर होते. २०१३ साली बॉस्टनलाच हा कार्यक्रम नियोजित केला होता, पण बॉस्टनमध्ये काही लक्ष डॉलर्स जास्तीचा खर्च झाला असता म्हणून कार्यकारिणीने उचित निर्णय घेतला की, अधिवेशन हे र्होड आयलंड राज्यातल्या प्रॉव्हिडन्स या शहरातच भरवायचं, म्हणजे बॉस्टनपासून ४० मैलांच्या अंतरावर. प्रॉव्हिडन्सच्या महापौरांकडून भक्कम पाठिंब्याचं आश्वासन मिळालं आणि ते शेवटपर्यंत पाळलंही गेलं! तारखा निश्चित झाल्या. ५ ते ७ जुलै २०१३, ‘बृहन् महाराष्ट्र मंडळ’ या नावाखाली कॅनडा आणि अमेरिका या दोन अजस्र राष्ट्र्रांमधील सुमारे चार डझन मराठी भाषिक मंडळं एकत्र येऊन, दर दोन वर्षांनी हा प्रेक्षणीय सोहळा भरवतात. प्रतिनिधींची नावनोंदणी अगदी तडाखेबंद वेगाने सुरूझाली आणि संख्या थेट ३,२००च्या घरात जाऊन थडकली.

जुलै ४ हा अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन, बॉस्टन टी पार्टीने इंग्रजी राजवट उलथून टाकण्याचा श्रीगणेशा करून, शेवटी जॉर्ज वॉश्गिंटनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिशांना हुसकून लावलं तो दिवस. सुरुवातीला फक्त १३ राज्यं संघराज्यात सामील होती. आता ………राज्यं आहेत. हवाई हे शेवटी म्हणजे १९४९ साली अमेरिकेमध्ये विलीन झालेलं राज्य. प्रॉव्हिडन्समध्ये अनेक जगप्रसिद्ध शिक्षणसंस्था आहेत. महाराष्ट्राचे ख्यातनाम उद्योजक दि. शंतनुराव किर्लोस्कर हे येथील एकेकाळचे विद्यार्थी होते. जगातलं क्रमांक एकचं विद्यापीठ हॉर्वर्ड आणि एमआयटी (मॅसॅच्युसेटस् इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) या संस्था देखील प्रॉव्हिडन्स शहरातल्या परसदारातल्या. अमेरिकेत स्वातंत्र्यदिनानिमित्त भव्य रोषणाई आणि फटाक्यांची आतषबाजी प्रत्ययास येत होती.

अधिवेशनाच्या उद्घाटनाच्या समारंभाच्या प्रारंभी आशिष चौघुले आणि बाळ महाले यांनी समयोचित भाषणं केली. त्यानंतर मराठी भाषा किती प्रगत होत गेली याची झलक दाखवली गेली. त्यानंतर मुख्य सभागृहात डॉ. मीना नेरुरकर लिखित आणि दिग्दर्शित पं. हृदयनाथ मंगेशकर यांच्या श्रवणीय गाण्यांवर आधारित कार्यक्रम होता. त्याला समांतर असे इतरही कार्यक्रम असल्याने श्रोतेवृंद विभागला गेला. पण अनेकांना संधी देणं क्रमप्राप्त असल्याने संयोगकांचा नाईलाज होता.

सर्वांचे डोळे लागले होते ते रात्री सादर होणार्या ‘सारेगम’ या प्रथमच उत्तर अमेरिकेतल्या कलाकारांसाठी घेतलेल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे. त्याची तयारी सहा महिने सुरू होती.

आग्रा, जयपूर अशा गाजलेल्या घराण्यांप्रमाणेच टोरांटोमध्ये नरेंद्र दातार यांचंही प्रचंड योगदान असलेलं, गेलं पाव शतक अस्तित्वात असलेलं दातार घराणंच जणू निर्माण झालं आहे! त्याचे दोन शागिर्द रवी दातार आणि समिधा जोगळेकर यांना कॅनडाच्या प्रतिनिधींचा भरभरून प्रतिसाद मिळत होता. पहिल्या दोन फेर्यांत समिधा आघाडीवर होती. पण तिच्यावर शेवटी मात केली ती रवी दातारने. त्याला प्रथम क्रमांक मिळाला असला तरी समिधाचं ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे गीत दीर्घकाळ रसिकांच्या मनांत गुंजन करत होतं! विजेत्यांना राजाराणी ट्रॅव्हल्सच्या अभिजित पाटील यांच्या हस्ते बक्षिसं प्रदान करण्यात आली. अभिजितमुळेच व्हिसा मिळणं, प्रवासाचं योग्य आयोजन होणं या एरव्ही किचकट वाटणार्या गोष्टी सुलभपणे पार पडतात.

बहुतेक लोकांना बाळ फोंडके हे नाव अज्ञात होतं. ‘हा कोण सांप्रति, नवा पुरुषावतार’ हेच प्रश्नचिन्ह बहुतेकांच्या चेहर्यावर उमटलं होतं. पण प्रेक्षकांनी त्यांच्या भाषणाला भरभरून दाद दिली. ‘ऋणानुबंध’ या विषयांवर अत्यंत सोप्या शब्दात विश्लेषण करत, आपल्या वक्व्याला शास्त्रीय आधार देत अनेक उदाहरणांचा दाखला देऊन त्यांनी आपली छाप प्रेक्षकांवर पाडली. त्यानंतर होणार होता – ‘संगीत मानापमान’चा प्रयोग. शंभर वर्षं झाली तरी त्यातली गाणी आजही लोकप्रिय आहेत. बालगंधर्व, केशवराव भोसले ही मराठी रंगभूमीवरची प्रातःस्मरणीय नावं. त्यांनी महाराष्ट्राला भरभरून श्रवणसौरव्य दिलं. त्यांची अद्वितीय परंपरा सुरू ठेवण्याची जबाबदारी राहुल देशपांडे आणि प्रियंका बर्वे यांच्यावर पडली होती आणि त्यांनी अनुक्रमे धैर्यधर आणि भामिनीच्या भूमिका उत्कृष्टपणे सादर करून ती पार पाडली.

दुपारी ‘स्वरगंध’ ही सुरेल संगीताची मेजवानी नरेंद्र दातार आणि त्यांचा शिष्यगण समिधा जोगळेकर, रवी दातार, अनुजा पंडितराव, अत्रे यांनी प्रेक्षकांना दिली. रवीने अधिवेशनातला पहिला कार्यक्रम २००७ साली सिअॅटलमध्ये, अवघ्या १२ व्या वर्षी केला होता. तेव्हा डॉ. जब्बार पटेल म्हणाले होते, ‘या अधिवेशनाची एकच स्मृती माझ्या कायम स्मरणात राहील आणि ती म्हणजे रवी दातार!’ समिधाच्या आवाजातला गोडवा अवर्णनीय आहे. ती वर्षभर भारतात जाऊन प्रभा अत्रेंकडूनही गाणं शिकून आली आहे. ते सुद्धा ऑटेरिओ राज्य सरकारची शिष्यवृत्ती मिळवून, अनुजा ही मेडिकलच्या पहिल्या वर्षाला आहे. यानंतर महेश काळे या कलावंताचा कार्यक्रम मुख्य सभागृहात होता. त्याला टक्कर होती ती प्रशांत दामलेंच्या कार्यक्रमाची. या अधिवेशनात हीच तर अडचण होती. अनेक चांगले कार्यक्रम एकाच वेळी वेगवेगळ्या ठिकाणी होत असल्याने प्रेक्षकांची कुतरओढ होणं स्वाभाविकच आणि अटळही होतं.

अधिवेशनाच्या उद्घाटनप्रसंगी महेश मांजरेकरांनी त्यांना मराठी सफाईदार बोलता येणार नाही याविषयी खंत प्रगट केली होती. त्याचवेळी मराठी माणसाला एक प्रकारचा माज असतो असं सरधोपट विधानही केलं होतं. त्याची प्रचिती अजय-अतुल या नावाजलेल्या संगीत दिग्दर्शकांना येते असंही त्यावेळचे निवेदक महेश मांजरेकरांनी केलं. कारण त्याच वेळी आयफा पारितोषिक वितरण सोहळाही युरोपात होत होता आणि त्यासाठी या दुकलीस आमंत्रण होतं. त्यांचं नामांकनही झालं होतं. पण त्यांनी तिथे जाण्याऐवजी अधिवेशनास येण्याचं ठरवलं. त्यांच्याआधी अमेरिका आणि कॅनडा या देशांमधील साहित्य, उद्योग, तंत्रज्ञान, युवानेतृत्व अशा विविध क्षेत्रांमध्ये दैदिप्यमान कामगिरी बजावलेल्यांचा मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. ही चांगली प्रथा १९८९च्या डेट्रॉईटमधील अधिवेशनापासून सुरू झाली.

अजय आणि अतुल यांचं गणेश महिमाचं पहिलं गाणं तुफान गाजलं. अमिताभ बच्चनसारख्या महानायकानेही त्याचं कौतुक केलं. आज हे संगीतद्वय साता समुद्रापलीकडे पोहोचलेत. जर संगीतदिग्दर्शक झाला नसता तर कोण बनला असता या रोखठोक प्रश्नाला अतुलने ‘गुंड’ हे एकाक्षरी, वास्तववादी उत्तर दिलं! दोघांची मुलाखत प्रेक्षकांची चित्त प्रसन्न करून गेली.

जुलै ७, सकाळी साडेसहा वाजता दिलीप वेंगसरकर यांची मुलाखत द्वारकानाथ संझगिरी घेणार होते. त्या दिवशी लोकांची घरी परतण्याची घाई होती. परंतु सिनेमा आणि क्रिकेट हे प्रत्येक भारतीयाचं वेड असल्याने प्रतिसाद चांगला मिळाला.

संझगिरींनी वेंगसरकरला बोलतं केलं. अनेक किस्से त्याच्या तोंडून वदवले. पण प्रेक्षकांना जास्त किस्सा भावला तो जावेद मियाँदाद जेव्हा बाळासाहेब ठाकरेंच्या घरी गेला होता तेव्हाचा. कबाब केले होते. साहेब कधीच तिखट पदार्थ खात नसत. म्हणून जेव्हा जावेद त्यांना खाण्याचा आग्रह करू लागला तेव्हा ते म्हणाले, ‘मै तिखाँ खाता नही हूँ, खाली तिखी बाते करता हूँ!’ नंतर ते गप्पांच्या मूडमध्ये असताना जावेदने पाक-भारत सामने भारतात व्हावेत अशी इच्छा प्रगट केली, तेव्हा ठाकरी भाषेत जबाब मिळाला. ‘तुमच्या त्या मुशारफला आधी भारतविरोधी कारवाया थांबवायला सांग आणि नंतर सामन्याच्या गोष्टी कर’. कपिल देव हा हरियाणाचा अनपढ माणूस. त्याच्या गोलंदाजीवर तेव्हा राखीव खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या अनिल कुंबळेने एक सोपा झेल सोडला, तेव्हा कपिलने पॅव्हेलियनमध्ये परतल्यावर इतकं आकांडतांडव केलं की बिचारा कुंबळे रडायलाच लागला. मग कपिलला समजलं कुंबळे हा इंजिनिअर आहे. पण म्हणजे नेमकं काय? हे न उमजल्याने कपिलने एकाला विचारलं, ‘इंजिनिअर आदमी कब बनता है? स्कूल के बाद या कॉलेज के बाद?’ त्याने शारजातला आणखी एक किस्सा सांगितला. खेळाडूंना भेटायला सिनेनट मेहम्मूद चक्क दाऊद इब्राहिमला घेऊन आला होता. हे मोठे उद्योजक आहेत वगैरे दाऊदची ओळख करून देताना शब्द वापरत होता. दाऊदने खेळाडूंना सांगितलं, ‘तुम्ही पाकिस्तानला हरवा प्रत्येकाला एकेक गाडी बक्षीस देईन. तेवढ्यात कप्तान कपिल देव वादळासारखा आत घुसला आणि दाऊदकडे पाहून म्हणाला, ‘ये कौन आदमी है? यहाँ सिर्फ खिलाडी होने चाहिये. निकालो ये आदमी को बाहर’ दाऊद धुमसत बाहेर जाताना ओरडला, ‘वो गाडी की ऑफर कॅन्सल!’

तासभराच्या मुलाखतीनंतर ‘युवांकुर’ हा छान कार्यक्रम सांगतेपोटी झाला. त्यात सोनाली कुलकर्णी, भार्गवी चिरमुले, प्रिया बापट यांच्यासमावेत अनिकेत विश्वासरावही होता. लावण्या, गाजलेल्या गाण्यांवरील नृत्यं यामुळे प्रेक्षकांना भरघोस आनंद प्राप्त झाला. सर्वात जास्त टाळ्या घेतल्या त्या वैभव मांगले आणि अतिषा नाईक यांच्या विनोदी स्किटस्नी.

गेली २९ वर्षं अधिवेशनांचा सिलसिला सुरू आहे. ही परंपरा अमेरिकेतल्या मराठी मातीत चांगलीच रुजली आहे. निव्वळ मनोरंजन, मित्रमंडळींच्या भेटीगाठी, आपल्या उपवर मुलामुलींकरता जीवनसाथी शोधण्याची संधी. कारण कोणतंही असो, हजारो मराठी भाषिक केवळ भाषा हा समान धागा घेऊन तीन दिवस हजारो डॉलर्स खर्च करून येतात हीच आनंदाची गोष्ट आहे. पुढचं अधिवेशन लॉस एन्जेलिसला होणार, जाहीर झालं आणि पुन्हा २ वर्षांनी नक्की तिकडे भेटू अशा आणाभाकाही लोक घेताना दिसत होते! अनेक शाळा-कॉलेजचे माजी विद्यार्थी कट्टा या उपक्रमांत सहभागी होतात आणि जुन्या आठवणीत मश्गूल होतात. ‘युवांकुर’च्या कलाकारांनी कबूल केलं की जोपर्यंत आम्ही अमेरिकेच्या बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात आपलं योगदान देत नाही, तोपावतो आम्हाला महाराष्ट्रात मान आणि प्रतिष्ठा लाभत नाही! हे सर्टिफिकेट इतकं बोलकं आहे की त्यावर निराळं भाष्यच नको. अधिवेशन हा अमेरिका कॅनडामधील अनिवासी मराठी भाषिकांचा अविभाज्य बनलेला भाग. तो पुढील कित्येक वर्षं असाच अबाधितपणे, अव्याहतरित्या शाबूत रहावा हीच हार्दिक इच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *