कॉलेजेस्मध्ये मोबाईल जॅमर्स लावण्यावरून सध्या नवा वाद उफाळून आलेला आहे. कॉलेजेस्मध्ये लेक्चर्स सुरू असतानाही विद्यार्थ्यांच्या सेल फोन्सच्या घंट्या वाजतात, यावर उपाय म्हणून कॉलेजेस्मध्ये जॅमर्स बसवण्याचा प्रस्ताव पुढे आलेला आहे. हा जॅमर काय करतो? तर जॅमर त्या विशिष्ट भागातलं मोबाईलचं नेटवर्कच गायब करतो. त्यामुळे मग कुणाला फोन येण्याचा आणि कुणाचा फोन वाजण्याचाच प्रश्न नाही. विद्यार्थ्यांचा आणि विद्यार्थी संघटनांचा अर्थातच याला विरोध आहे. विद्यार्थ्यांचाच नाही काही प्राध्यापकांचाही विरोध आहे. उद्या एखादी इमर्जन्सी आली तर काय घ्या? हा त्या विरोधामागचा मुख्य मुद्दा. मुद्दा रास्त आहे. पण मग जॅमर बसवण्याची पाळी यावी इतपत परिस्थिती जाऊच का दिलीत?

गेल्या दहा बारा वर्षांत सेल फोन्स् हे आपल्या रोजच्या जगण्याचा अत्यावश्यक आणि अविभाज्य भाग झाले आहेत. सेल फोन्स नवीन नवीन आले होते, तेव्हा ज्याच्याकडे सेल फोन असे, अशा माणसाकडे कौतुकाने पाहिलं जाई. आता एखादा माणूस सेलफोन बाळगत नाही, असं कळलं की त्याचं अप्रूप वाटतं. साधारण मध्यमवर्गीय कुटुंबांतून मुलगा किंवा मुलगी शाळा पास झाले की त्यांना फोन घेऊन दिला जातो. पण काही काही पालक  आपल्या शाळकरी मुलाच्या हातातही त्याच्या मालकीचा मोबाईल देतात. मोबाईल बाळगण्याबद्दल काहीच म्हणणं नाही.

ज्याला तो विकत घेणं आणि बिल भरणं परवडतं त्यानं तो वापरावा. पण आपल्या देशात मुलांच्या हातात मोबाईल देताना पालक त्यांना मोबाईल मॅनर्स शिकवायचे विसरतात, कारण त्या बाबतीत ते स्वतःच अडाणी असतात.

खरं तर किती सोपं आहे! मोबाईल बनवणार्यांनी त्या मोबाईलमध्ये एक बटण दिलेलं असतं. ते दाबलं की मोबाईल ‘सायलेंट’ मोडवर जातो. पण तेही आपल्याकडे लोकांना जमत नाही. कुठलीही नवीन गोष्ट आपल्या आयुष्यात आली, की ती गोष्ट वापरण्याचे काही नियम असतात, काही डूज अॅन्ड डोन्टस् असतात. आपण थाटामाटात एक्सप्रेस हायवे बांधला, पण तो वापारायची अक्कल अजूनही आपल्याला पूर्णपणे आलेली नाही. एक्सप्रेस हायवे आणि रेस ट्रॅक यातला फरक आपल्या काही लोकांना माहितीच नाहीये. आता परवाचंच उदाहरण घ्या, आमच्या ठाणे स्टेशनवर सरकते जीने बसवले, ते सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासात बंद पडले. कुणी म्हणतं वाळूचं पोतं सांडलं कुणी म्हणतं उद्घाटनप्रसंगी कुंड्या ठेवल्या होत्या. त्या काढायला संबंधित माणसं विसरली. एकूण काय, तंत्राची हुशारी आपल्याला आलीय, पण ते वापरण्याची अक्कल नाही आली. सेलफोन्सचंही तेच आहे. तीस-तीस हजारचे फोन विकत घेणार्या माणसांना हॉस्पिटलमध्ये शिरल्याशिरल्या तो फोन सायलेंटवर टाकावा हे कळण्याइतकी एका पैशाची बुद्धी नसते. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल्स, नाट्यगृह, सिनेमागृह, वाचनालयं अशी सार्वजनिक ठिकाणं कम्पल्सरी सायलेंट झोन्सच असायला हवीत. पण आपण एक बटण दाबायचे कष्ट घेत नाही आणि मग जॅमरचा बडगा उगारला गेला की इमर्जन्सीत काय करायचं असा गळा काढतो.

नको तिथे, नको त्यावेळी मोबाईल वाजण्याचा त्रास आणि मनःस्ताप एका नटापेक्षा जास्त आणखी कोण सांगू शकणार. आपण तिकीट काढून नाट्यगृहात आलोय म्हणजे आपण ते नाट्यगृह आणि समोर काम करणारे नट विकत घेतलेत अशा आविर्भावात ही माणसं वागतात. काही लाज शरम बाकी असलेली माणसं त्यांचा मोबाईल एकदा वाजला की तो घाईघाईनं बंद करतात, खजिल वगैरे होतात. पण काहींना तेवढीही पडलेली नसते. ते खुशाल फोन रिसीव्ह करतात. ‘हाँ! नाटकाला बसलोय, नंतर करतो फोन!’ असं इथून ठणकावून सांगतात. काही महाभाग एकदा फोन वाजल्यानंतरही फोन सायलेंटवर टाकत नाहीत. तसं केलं तर बापच्या इस्टेटीतून आपलं नाव काढून टाकलं जाईल अशी भीती असावी बहुदा! नट विनवण्या करतात, काहीजण नाटक थांबवतात, काही उपदेशाचे चार डोसही पाजतात, पण या मोबाईलधारी मायबाप रसिकांवर त्याचा षष्प परिणाम नाही. जी गत नाट्यगृहात नटाची होते तीच वर्गात शिक्षकाची होत असणार! तसं जर होत असेल तर मग जॅमर लावण्याच्या मागणीत चूक काय?

इमर्जन्सी येऊ शकते हे बरोबर आहे. पण मग समोर आपल्या रक्ताचं पाणी करून काम करणारा नट किंवा घशाच्या शिरा ताणून शिकवणारा शिक्षक बिनलायकीचा असतो का? हॉस्पिटल्समध्ये शांतता पाळा असा बोर्ड लावणारे मूर्ख असतात का? गंमत म्हणजे हीच माणसं कोर्टात गेल्यावर आठवणीनं फोन्स सायलेंटवर टाकतात, कारण तिथे बडगा असतो ना! थोडक्यात काय! शेवटी ढुंगणावर हंटर हवा!

जॅमर बसवण्यानं गैरसोयी अनेक आहेत, पण मग तुमचे मोबाईल नको त्या ठिकाणी गळा काढणार नाहीत याची काळजी घ्या प्लीज!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *