१९ व्या शतकाच्या अखेरीस मुंबईत कापड गिरण्या आणि मोठमोठ्या उद्योगधंद्यांची उभारणी होऊ लागली. नोकरी, धंद्यांच्या शोधार्थ देशाच्या कानाकोपर्यातून लाखो लोक कायमच्या वास्तव्यासाठी मुंबईत आले. तेव्हा धारावी ही अशाच लाखो विस्थापितांचं आश्रयस्थान बनली. याच दरम्यान गुजरातमधून १९२४ साली काही लोक स्थलांतरित होऊन मुंबईत आले आणि त्यांनी आपला पारंपरिक मडकी बनवण्याचा व्यवसाय धारावीत सुरू केला. तेव्हापासून आजतागायत ही मंडळी हा मडके बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. या धारावीत मुस्लीम समाजबांधवांची, दाक्षिणात्यांची आणि गुजराती लोकांची फार मोठी वस्ती आहे.

हे कुंभारकाम करणारे लोक आपल्या या मडके आणि मातीच्या वस्तू बनवण्याच्या व्यवसायासाठी लागणारी माती ही आजही गुजरातमधूनच मागवतात. मडके बनवण्याची त्यांची पद्धत काहीशी अशी आहे… सर्वप्रथम ती माती काही काळ भिजवून ठेवतात. नंतर ती चांगल्याप्रकारे साफ आणि स्वच्छ करून ती एका मोठ्या चाकावर वळली जाते. माती वळतानाच तिला मडक्याचा आकार दिला जातो. मग मातीला मडक्याचा आकार प्राप्त झाला की ते मडकं चांगल्याप्रकारे भट्टीत भाजून घेतलं जातं. मग त्यावर सुबक कोरीव नक्षीकाम आणि रंगकाम केलं जातं. त्यामुळे ही मडकी फारच रेखीव दिसू लागतात. धारावीच्या या कुंभारवाड्यात केवळ मातीची मडकीच बनत नाहीत तर दिवाळीत उपयोगी पडणारे तर्हेतर्हेचे दिवे, वेगवेगळ्या आकाराच्या पणत्याही इथे तयार केल्या जातात. इतकंच नाही तर दहीहंडीसाठी लागणारी मडकी, मातीच्या कुंड्या, पिग्गी बँक अशा सर्वच मातीच्या लहान-मोठ्या आकाराच्या वस्तू इथे तयार केल्या जातात. ही मातीची भांडी भट्टीत जाळण्यासाठी लागणारी चिंधीदेखील गुजरातमधील सुरत या शहरातून मागवली जाते.

धारावीतील संत गोरा कुंभार मार्गावरील कुंभारवाडा हा परिसर एकूण १२ एकर जागेत वसलेला आहे. मातीपासून भांडी बनवण्याच्या या कामासाठी लागणारी माती ही ‘टेराकोटा’ प्रकारची माती आहे. तसंच इथे तयार केलेला हा सर्व माल मुंबईसह भारतभरच नव्हे तर जगभरातील युरोप, अमेरिका, आफ्रिका इथेदेखील निर्यात केला जातो. या देशांमधूनही धारावीत बनलेल्या या भांड्यांना प्रचंड मागणी आहे.

इथे व्यवसाय करणार्यांच्या आयुष्याची नाळ ही॒मातीत घट्ट रुतलेली आहे, असं धारावीत पूर्वापार व्यवसाय करत आलेले लालजी वाला यांनी सांगितलं. आजकाल नवनवीन संस्कृतीमुळे॒हा व्यवसाय टिकेल का याची खात्री देता येत नाही. तरीही आम्ही हा व्यवसाय टिकून ठेवणारच. मग त्यात काही बदल जर झाले तर ते बदल स्वीकारून आमचा हा व्यवसाय सुरूच ठेवू असंही त्यांनी सांगितलं. या कुंभारांचं सारं आर्थिक, सामाजिक आणि भावनिक विश्व हे या कुंभारवाड्यातच आहे. आताच्या पिढीने याच कामाची परंपरा पुढेही सुरू ठेवली असली तरी आज या व्यावसायिकांची मुलंसुद्धा चांगलं शिक्षण घेऊन चांगल्या पदावर काम करताहेत. इथलं संपूर्ण वातावरण हे मातीच्या गंधात दरवळलेलं असतं. मातीचं अखंड विश्व या कुंभारवाड्यात आपल्याला पहायला मिळतं. इथे बनवलेली॒विविध आकारची मडकी, दिवे तसंच विविध प्रकारच्या सुबक आणि तितक्याच मनमोहक मातीच्या कलाकृती पाहून मन भारावून जातं.

 प्रणाली जाधव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *