एशियन अॅथलेटिक्स चॅम्पियन्सशिप पहाण्यासाठी आवर्जून पुण्याला गेलो होतो… महाराष्ट्राने अवघ्या २१ दिवसांत दृष्ट लागण्यासारखं या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं आयोजन केलं होतं. तामिळनाडू सरकारने श्रीलंकन खेळाडूंना मज्जाव केल्याने ऐनवेळी ही स्पर्धा महाराष्ट्रात हलवण्यात आली. महाराष्ट्र सरकारने अवघ्या २१ दिवसांत या स्पर्धेचं आयोजन यशस्वीपणे केलं. त्यासाठी प्रल्हाद सावंत आणि त्यांच्या महाराष्ट्र अॅथलेटिक्स असोसिएशनचं कौतुक करावं तेवढं थोडंच… पण मैदानाबाहेर विक्रमी कामगिरी करणार्या महाराष्ट्राच्या एकाही अॅथलिटला मेडल जिंकता आली नाहीत. स्पर्धेतल्या ४२ गोल्ड मेडलपैकी भारताच्या खाती आली अवघी दोन गोल्ड मेडल्स. एकूण २ गोल्ड ६ सिल्व्हर आणि ९ ब्राँझ अशा एकूण १७ मेडल्ससह यजमान भारत सहाव्या क्रमांकावर होता. जपानमध्ये झालेल्या गेल्या आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धेपेक्षा ही कामगिरी एका क्रमांकाने सरस होती. जपानमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत आपण १ गोल्ड, ३ सिल्व्हर आणि ८ ब्राँझ अशा एकूण १२ मेडल्ससह सातवे होतो.

भारताने आपली मेडलची संख्या १२ हून १७ वर नेली. पण त्यात एकाही महाराष्ट्रीय खेळाडूचं नावं नसावं… या स्पर्धेच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. तर स्पर्धेचा समारोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाला. अजित पवार हे तर आता महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत. बालेवाडीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा आहेत, पण खेळाडू कुठे आहेत याचं परीक्षण आपण कधी करणार आहोत. महाराष्ट्राचे अॅथलिट आंतरराष्ट्रीय स्तरावर कामगिरी करू शकत नाहीत का? कविता राऊतने गेल्या काही वर्षांत आशादायी कामगिरी केलीय, पण त्यानंतर काय? महाराष्ट्रात शालेय आणि युनिव्हर्सिटी पातळीवर हे खेळ जगवण्यासाठी पुरेसे प्रयत्न होताना दिसत नाहीत. महाराष्ट्राच्या खेळाडूंत गुणवत्ता नाही असं नाही. पण ती हुडकण्याचे आपले प्रयत्न अपुरे दिसतायत.

आपण फक्त खांदेकरी…

पालखी कुणाचीही असो खांदा देण्यासाठी आपण महाराष्ट्रीय सदैव पुढे असतो. आता हेच बघा तामिळनाडूने नकार दिल्यानंतर ही आशियाई अॅथलेटिक्स स्पर्धा महाराष्ट्रात खेळवण्यात आली. ती ही अवघ्या २१ दिवसांत. १७ कोटी रुपये त्यासाठी महाराष्ट्र सरकारने दिले. स्पर्धा आयोजनातील महाराष्ट्र शासनाची ही तत्परता खेळाच्या विकासाचा मुद्दा आला की कुठे गायब होते कोण जाणे? महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिले जाणारे गेल्या दोन वर्षांचे शिवछत्रपती पुरस्कार अद्याप दिले गेलेले नाहीत. दरवर्षी हे पुरस्कार सरकारी शिवजयंतीला म्हणजेच १९ फेब्रुवारीला दिले जावेत असं पुरस्काराच्या नियमावलीत स्पष्ट म्हटलंय. पण तरीही हे पुरस्कार वर्षानुवर्षं रेंगाळले जातात… खेळाडूंची उमेदीची वर्षं असताना हे पुरस्कार आणि पैसे जर दिले गेले तर त्याचा फायदा त्या खेळाडूच्या करिअरसाठीही होऊ शकतो. पण लक्ष कोण देतंय…

मैदानाबाहेर अॅथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा राहिलाय. अगदी कालपरवापर्यंत आशियाई अॅथलेटिक्स संघटनेची निवडणूक हरेपर्यंत कलमाडी हे सर्वेसर्वा होते. भारतीय ऑलिम्पिक संघटनेवर तब्बल दोन दशक कलमाडी यांनी राज्य केलं आणि भारतीय अॅथलेटिक्स संघटनेवरही. आता कलमाडी ना भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष आहेत ना आशियाई अॅथलेटिक्स संघटनेचे… त्यांचे विश्वासू समजले जाणारे आदिल सुमारीवाला या मुंबईकर ऑलिम्पियन अॅथलिटकडे आता भारतीय अॅथलिटची सूत्रं आहेत. आदिल स्वतः आंतरराष्ट्रीय दर्जाचे अॅथलिट आहेत. मॉस्को ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचं प्रतिनिधित्वही केलंय. १०० मीटर शर्यतीत १९८०च्या त्या ऑलिम्पिकमध्ये आदिलनी ११.०४ सेकंदाची वेळ नोंदवली होती. त्या ऑलिम्पिकमध्ये ज्याने गोल्ड मेडल जिंकलं त्या ग्रेट ब्रिटनच्या अॅलन वेल्सने वेळ दिली होती १०.२५ सेकंद. गेल्या ३३ वर्षांत १०० मीटर शर्यतीत भारताचा राष्ट्रीय विक्रम आहे १०.२१ सेकंदाचा. अनिल कुमारने तो नोंदवला होता ५ जुलै २००० रोजी. गेल्या ३३ वर्षांत जगाने १०० मीटर शर्यतीत ९.५८ सेकंदाची मजल मारलीय. जमैकाच्या उसैन बोल्टच्या नावावर हा रेकॉर्ड आहे. पण भारत अजूनही १०.२५ वरच अडकलाय.

या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बालेवाडीत आशियाई स्पर्धेचा उरूस झाला. नेत्यांनी मिरवून घेतलं. स्पर्धा खूप झाल्या आता गरज आहे ती पुन्हा एकवार खेळाडू घडवण्यासाठी प्रयत्न करण्याची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *