‘नटरंगी नार’ची सुरुवात मनाला हवी तशीच झाली होती. पण म्हणावं तसं कार्यक्रमाला बुकिंग मिळत नव्हतं. प्रत्येक प्रयोग अंगावर घेऊनच लावावा लागत होता. बुकिंगच्या पैशातून हॉलचं भाडं निघतानाही नाकी नऊ यायचे. मग कलाकारांचे पैसे द्यायचे कुठून? प्रत्येक प्रयोगाला पदरमोड करून आता माझ्याकडचेही पैसे संपायला आले होते. मुंबईच्या लावणी महोत्सवामुळे मला जरा बरे दिवस आले होते. पण ‘नटरंगी नार’मुळे कमावलेलं सारंच जात होतं. आपल्यावर पुन्हा तसेच दिवस येणार नाहीत ना, अशी काळजीसुद्धा लागून राहायची. भलतेसलते विचार मनात यायचे. त्यामुळे माझं जगणं खूपच अडचणीचं झालं होतं. मी जवळपास कर्जबाजारी होण्याच्याच वाटेवर होते. अनेकदा ‘नटरंगी नार’ काढून मी चूक तर केली नाही ना, असाही विचार यायचा. अशावेळी माझं एक मन मला सांगायचं की, कार्यक्रम चालत नाहीये तर मग बंद करून टाक आणि तेव्हाच दुसरं मन सांगायचं, थांब घाई करू नकोस. आज ना उद्या लोक नक्कीच येतील या कार्यक्रमाला…. दोन्ही मनाच्या कात्रीत मी सापडले होते. कळत नव्हतं काय करावं ते. पण ‘नटरंगी नार’ हा खरोखरच एक दर्जेदार कार्यक्रम होता. त्यामुळे लोकांना तो नक्कीच आवडेल असा एक विश्वास मला होता… या विश्वासाच्याच जोरावर मग मी ‘नटरंगी नार’ काही झालं तरी बंद करायचा नाही. जमतील ते सारे प्रयत्न करायचे आणि या कार्यक्रमाचं बुकिंग वाढवायचंच, असं पक्क केलं.

पण आता बुकिंग वाढवायचं कसं याचा विचार मी करत होते. तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे, इतक्या चांगल्या कार्यक्रमाला लोक का येत नाहीत, याचं कारण आधी शोधलं पाहिजे. कारण आजारच माहीत नसेल तर इलाज तरी काय नि कसा करणार? म्हणून मग आता मी ती कारणं शोधू लागले. तेव्हा मला जे कळलं ते खूपच भयानक होतं. आता माझी अवस्था आणखीच बिकट झाली होती. ‘नटरंगी नार’ हा लावण्यांचा कार्यक्रम आहे. त्यात बायका नाचतात. म्हणून समाजातील बायका आपल्या नवर्यांना या कार्यक्रमाला धाडत नव्हते. त्या बायकांच्या या विचारावर मला अजिबातच राग नाही आला. कारण मीसुद्धा एक बाईच होते. मला कळत होतं त्या बायकांच्या मनातलं. दुसरं म्हणजे, त्या काळात लावणी बदनामच होती! तमाशातल्या बायका पुरुषांना फितवतात नि पैसे लुटतात असाच सर्वांचा समज होता. पण लावणी कधीच वाईट नव्हती. ती पवित्रच होती. या सार्याचा विचार करून मग मी आता लावणीला लागलेला हा बट्टा पुसून काढायचा आणि तिला समाजात मान मिळवून द्यायचा असं ठरवलं. कारण तमाशात कलावंत आपली कला सादर करत असतो. नृत्य करणारी बाई आपली अदाकारी पेश करत असते. यात कुठेही वाईट कृत्य केलं जात नाही. हे सारे विचार आता लोकांपर्यंत आणि समाजातल्या बायकांपर्यंत पोचवायचं असं मी ठरवलं. ते कसे पोचवायचे? तेव्हा अचानकच माझ्या लक्षात आलं की, मी कार्यक्रमाला जिथे जिथे जाते तिथे तिथे स्थानिक पत्रकार माझी मुलाखत घ्यायला येतात. त्यांनाच हाताशी धरून आपलं म्हणणं लोकांपर्यंत पोचवायचं असा मी विचार केला.

मी ‘नटरंगी नार’चा प्रयोग संपल्यावर जमलेल्या रसिकांशी आणि पत्रकारांशी संवाद साधायला सुरुवात केला. मी त्यांना म्हणायचे, ‘लावणी ही पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत झाकलेली असते. त्यामुळे लावणी पाहण्यात तुम्हाला काय गैर वाटतंय. मला तर वाटतं की, तुम्ही सार्या कुटुंबासोबत लावणीचा कार्यक्रम पाहू शकता. तुम्ही माझे मायबाप रसिक आहात. तुम्ही माझ्या लावणीचा प्रचार केलात तर ती खर्या अर्थाने लोकांपर्यंत पोचेल. दादा, भाऊ तुम्ही आज एकटे माझा कार्यक्रम पहायला आलात. उद्या येताना तुमच्या आईला, बहिणीला, बायकोला बरोबर घेऊन या. माझ्या वहिन्या जेव्हा हा कार्यक्रम पाहतील तेव्हा त्यांना कळेल की खरंच हा कार्यक्रम वाईट नाहीये. म्हणून सांगतेय एकदा तरी त्यांना घेऊन या. मग पुढल्यावेळी त्या तुम्हाला लावणी पहायला अडवणार नाहीत. उलट त्याही कार्यक्रम पहायला येतील.’ ‘नटरंगी नार’च्या प्रत्येक कार्यक्रमानंतर मी हे सारं ओरडून ओरडून लोकांना समजावून सांगत होते. तेव्हा माझं हे म्हणणं पेपरातही छापून येत होतं.

माझ्या या प्रयत्नांना किती यश मिळेल ते मला ठाऊक नव्हतं. पण हार मानून गप्प बसून राहणं मला मान्य नव्हतं. त्याहीपेक्षा लावणीला आता बदनाम होऊ द्यायचं नाही, हे मी ठरवलं होतं. त्यासाठीच हा सगळा खटाटोप मी करत होते. मला जर या कामात यश मिळालं तर ‘नटरंगी नार’लाही याचा फायदा होणार होता. नुसतं ‘नटरंगी नार’लाच नाही तर सगळ्याच लावण्यांच्या कार्यक्रमांना याचा फायदा होणार होता. लावणीबद्दलचे गैरसमज दूर झाले तर लोक आपसूकच लावणी बघायला येतील आणि मग कार्यक्रमांनाही गर्दी होईल, असा मला ठाम विश्वास होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *