महाराष्ट्राचा पहाडी आवाज अर्थात लोकशाहीर विठ्ठल उमप यांचा ८३ वा वाढदिवस नुकताच साजरा करण्यात आला. रविंद्र नाट्य मंदिरात दादांच्या चाहत्यांच्या गर्दीत हा सोहळा संपन्न झाला. ही जयंती त्यांच्या आठवणी जागवत आणि त्यांची गाणी गात साजरी करण्यात आली. पण हा कार्यक्रम नेहमीच्या गीतांच्या कार्यक्रमांच्या धाटणीतला नव्हता. तर यासाठी खास संकल्पना तयार करण्यात आली होती. लोकशाहीर विठ्ठल उमप यांना उभा महाराष्ट्र त्यांच्या गायकीमुळे, अभिनयामुळे ओळखतो. तर दादांना संपूर्ण देश ओळखतो ते त्यांच्यातील अभिनव लोककलेसाठी. शाहिरी परंपरेपासून थेट भारूड, किर्तनापर्यंतच्या सगळ्या लोककला दादांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात जोपासल्या. या सगळ्या लोककलांमधीलच एक म्हणजे कोळीगीतं. दादांची ही जयंती त्यांनी गायिलेल्या कोळीगीतांवर आधारित संकल्पनेच्या माध्यमातून साजरी करण्यात आली.

लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी कोळीगीतांची परंपरा आपल्या सुरेल आवाजाने उज्जवल करून ठेवलीय. खरं तर दादांचं कोळी बांधवांशी एक जिव्हाळ्याचं नातं होतं. यातूनच दादांनी असंख्य कोळीगीतं गायली. ‘कोळीगीतांचा नाखवा’ या नावाने हा कोळीगीतांचा सदाबहार कार्यक्रम सादर करण्यात आला. यावेळी दादांच्या जवळचे आणि संपूर्ण उमप कुटुंबीयांशी स्नेहसंबंध असलेल्या मान्यवरांनाही खास निमंत्रित करण्यात आलं होतं. निमंत्रितांमध्ये जगन्नाथ हणुमंत सोनावणे (शेठ), प्रभाकर हणुमंत सोनावणे (शेठ), बी.ए.तुपे गुरुजी, सूर्यकांत सकट, राजन गावंड, सचिन चव्हाण, अनिल गायकवाड, दादांच्या पत्नी वत्सलाताई उमप आणि साप्ताहिक ‘कलमनामा’चे संपादक युवराज मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते. तसंच सुरेश म्हात्रे, कल्याण गाडे आणि ओएनजीसीच्या वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकार्यांचं विशेष सहकार्य लाभलं होतं. यावेळी सर्व मान्यवरांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला. जगन्नाथ हणुमंत सोनावणे यांनी तर लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या गौरवपर एक कवन रचलं होतं.

मेघगर्जना शाहिरांची आसमंतात दुमदुमली

कैक दशकं झिजवूनी कथा, कला अंगी जोपासली

पोवाडे, भारूड, लोककला असे दिमतीला वाघ्यामुरळी

मेघगर्जना शाहिरांची….

जनजागृती प्रबोधनाने उठवीत लोकां

तर्हा ही शाहिरांची निराळी

तर्हा ही शाहिरांची निराळी

मेघगर्जना शाहिरांची…

अशा शब्दांत सोनावणे यांनी दादांना अभिवादन केलं. लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे मानसपुत्र राजन गावंड यांनी उमप कुटुंबीयांच्यावतीने दादांच्या चाहत्यांचे आभार मानले तर युवराज मोहिते यांनी दादांनी केवळकोळीगीतं गायली नाहीत तर ही लोककला आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचवली असं म्हटलं. तसंच लोकशाहीर विठ्ठल उमप लोककलेशी आणि खासकरून कोळीगीतांशी तादात्म्य पावले होते, असंही त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटलं.

कोळीगीतांचा नाखवा या गीतांच्या कार्यक्रमात उदेश उमप याने विठ्ठल उमप यांचं प्रसिद्ध भारूड सादर केलं. यावेळी उदेशनेही दादांसारखीच वेशभूषा केली होती. त्या वेशभूषेत जेव्हा उदेश रंगमंचावर आला तेव्हा क्षणभर सभागृहात शांतता पसरली. जणू दादाच पुन्हा रंगमंचावर आल्याचा तो भास होता. उदेशलाही दादांचं ते भारूड सादर करताना हुंदका आवरला नाही. या कार्यक्रमात उदेश उमप याच्यासोबत प्रविण डोणे, संदिप कांबळे, संदेश उमप, रुपाली पाटील, कविता उमप, वैशाली चौधरी, गीता गोलांबटे या कलाकारांनीही दादांची कोळीगीतं सादर केली. तर अभिनेता विकास समुद्रे आणि अभिनेत्री नम्रता आवटी यांनी विनोदाची जुगलबंदी सादर करत कार्यक्रमात बहार आणली. कार्यक्रमाचं निवेदन वर्षा परांजपे यांनी केलं होतं. अतिशय कौटुंबिक वातावरणात लोकशाहीर विठ्ठल उमप अर्थात कोल्यांचा नाखवा विठ्ठलदादा यांची ही जयंती साजरी करण्यात आली.

 राकेश शिर्के

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *