काही आजारांची उपचारपद्धती काही महिने ते काही वर्षांची असते. उदाहरणार्थ टीबी किंवा क्षयरोगाची औषधं ही कमीत कमी सहा महिने घ्यावी लागतात. तर Multi Drug Resistant म्हणजेच नेहमीच्या उपचारपद्धतीला न जुमानणार्या क्षयरोगाकरता दीड ते दोन वर्षं उपचार घ्यावे लागतात. यात महत्त्वाचा भाग असा की साधरण काही महिन्यांत पेशंटला जवळजवळ पूर्ण बरं वाटलेलं असतं… म्हणजे ताप, खोकला इत्यादी लक्षणं निवळतात, भूक लागायला लागते आणि मग औषध घ्यायचं मात्र विसरायला होतं, मुद्दामहून घ्यायचं नाही म्हणून नव्हे तर आजाराची आठवण राहिली नाही म्हणून! पण यातून क्षयरोगासारख्या चिवट आजाराला कारणीभूत असणारे ‘चिलखत’ परिधान केलेले सुत्पावस्थेतील जंतू अधिक ताकदवान बनतात आणि म्हणूनच आठवणीने औषध घेणं महत्त्वाचं. हे केवळ क्षयरोगाच्या बाबतीतच नव्हे तर उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी अनेक आजारांच्या बाबतीत खरं आहे. विशेषतः काही रुग्णांना जेव्हा रक्तदाब वाढला तरी लक्षणं जाणवत नाहीत, त्यांच्याबाबतीत उच्च रक्तदाबाने निर्माण होणारा पक्षाघात किंवा पॅरालिसीस (लकवा) सारखे आजार दिसून येतात. वास्तविकतः ज्या तर्हेचे उपचार आजमितीस उपलब्ध आहेत, ते लक्षात घेता ही Complications अथवा दुष्परिणाम टाळणं किंवा कमीत कमी त्यांचं प्रमाण कमी करणं निश्चितपणे शक्य आहे.

यातील एक साधा उपाय म्हणजे जशी आपण रोजच्या कामांची किंवा बाजारातून आणण्याच्या वस्तुंची यादी करतो त्यात एक काम म्हणजे वेळेत औषधांचा स्टॉक आणून ठेवण्याचं आणि काहीतरी खूणगाठ बांधून ते वेळेत घेण्याची स्वतःला आठवण करणं आवश्यक! मी ज्या दिवशी कामाची यादी करण्याचं विसरते त्या दिवशी कमी महत्त्वाची कामं करायची रहातात आणि मग तीच दुसर्या दिवशी Semi Urgent गटात जातात. ज्या दिवशी यादी केलेली असते तेव्हा पुढची दोन कामं देखील वेळेत होऊन जातात. काही वेळा एखाद्या गोष्टीची आवड नसल्यामुळे किंवा त्यापासून नकळत होणार्या काही त्रासामुळे म्हणजेच Side effects मुळे औषधं टाळली जातात आणि मग जंतुंना वर्चस्व मिळतं. गेल्याच आठवड्यात जवळजवळ पूर्ण बरी होत आलेल्या एका मुलीचे वडील तिचा आजार पुन्हा बळावला आहे म्हणून सांगत आले. तपासण्यांप्रमाणे आजार औषधांनी १०० टक्के बरा होईल असा होता. सुरुवातीस बरंही वाटलं होतं. मग आता काय नवीन याकरता तपसण्या करण्याआधी तिला औषधं नक्की कशी दिली जातात हे विचारलं असता आईने सांगितलं, ‘मी स्वतः रोज पुडाच्या डब्यातला सर्वात वरच्या कप्प्यात जेवणाच्या डब्याबरोबर औषध पाठवते!’ मात्र दुसर्या दिवशी वडील सांगत आले, ‘डॉक्टर तिच्या Office मधील Drawer मध्ये दोन महिन्यांच्या औषधांची पाकीटं जशीच्या तशी मिळाली. मी तिला खूप रागावलो.’ पण डॉक्टर म्हणून आम्हाला पेशंटना रागवायचं नसतं तर मूळ कारणाशी जाऊन ते औषधोपचार पद्धती कशी पूर्ण करतील त्यावर उपाय शोधायचे असतात आणि Treatment Adhearance म्हणजेच उपचारपद्धती पुरी करून घेणं ही दुहेरी जबाबदारी असते. यातूनच DOT म्हणजे Directly Observed Treatment चा जन्म झाला. तुम्हाला डॉक्टरासमोरच जायला हवं असं नाही. स्वतःकरता आणि स्वास्थ्याकरता गरज असेल तशी औषधं निश्चित घ्या. मग ती आठवड्याच्या डबीत ठेवा की त्यापेक्षा आठवणींच्या साठवणीत आणि Checklist च्या यादीत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *