संसर्गजन्य आजाराने जेव्हा पेशंट डॉक्टरकडे येतात तेव्हा आमची जबाबदारी तिहेरी असते. सर्वप्रथम पेशंटची काळजी घेण्याची, दुसरी पेशंटच्या नातेवाईकांची आणि तिसरी आमच्या इतर कर्मचारीवर्गाची तसंच स्वतःचीदेखील.

सध्या मुंबईमध्ये डॉक्टरांना होणार्या आजारांची चर्चा झाली, त्यात डॉक्टरांचं प्रकृतीमान कायम राखण्याकरता काही विचार केला गेला. यात महत्त्वाचे मुद्दे पुढे आले, ते म्हणजे पेशंट खोकताना आपलं नाक आणि तोंड झाकून घेण्याने हवेत जंतू पसरण्याचं प्रमाण कमी होतं. त्यात पेशंटने देखील मास्क घातला तर आणखी उत्तम. डॉक्टरांनी घातलेला मास्क व्यवस्थित स्नद्बह्ल असलेला हवा तसंच तो नाक आणि तोंड व्यवस्थित झाकलं जाईल असा हवा. प्रत्येक पेशंट पाहून झाल्यावर साबणाने हात धुणं आवश्यक. त्याचप्रमाणे पेशंटने देखील आपला कफ इथे तिथे न टाकता, टाकून देता येणार्या झाकणाच्या डबीत टाकला तर अधिक चांगलं! थुंकण्याच्या सवयीने नुसत्या भिंती-दरवाजे खराब होत नाहीत तर जंतूसंसर्ग व्हायला वाव मिळतो. तंबाखू खाऊन टाकलेली पिचकारी भिंती खराब करते आणि तंबाखूची गोळी गालात धरून ठेवल्याने कॅन्सरला निमंत्रण मिळतं.

‘थुंकू नका’ लिहिलेल्या पाटीच्या खालीच चितारलेले लाल-पिवळे डाग दिसतात, ते केवळ अशिक्षित असल्याने समजत नाही म्हणून नव्हे तर अंगी शिस्त बाणता येत नाही म्हणून. तसंच परिणामी आपण आपल्या मुलाबाळांमध्ये आजार पसरवण्याच्या प्रक्रियेला मदत करत आहोत हेही आपल्या लक्षात येत नाही. हॉस्पिटलमध्ये पेशंटला भेटून आल्यानंतरही नातेवाईकांनी स्वतःची स्वच्छता आवर्जून लक्षात घेतली पाहिजे. तेच डॉक्टरांच्या बाबतीतही खरं आहे.

आजारापासून दूर राहण्याकरता तुमच्या आणि आमच्याकरता न्याहारी अतिशय महत्त्वाची. डॉक्टरांना एकदा काम सुरू झालं की वेळेचं भान नसतं. आणि रिकाम्यापोटी काम कमी चिडचिड जास्त होऊ शकते.

तिसरा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या आजूबाजूला संसर्गजन्य आजाराचा त्रास कुणाला असेल आणि आपल्या स्वतःला एखाद्या आजाराची लक्षणं जाणवली तर वेळेत तपासणी करून घ्यावी. त्या आजाराबद्दल नेमकी माहिती करून घ्यावी. उदाहरणार्थ, क्षयरोग अथवा टीबी हवेतून पसरतो तर कावीळ, टायफॉईड दूषित अन्न आणि पाण्यातून हे लक्षात ठेवावं. लवकर निदान झालं तर complications होण्याआधी दुखण्याला उतार पडायला लागतो.

टीबीच्या पेशंटला औषधोपचार करताना एका पेशंटनी विचारलं, ‘डॉक्टर, तुम्हाला नाही भीती वाटत आजारी पडण्याची?’ आपली प्रतिकारशक्ती हीच आपली कवचकुंडलं आहेत आणि भीती वाटली की ती गळून पडलीच म्हणून समजा. आणि आम्हा डॉक्टर्सना सगळ्यात मोठी शक्ती मिळते ती पेशंटस्कडून… रुग्ण बरा होऊन जेव्हा घरी जातो तेव्हा त्याचं मोल अनमोल असतं. आपले डॉक्टर निरोगी रहावेत तसंच आमचे सर्व रुग्ण बरे व्हावेत ही ‘डॉक्टर्स डे’ निमित्ताने ईश्वरचरणी प्रार्थना!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *