डॉक्टर, हा IPF कधीच बरा न होणारा आजार आहे असं नेटवर लिहिलंय. पाच वर्षांत माणूस जातो म्हणे, खरं आहे का हे? मी पाच वर्षांच्यावर जगूच शकणार नाही का? एका श्वासात समोर बसलेले गृहस्थ प्रश्न विचारते झाले, तेव्हा त्यांना सांगावंसं वाटलं, जरी तुम्हाला Interstitial Lung Disease आणि त्यातूनही Idiopathic Pulmonary Fibrosis असला तरी आता तुमची फुप्फुस क्षमता चांगली असण्याची शक्यता जास्त आहे. परंतु पाच वर्षं, पन्नास वर्षं की पाच महिने किंवा पाच दिवस याला मात्र अनेक घटक कारणीभूत ठरतात आणि मला वाटतं या वर्तवलेल्या शक्यता आपल्या इच्छाशक्ती आणि योग्य उपायामार्फत लांबवल्या जाऊ शकतात. ‘इंटरस्टिशिअल’ म्हणजे वायुकोष आणि त्यासभोवती असणार्या केशवाहिन्यांच्या जाळ्यातील जागा यात निर्माण झालेला श्वसनदाह वायुकोष निकामी करतो आणि फुप्फुसांची प्राणवायू शोषण्याची क्षमता मंदावते. यात कोरडा खोकला येतो आणि त्याबरोबर चालल्यानंतर किंवा चढल्यानंतर धाप लागते. X-Ray आणि High Resolution CT Scan मार्फत याचं निदान होतं आणि ऑक्सिजन आणि फुप्फुसक्षमता पातळी पाहून पुढील उपाय ठरतात. यात १०० हून अधिक कारणं दिसतात. परंतु जवळजवळ पाच टक्के रुग्णांमध्ये कोणतंच कारण सापडत नाही, तेव्हा त्याला Idiopathic म्हणजे ज्याचं कारण सापडलेलं नाही असं म्हणतात. यात ऑक्सिजन पातळी कमी झाली तर प्रामुख्याने ऑक्सिजन आणि इतर Steroid आणि काही इतर औषधं वापरण्यात येतात. पूर्ण बरा झाला नाही तरी योग्य उपचार आणि श्वसनाचे व्यायाम या दोन्हींचा चांगला उपयोग होऊन फुप्फुसक्षमता खालावायची थांबते. आमच्याकडे येणारे काही पेशंट्स स्वतः जाणते असतात. कधी कधी आमच्या बरोबरच तेही आपल्या तपासण्यांचे रिपोर्टस् आवर्जून तपासून पहात असतात. आणि आमचं स्टेथोस्कोपने तपासून होतं न् होतं तोच विचारतात, ‘काय अजून गेलं नाही का?’ सुरुवातीला म्हणजे जवळजवळ १५ वर्षांपूर्वी, मी त्यांना समजावून सांगत असे की, नष्ट झालेले वायुकोष पूर्ववत होत नाहीत म्हणून. परंतु आज आमच्याकडे एका दशकाच्यावर Follow Up करणार्या तपासण्यांचे आलेख बघून लक्षात येतंय की पूर्ण बरं होण्याची इच्छा बाळगलेले काहीजण आपली फुप्फुसक्षमता खालवू न देता कायम राखून आहेत. नष्ट झालेले वायुकोष पूर्ववत झालेले नाहीत. पण श्वसनाचे व्यायाम आणि योग्य ती काळजी घेऊन त्यांनी आपलं प्रकृतीमान राखलं आहे. प्रत्येक रुग्णाने सांगितलेली माहिती आणि त्यांचे बारीकसारीक अनुभव हे आम्हाला खूप काही शिकवून जातात आणि प्रगल्भ करतात. त्यांनी सांगितलेल्या अनुभवाची गुप्तता राखत त्यांनी स्वतःहून आजारावर कशी मात केली हे अनुभव ‘कलमनामा’तर्फे त्यांच्यावतीने आपल्यापर्यंत पोचवता येतात आणि सांगावंसं वाटतं काळजी करू नका पण काळजी जरूर घ्या आणि एक पेशंट कधीच दुसर्यासारखा नसतो. सकृतदर्शनी आजार तोच असला तरी आपली इच्छाशक्ती आणि प्रतिकारशक्ती यावरच आपली जीवनरेखा अवलंबून असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *