महाराष्ट्र राज्य हे भारतात पुरोगामी राज्य म्हणून ओळखलं जातं. सत्ताधारी पक्ष फुले, शाहू, आंबेडकरांच्या जपमाळा ओढत असतो तर विरोधीपक्ष छत्रपती शिवरायांच्या नावाने टिळे लावून फिरत असतो. या महान विभूतींनी ज्या तळमळीने हे राज्य ‘सुराज्य’ करण्यासाठी जातीधर्मअंधश्रद्धा विहिन इथल्या जनतेचं प्रबोधन केलं. ज्या काळात केलं आणि मानवजातीच्या अंतापर्यंत ते पथदर्शी राहील असं पाहिलं. त्यांच्या विचारांचा, त्यांच्याच भूमीत पराभव करण्यासाठी शिवरायांचे पाठीराखे, शिवरायांच्या मागे उभा राहिलेला वारकरी संप्रदाय हिरिरीने पुढाकार घेताना पाहून, इथे ओशाळले महापुरुष असंच म्हणावं लागेल.

भारतीय, विशेषतः इथला बहुसंख्य हिंदू समाज हा विविध जाती जमातीत विभागलेला आहे. प्रत्येक जाती जमातीची स्वतंत्र श्रद्धास्थानं, पूजास्थानं, श्रद्धा पर्यायाने अंधश्रद्धा आहेत. देव आहे की नाही, मानावा की नाही यासाठी इतर प्राणीमात्रात नसलेली पण मनुष्यप्राण्यात असलेली बुद्धी विवेकाने वापरली तर या त्याअर्थाने अनुत्तरीत प्रश्नाचं सुलभ आणि समाजोपयोगी उत्तर मिळू शकतं. पण निसर्गाच्या अचाट शक्तिपुढे, अजून न उलगडलेल्या गूढतेला, अदृश्य शक्तिला घाबरून, हतबल होऊन, कालबाह्य रूढिपरंपरा बाळगणं, प्रसंगी अमानवी कृत्य करणं याने व्यक्तिगत आणि सामाजिक हानी(च) होते. पण एकदा का त्या अदृश्य शक्तिला श्रद्धेच्या जागेवर ठेवलं की केवळ सर्वांगीण शरणता हीच एक कृती कुठल्याही जाती, जमाती, धर्म, पंथ यात आढळते. श्रद्धा, रूढी, परंपरा यांच्या नावाखाली काहीवेळा अघोरी पद्धतीने या पूजा, उपासना केल्या जातात. ‘दैवी’ कारणासाठी त्या इष्ट आणि मोक्ष देणार्या ठरतात, पाप धुवून पुण्य नावावर करणार्या ठरतात, वैभवशाली परंपरेच्या निस्सीम वाहक ठरतात.

१९४७ साली हा देश स्वतंत्र झाला, तेव्हा, हिंदुस्थान नामक भूभागावर असलेल्या अठरापगड जातीजमाती, विविध धर्म, पंथ यांना एकाच ‘भारतीय’ तत्त्वात गुंफण्यासाठी ‘भारतीय राज्यघटना’ तयार करण्यात आली. या घटना समितीचे प्रमुख डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते, ज्यांना याच भूमीने ‘अस्पृश्य’ म्हणून जन्माला घातलं होतं. अशा व्यक्तिने नव्या भारताची राज्यघटना तयार करावी हा नैसर्गिक न्याय होता.

आपलं पूर्ण आयुष्य विषमता, शोषण, अंधश्रद्धा याविरोधात घालवलेल्या डॉ. बाबासाहेबांनी राज्यघटना तयार करतानाच प्रज्ञा, शील, करुणा यांच्या पायावर समता, बंधुत्वाचं रोपण केलं. शूद्र मानल्या गेलेल्या अस्पृश्यांसह स्त्रियांनाही मताधिकार देणारी संसदीय लोकशाहीची मुहूर्तमेढ रोवणारी जगातली अशी पहिली

राज्यघटना लिहिली. प्रत्येक जाती, धर्म, पंथ यांना उपासना स्वातंत्र्य देतानाच नागरिक म्हणून सार्वजनिक जीवनात सर्वांनी सर्वधर्म समभाव जपावा अशी व्यवस्था केली. श्रद्धेबरोबर पर्यायाने विकसित होणार्या अंधश्रद्धांना पायबंद घालण्यासाठी इंडियन पिनल कोडसारखं युनिकोड तयार केलं.

पण इथल्या पुराणमतवाद्यांनी, कट्टरवाद्यांनी, सनातन्यांनी हिंदू कोड बिलासह, समान नागरी कायद्यातील काही कलमं आपल्या जातीधर्माला, पंथाला अनुकूल किंवा त्यापासून मुक्त ठेवली. परिणाम स्वरूप गुन्हेगारी पद्धतीचं कृत्य करूनही जाती, धर्म, पंथ यांच्या ‘कवचाखाली’ कालबाह्य, अघोरी रूढी परंपरा चालू राहिल्या. स्वातंत्र्यानंतर सत्तेवर आलेल्या आणि जवळपास अर्धशतकाहून अधिक काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने या जातीधर्म, पंथ भेदाचा आपल्या राजकीय फायद्यासाठी सोयीने वापर केला.

गणपती, सत्यनारायण, गोविंदा अशा हिंदू सणांना जशी उपस्थिती लावायची तशीच टोप्या बदलून रमझानच्या इफ्तार पार्ट्यांनाही हजेरी लावायची. नाताळच्या निमित्ताने थर्टी फर्स्ट डिसेंबर दणक्यात साजरा करायचा अशी मनमोहन देसाईंच्या चित्रपटासारखी सर्वधर्मसमभावाची सोपी व्याख्या करून ती तशीच प्रत्यक्षात आणायची ही काँग्रेस नीती राहिली.

४७ नंतर ९० च्या दशकापर्यंत हे दुकान नीट चाललं. पण ९०च्या दशकात संघ परिवार आणि कडव्या हिंदुत्ववादी संघटना यांच्या खांद्यावर बसून राम मंदिराचा मुद्दा घेऊन भाजपने या देशात जी हिंदुत्वाची लाट आणली, तिने या काँग्रेसप्रणित सर्वधर्मसमभावाच्या चिंधड्या उडवल्या.

या आक्रमक हिंदुत्वाचा फटका, विवेकनिष्ठ बुद्धीप्रामाण्यवादाने संघटित कम्युनिस्ट, समाजवादी राजकीय पक्षांसह, इथल्या दलित, श्रमिक, स्त्री यांच्या परिवर्तनवादी संघटना, विचारांनाही बसला. नंतर झालेल्या माध्यम क्रांतिने आणि खुल्या अर्थव्यवस्थेने तयार झालेल्या नवश्रीमंत वर्गाने या हिंदुत्वाच्या लाटेला उघड आणि छुपा पाठिंबा दिला.

त्याचा परिणाम असा झाला, दीडशे वर्षांहून अधिक मोठी संत, समाजसुधारकांची परंपरा असलेल्या महाराष्ट्रात भागवत धर्माची, भेदाभेद अमंगळ मानणारी भगवी पताका, भगवा ध्वज, वस्त्र, उपरणी, गमछे घेऊन आक्रमक हिंदुत्ववादी विचारांची प्रतिकं बनली आणि इथल्या ‘अ हिंदू’ना लक्ष्य करू लागली. ज्यात प्रामुख्याने मुस्लीम समाज अग्रक्रमावर होता. संतांपासून शिवाजी महाराजांपर्यंत सर्वांना मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, बौद्ध यांच्याविरोधात उभं करण्यात आलं. त्यात स्वयंघोषित शिवशाहिरापासून, हिंदुहृदयसम्राटापर्यंत सगळेच उन्मादाने सहभागी झाले.

कालचक्र उलटं फिरवल्यासारखं मग विस्मृतीत गेलेल्या हिंदू रूढी, परंपरा, सण यांना इव्हेंटचं रूप दिलं गेलं. दसरा, दिवाळी, गोकुळाष्टमी, गणेशचतुर्थी, वटपोर्णिमा, नारळी पोर्णिमा, श्रावण, पितृपंधरवडा, गुढीपाडवा, होळी, रंगपंचमी सर्वच सण, रूढी परंपरांना ‘भगवा’ दृष्टिकोन देण्यात आला. संस्कृतीच्या नावाखाली रांगोळ्या, नऊवारी साड्या, घोडेस्वारी, फेटे, तुतार्या नि ढोल यांना अस्मितेचे रंग फासले गेले. यातूनच मग ‘महाआरत्या,’ ‘महादहीहंडी,’ ‘महागणपती’ असं सुरू झालं. आधीची अनेक वर्षं इतरांप्रमाणेच एक असलेला लालबागचा गणपती एका वर्षी चढाओढीच्या ईर्षेने एकवीस फुटाचा झाला तो आता नवसाला पावणारा म्हणून लालबागचा राजा झाला आणि सिद्धीविनायक, शिर्डीच्या रांगेत जाऊन बसला!

एका बाजूला संगणक, मोबाईल तर दुसर्या बाजूला बा, बापू, अध्यात्म, सत्संग, प्रवचन असा विषम प्रवास सुरू झाला. या प्रदर्शनीय हिंदुत्वामुळे जादूटोणा, मंत्र, तंत्र, बळी, होम हवन, व्रत, नवस यासारख्या अवैज्ञानिक, अघोरी आणि गुन्हेगारी कृत्यांनाही एक धार्मिक कवच लाभलं आणि अशा प्रथा विरोधात मानवी दृष्टिकोनातून, प्रागतिक विचाराने या प्रथा, रूढी रोखणारे पर्यायाने अंधश्रद्धा रोखून जीवित, वित्तहानी टाळणारं कायदे करणारं विधेयक विधानसभेत जवळपास वीस वर्षं पडून आहे.

विधानसभा भारतीय राज्यघटनेला अधीन राहून भरते, याचे सदस्य बनणारे लोकप्रतिनिधी घटनेतील तत्त्वांना बांधील असतात. तशी शपथ घेऊनच त्यांच्या प्रतिनिधित्वावर शिक्कामोर्तब होतं. विधान भवनाच्या आवारात कुणा देवदेवतांचे नव्हे तर शाहू, फुले, आंबेडकर, शिवराय यांचे पुतळे आहेत. ते केवळ पुतळे नाहीत तर प्रेरणा आहेत. अशोक स्तंभावरील चार सिंह हे विधानसभेच्या शिर्षावर मुकुटमण्यासारखे आहेत. अशा या विधानसभेत समग्र मानवी जीवनाला उपयोगी ठरणारा, महाराष्ट्राच्या परिवर्तनशील परंपरेला पुढे नेणारा कायदा बनावा म्हणून एक विधेयक पडून आहे.

त्याला धार्मिक भावना दुखावण्याची कारणं देऊन शिवसेना विरोध करतंय. तसाच बाहेरून वारकरी विरोध करताहेत. संतांच्या परिवर्तनवादी परंपरेला छेद देऊन, समतेची भगवी पताका, प्रखर हिंदुत्वाचं निशाण बनवण्याचा बंड्या तात्या कराडकरांसारख्या संघवादी वारकर्याने केलेला प्रयत्न बुचकाळ्यात टाकणारा आहे. पारमार्थिक विचार करणारा वारकरी संप्रदाय हल्ली उद्योगधंदे, साहित्य, शासकीय विधेयकं यांना ‘ताकदीच्या’ आणि ‘भगव्या धाकाखाली’ विरोध करू लागलाय.

मंत्रिमंडळाने मंजूर करून, एका सभागृहातून, दुसर्या सभागृहात टोलवाटोलवी करून सगळेच लोकप्रतिनिधी, मंत्रिमंडळ हे मंदिरातल्या बडव्याप्रमाणे आपली अनभिषिक्त ताकद हे विधेयक रोखण्यासाठी वापरत आहेत. आता तर परदेशी पैशाचा, मदतीचा उल्लेख करून चौकशीच्या फेर्यात अडकवून हे विधेयक तुकारामांच्या गाथेसारखं पाण्यात बुडवायचा उद्योग सुरू झालाय.

कोवळ्या मुलींची गुप्तांगं, त्यातलं रक्त आपलं ईप्सित साध्य करण्यासाठी वापरणारे तथाकथित गुरू, त्यांना शरण जाऊन तशी कृत्य करणारे या अभागी बालिकांचे आप्तस्वकीय, कधी कधी जन्मदाते, डाकीण म्हणून स्त्रिला नग्न करणारे विकृत नराधम, पैशाचा पाऊस पाडतो म्हणून लुबाडणारे तर नग्नपूजेच्या नावाखाली स्त्रियांचा सर्रास वापर करणारे लिंगपिसाट यांना धर्माभिमानाचा बुक्का लावून मोकाट सोडणारे शिवरायाचे पाईक? ‘मातोश्रीला’ मानणारे आणि ‘जिजाईला’ पूजणारे या रक्तलांघित वर्तमानाचे टिळे लावून फिरणार आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *