‘नटरंगी नार’ चा पहिला प्रयोग खूपच जोरदार झाला. त्या प्रयोगामुळे आम्हाला चांगले प्रयोग मिळणार याची मला खात्री झाली होती आणि झालंही तसंच. महाराष्ट्रभर ‘नटरंगी नार’ला चांगलीच मागणी मिळू लागली. ‘नटरंगी नार’चा प्रयोग आपल्या गावात व्हावा असं सगळ्यांनाच वाटत होतं. कोल्हापूर, सोलापूर, सांगली, नाशिक अशा सार्या महाराष्ट्रभरातून कार्यक्रम करण्यासाठी बोलावणं येत होतं. म्हणून मग आम्हीही या प्रत्येक ठिकाणी जाऊन ‘नटरंगी नार’चे प्रयोग करायचं असं ठरवलं. त्याप्रमाणे आम्ही आमचा दौरा आखला.

विविध ठिकाणी प्रयोग झाल्यावर आम्ही कोल्हापूर गाठलं आणि कोल्हापुरचा ‘नटरंगी नार’चा पहिलाच कार्यक्रम माझ्यासाठी खूप खास ठरला. या पहिल्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत, सूर्यकांत आणि राजशेखर आले होते. त्यांच्याकाळात ते तिघंही मराठी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार होते. आजवर ज्या कलाकारांना आपण पडद्यावर पाहिलं होतं, ज्यांच्या अभिनयावर लोक जीव ओवाळून टाकत होते असे दिग्गज, महान कलावंत खास आपला कार्यक्रम बघायला येणार आहेत हे कळल्यावर मला खूपच आनंद झाला होता. लावणी महोत्सव जिंकल्यामुळे माझं नाव या कलाकारांच्याही कानावर पडलं होतं. त्यांनी माझ्या नृत्याची, अदाकारीची तारीफ ऐकली होती आणि त्यामुळेच ते खास माझा हाही कार्यक्रम पहायला आले होते. कोल्हापुरच्या कार्यक्रमाला पहिल्याच ओळीत हे तिघं बसले होते. माझ्या प्रत्येक कार्यक्रमात मी सादर करत असलेल्या लावणींना वन्स मोअर मिळतच असे. पण आजच्या कार्यक्रमात मिळालेला वन्स मोअर खूपच खास होता. कारण ‘पिकल्या पानाचा…’ या बैठकीच्या लावणीला या तीन दिग्गज कलावंतांनी वन्स मोअर दिला होता. त्यांच्या वन्स मोअरमुळे मी अधिकच रंगात आले. माझा उत्साह वाढला आणि त्याच उत्साहाने मी ती लावणी पुन्हा सादर केली. त्यांना हा कार्यक्रम खूप आवडला होता. कार्यक्रम संपल्यावर हे तिन्ही महान कलावंत मला भेटायला आले. त्यांनी माझं भरभरून कौतुक केलं. ‘नटरंगी नार’ हा लावण्यांचा एक उत्तम कार्यक्रम आहे, अशी पावतीही त्यांनी मला दिली. मी जशी त्यांची फॅन होते त्याप्रमाणे आता ते माझ्या नृत्याचे फॅन झाले होते.

चंद्रकांत, सूर्यकांत आणि राजशेखर हे माझ्या कार्यक्रमाला आले म्हणून कोल्हापुरचा तो प्रयोग माझ्या कायम आठवणीत राहिला आहे. पण त्याचसोबत तो प्रयोग आठवणीत राहण्याचं आणखी एक कारण आहे. मी या क्षेत्रात नवीन असल्यामुळे या क्षेत्रातील इतरांकडून जे जे नवीन शिकता येईल ते शिकायचं असं मी ठरवूनच इतरांकडून अनेक गोष्टीबाबतचा सल्ला घेत असे. माझ्या या शिकण्याच्या वृत्तीमुळे मला कायमच प्रत्येकाकडून नवनवीन काहीतरी शिकायला मिळत होतं. कोल्हापुरातील या प्रयोगालाही मी एक खूप महत्त्वाची गोष्ट शिकले. ती गोष्ट मला केवळ त्या कार्यक्रमापुरतीच उपयोगी ठरली नाही तर आजही मला त्या गोष्टीचा उपयोग होतोय. अगदी पावलोपावली मला ती गोष्ट आठवते. आजवरच्या ‘नटरंगी नार’च्या सार्या प्रयोगाला मला कोणीही वन्स मोअर दिला तर मी ती सगळी लावणी पुन्हा सादर करत असे. पण या प्रयोगानंतर मला जान्व्हळकर यांनी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. जान्व्हळकर हे त्यावेळी ‘नटरंगी नार’ला सेट भाड्याने देत असत. त्यांनी मला सांगितलं की कधीही कोणत्याही लावणीला वन्स मोअर मिळाला की ती लावणी पुन्हा सादर करताना संपूर्ण सादर करायची नसते. केवळ एक कडवंच पुन्हा सादर करायचं. कारण प्रत्येक लावणी पुन्हा सादर केली तर तीन तासांचा कार्यक्रम सहा तास करावा लागेल. खरं तर ही खूपच छोटीशी गोष्ट आहे. पण मी लावणीचा कार्यक्रम पूर्वी कधीही सादर न केल्यामुळे मला ती गोष्ट माहीत नव्हती. नाट्यगृहात कार्यक्रम ठरावीक वेळात सादर करावा लागतो. त्यामुळे त्यांनी मला सांगितलेल्या गोष्टीचा माझ्या आतापर्यंतच्या सगळ्याच कार्यक्रमांसाठी मला खूप उपयोग झाला.

कोल्हापुरच्या त्या प्रयोगाला चंद्रकांत, सुर्यकांत आणि राजशेखर आल्यामुळे मी एकीकडे खूप खूश झाले होते. पण ‘नटरंगी नार’च्या या प्रयोगाला खूपच कमी बुकिंग मिळाल्यामुळे मला मात्र चांगलंच टेन्शनही आलं होतं. या कार्यक्रमाला ३-४ हजार रुपयांचंच बुकिंग झालं होतं. खरं तर ‘नटरंगी नार’सारख्या भल्यामोठ्या कार्यक्रमासाठी हे खूपच कमी बुकिंग होतं. त्यामुळे इतकं कमी बुकिंग मिळाल्यामुळे मी खूपच नाराज झाले होते. पण दुसर्या प्रयोगांना चांगला प्रतिसाद मिळेल, ही तर सुरुवात आहे असा विचार करून मीच माझ्या मनाची समजूत घालत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *