बुद्धगयेमध्ये झालेले बॉम्बस्फोट हे कुण्या परकीय मुजाहिद्दीननेच केले असतील हे सर्वस्वी खरं आहे काय? तसंच सरकारला आणि गुप्तहेर संघटनांना ही बातमी जर आधीच लागली होती तर मग हे आंतरराष्ट्रीय बौद्धविहार वाचवण्यासाठी जीव तोडून का प्रयत्न केले नाहीत? म्हणजेच आरोप कुणावर टाकायचा हेही आधीच ठरलं होतं. आणि मग अचानक एखादा आरोपी सापडला आणि तो हिंदू असला की मग तपासाची चक्रं याच भूमीत रूतून ठेवायची असं षडयंत्र आहे काय?

 

या देशामध्ये बौद्ध धम्माबद्दलची अशांतता वा असहिष्णुता ही बौद्ध धम्माच्या जन्मापासून इथे नांदताना दिसेल. याचं ताजं आणि अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे बुद्धगयेमध्ये झालेली लागोपाठच्या नऊ बॉम्बस्फोटांची लागण. या गंभीर प्रकाराकडे वळण्यापूर्वी भारतामध्ये बौद्ध धम्माबद्दल जी असहिष्णुतता नांदते आहे त्याचं स्वातंत्र्यापूर्वीचं उदाहरण म्हणजे बुद्धगया या महाविहाराच्या संदर्भात १९४९ साली पारित झालेला कायदा. हा कायदा बुद्धविहाराबद्दलचा आहे की हिंदू मंदिराबद्दलचा आहे हे कळायला वाव नाही. त्याच्यामध्ये चार सदस्य बौद्ध असावेत आणि पाच सदस्य हिंदू असावेत अशी बौद्ध धम्माच्या अधिकारावर कुरघोडी केलेली आहे. आणि या नऊ सदस्यांच्या मंडळावर जिल्हा मॅजेस्ट्रीटची तरतूद केली आहे. हा कलेक्टर ओघानेच हिंदू असणार होता. म्हणजेच कधी जरी या देशामध्ये बौद्धांची संख्या वाढली तरी न्याय मात्र हिंदुंच्याच बाजूने होईल अशी तरतूद त्यात होती. त्यामुळे बौद्धांचं मंदिर असूनही आजही ते हिंदुंच्याच ताब्यात आहे, ही वस्तुस्थिती आहे. स्वातंत्र्यानंतर ६५ वर्षं उलटून गेल्यानंतर सुद्धा आज हीच परिस्थिती कायम आहे आणि बुद्धगयेचं महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या म्हणून गेली एक-दोन दशकं चाललेली बौद्धांची आंदोलनं इथल्या केंद्र सरकारकडून दुर्लक्षित करण्यात आलेली आहेत.

ही नकारात्मक बाजू लक्षात न घेता महाबोधी महाविहाराचा आणि त्याच्यावर चाललेल्या आक्रमणाचा किंवा त्याच्या संदर्भात घडणार्या हिंसाचाराचा विचारच करता येणार नाही. बौद्ध धम्माला इथे सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे हे वरील उदाहरणावरून लक्षात येईलच. याशिवाय ज्या काळात जगाची पावलं आपल्याकडे वळवून आणणारं हे महाबौद्धविहार भारतात अनुयायांवाचून पोरकं झालं होतं. त्या काळात, १९ व्या शतकात हिंदुंनी आपला कब्जा त्यावर केला आणि तिथे आपल्या एका हिंदू वंशजाला त्यांनी बौद्ध भिक्षू बनवून टाकलं. त्यामुळे हा काशाय वस्त्रातला भिक्षू म्हणजे एक हिंदू बाबा आहे हे इथे येणार्या परकियांना कळलंच नाही. आणि या अर्थाने बौद्ध धम्माला पोकळ बनवण्यात आणि मगरमिठीत ठेवण्यात यश आलं. या पार्श्वभूमीवर, प्रश्ना असा पडतो की, खरोखरच अलीकडे झालेले बॉम्बस्फोट हे कुण्या परकीय मुजाहिद्दीननेच केले असतील हे सर्वस्वी खरं आहे काय? तसंच सरकारला आणि गुप्तहेर संघटनांना ही बातमी जर आधीच लागली होती तर मग हे आंतरराष्ट्रीय बौद्धविहार वाचवण्यासाठी जीव तोडून का प्रयत्न केले नाहीत? म्हणजेच आरोप कुणावर टाकायचा हेही आधीच ठरलं होतं. आणि मग अचानक एखादा आरोपी सापडला आणि तो हिंदू असला की मग तपासाची चक्रं याच भूमीत रूतून ठेवायची असं षडयंत्र आहे काय? यादृष्टीने विचार करायला हवा.

असं म्हणायचं कारण म्हणजे, दहशतवादाच्या कारखान्यात आता हिंदू मंडळीही जोमाने कामाला लागलेली आहेत. याचं उदाहरण म्हणजे मालेगावची दंगल. ही तपासाची चक्रं जेव्हा हिंदुंच्या दिशेने फिरू लागली तेव्हा त्यातले पकडलेले मुस्लीम आरोपी निष्पाप असूनही आणि त्यांच्यावरील संशयाची सूई त्यांच्यापासून दूर गेलेली असूनही त्यांना बाहेर सोडलेलं नाहीये. आज देशात बॉम्ब बनवण्याचे कुटीर उद्योग जागोजागी चालू आहेत. याबद्दल सरकारने प्रतिबंधात्मक इलाज कोणता केलाय? लोकांवर जरब बसेल अशी कारवाई केलीय का? नसेल केली तर ’चुकला फकीर मशिदीत‘ या न्यायाने मुजाहिद्दीनचं नाव घेण्यात काय स्वारस्य आहे? त्या काबूल कंदहारच्या परिसरात दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी बौद्ध धम्म सुखाने नांदत होता. म्हणूनच बामियानमध्ये बुद्धाची प्रचंड मोठी मूर्ती कालपर्यंत उभी होती. काही माथेफिरू बुत-शिकनांनी ती मूर्ती तोडण्याचा प्रयत्न केला ही गोष्ट जगजाहीर आहे. तिचा आधार घेऊन भारताच्या इतक्या आत येऊन केलेलं कृत्य हे मुजाहिद्दीनचं काम आहे असं म्हणणं म्हणजे या देशातील सर्व प्रकारची मिलिट्री यंत्रणा ही विफल झालेली आहे असं म्हणावं लागेल.

त्यामुळे मिलिट्रीमधलेही काही अधिकारी, सीबीआयमधलेही काही अधिकारी या सगळ्या भानगडीत सामील असल्याचं उघड झालंय, असं म्हणायचं काय? पुण्यातील कॅप्टन पुरोहित आता तळोजा जेलमध्ये बंद आहे आणि प्रज्ञा सिंगसारख्या तरुणीला मदत करणारेही हेच लोक होते. माझं सरकारला एवढंच म्हणणं आहे की, बुद्धाच्या या भूमीत जन्म घेऊन तुम्ही खरं म्हणणारे असाल, त्याच्या विचारांना जागणारे असाल तर तपास या दिशेने गेला पाहिजे. कारण ‘तपास अजून अंधारातच’ अशा बातम्या टीव्हीवर दाखवल्या जाताहेत. तसंच तपासाला खिळ घालणारे कोण आहेत, याचाही शोध घेतला पाहिजे.

या अशांततेला बुद्ध जबाबदार नाही तर इथली कर्मठ हिंदुत्ववादी जनता कारणीभूत आहे, असं माझं मत आहे. आमच्या देशाचे पहिले उपराष्ट्रपती या देशात बुद्धाची २५०० वी जयंती साजरी करताना म्हणाले होते की, ‘बौद्ध धर्म हा हिंदू धर्माची फांदी आहे.’ एवढं बौद्ध धम्माबद्दलचं प्रचंड अज्ञान असलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्वान असतील तर इथे अज्ञानाला काय तोटा? म्हणून बौद्ध धम्माबद्दलची साक्षरता इथे त्वरित निर्माण झाली पाहिजे. लेण्यांची जपणूक झाली पाहिजे. तसंच प्राचीन परंपरा असलेला आणि जगाला आदर्श असलेला बुद्ध यांची अवहेलना न होता त्यांची उचित जपणूक झाली पाहिजे कारण आजाराची मुळं इथे आहेत. परदेशात नाही.

– राजा ढाले

 

तपास अजून अंधारातच

ज्या महामानवाने जगाला शांतीचा संदेश दिला, अहिंसेचा मार्ग दाखवला त्याच गौतम बुद्धांच्या महाबुद्धविहारात बॉम्बस्फोटासारखी सर्वात हिंसक घटना घडवली गेली. आतंरराष्ट्रीय पातळीवर प्रख्यात असलेल्या बुद्धगया इथल्या महाबुद्धविहारात नऊ बॉम्बस्फोट घडवण्यात आले. या साखळी बॉम्बस्फोटाचे पडसाद जगभर पसरले असतानाही इथली तपास यंत्रणा कासवाच्या गतीने काम करत आहे. अजूनही या साखळी बॉम्बस्फोटांचा तपास अंधारातच आहे. राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) या स्फोटांचा तपास करतेय खरी मात्र त्यांच्याही हाती अद्याप ठोस असे कोणतेच धागेदोरे लागले नाहीत. आतापर्यंतच्या तपासात काही गोष्टींचा उलगडा होतोय. घटनास्थळी मिळालेल्या काही वस्तुंचाही तपासात फायदा होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

बुद्धगयाच्या महाविहारातील बॉम्बस्फोटाची जबाबदारी इंडियन मुजाहिद्दीन या अतिरेकी संघटनेने घेतली आहे. ‘हमने ही नौ धमाके किए है. अब हमारा अगला निशाना मुंबई है. रोक सके तो रोक लो. सिर्फ सात दिन बाकी है.’ अशी धमकीही या संघटनेने ट्विटरवरून दिलीय. बॉम्बस्फोटानंतर अवघ्या १२ तासांनीच हे ट्विट करण्यात आलं होतं. ट्विटरवरील याच अकाऊंटवर स्फोटांच्या आदल्या दिवशीही एक धमकी देणारं ट्विट करण्यात आलं होतं. या हल्ल्यामागे इंडियन मुजाहिदीनचा हात असावा, असा संशय आधीपासूनच पोलिसांना होता. कारण पुण्यातील जर्मन बेकरी स्फोटातील प्रमुख आरोपी सय्यद मकबूलची जबानी तसंच मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याने हल्ल्याच्या आधी काही दिवस केलेलं ट्विट हाच या संशयला बळकटी देणारा सर्वात महत्त्वाचा धागा आहे, असं एनआयएच्या अधिकार्यांचं म्हणणं आहे.

एनआयएला बॉम्बस्फोट ज्या ठिकाणी झालेत त्या ठिकाणी एक कागदचा तुकडा सापडलाय. यावर तीन मोबाईल नंबर लिहिलेले आहेत. हे तीन मोबाईल नंबरसुद्धा तपासासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. या तीनपैकी दोन नंबर सध्यातरी बंद असून एक नंबर स्फोट घडेपर्यंत सुरू असल्याचं उघड झालंय. कारण स्फोट होण्याआधी या नंबरवरून एकामागून एक असे तब्बल नऊ मेसेज करण्यात आले होते. तर शेवटचा मेसेज हा पहाटे चार वाजता पाठवण्यात आला होता आणि महाबुद्धविहारात पहाटे ५ वाजून २५ मिनिटांनी स्फोट झाला होता. यामुळे हे मेसेज आणि हा मोबाईल नंबर तपासाला गती देण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. तसंच या शिवाय आणखीही काही कागद एनआयएला सापडले आहेत. ज्यांच्यावर उर्दू भाषेत मजकूर लिहिण्यात आला आहे. बुद्धाच्या मोठ्या मूर्तीजवळ मिळालेल्या कागदावर ‘बडा बुत’ असं लिहिण्यात आलंय. उर्दू भाषेत मूर्तीला बुत असं म्हटलं जातं. यामुळे हा देखील एक क्ल्यूच ठरू शकतो. तर महाबुद्धविहारजवळ आणखी एक कागदाचा तुकडा सापडला आहे. या तुकड्यावर ‘इराक वॉर’ असं लिहिण्यात आलंय. हे इराक वॉर म्हणजे काय त्याचाही आता अर्थ लावला जातोय. या प्रकरणी स्थानिक पोलिसांसह एनआयए तपास करतेय. या दोन्ही तपास यंत्रणांनी आतापर्यंत अनेक संशयितांना ताब्यात घेतलं होतं. पाटणा इथूनही चार जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. मात्र त्यांच्या चौकशीत कोणतेच धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागू शकले नाहीत. त्यामुळे ताब्यात घेण्यात आलेल्या चारही जणांना सोडून देण्यात आलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *