अंधेरी हा भाग बहुभाषिक वस्तीचा आहे. इथे मराठी भाषिक रहात असले तरी मराठी संस्कृती या विभागात म्हणावी तशी रुजलेली नाही. त्या दृष्टीने प्रयत्नशील असलेल्या काही समविचारी लोकांनी एकत्र येऊन मराठी संस्कृतीचा सिलसिला सुरू केला. २००१ साली अंधेरीत पहिलीवहिली ‘दिवाळी पहाट’ साजरी झाली. त्यासाठी जमलेल्या रसिकांनी नंतर एकत्र येऊन ‘आम्ही अंधेरीकर’ या नावाने विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम करायला सुरुवात केली.

गेल्या आठ-दहा वर्षांत ‘आम्ही अंधेरीकर’च्या रंगमंचावर हृदयनाथ मंगेशकर, दि. श्रीनिवास खळे, रमेश देव, सीमा देव, मंगेश पाडगावकर, अशोक सराफ, अशोक पत्की, पं. उपेंद्र भट, बेला शेंडे, भाऊ मराठे, अविनाश-ऐश्वर्या नारकर, डॉ. सलील कुलकर्णी अशा अनेक कलावंतांनी आपली कला सादर केली आहे.

‘आम्ही अंधेरीकर’ या संस्थेच्या उपक्रमांतर्गतच अंधेरीचेच नागरिक असलेल्या ज्येष्ठ संगीतकार स्व. अनिल मोहिले यांच्या ७२ व्या जयंतीचं औचित्य साधून अंधेरीच्या एस. पी. जैन सभागृहात एक अनोखी आदरांजली वाहण्यात आली. संस्थेशी अनिल मोहिले यांचे घनिष्ठ स्नेहसंबंध होते. जलतरंग आणि व्हायोलिन या दोन वाद्यांनी अनिल मोहिले यांनी आपलं सांगितिक आयुष्य सुरू केलं आणि त्या वाद्यांवरच सर्व प्रकारची हिंदी-मराठी गाणी वाजवून त्यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमात सुभाष नांदोस्कर आणि नंदकिशोर तळगावकर यांनी अनुक्रमे जलतरंग आणि व्हायोलिनवर गाणी सादर करून रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांना इतर वाद्यांवर प्रदीप चिपकर, तुकाराम पवार, कपिल, संकेत ओक यांनी सुरेल साथ दिली.

या कार्यक्रमात अनिल मोहिले यांच्या पश्चात त्यांच्या मित्रपरिवाराने स्थापन केलेल्या ‘संगीतकार अनिल मोहिले मेमोरियल फाऊंडेशन’च्या वतीने दोन पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दरवर्षी एका नवोदित गायक कलावंताला दिला जाणारा ‘अनिल मोहिले विशेष पुरस्कार’ यावर्षी सोनाली बोरकर या गायिकेला सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांच्या हस्ते दिला गेला. तर निवेदन क्षेत्राबरोबरच साहित्य, वृत्तपत्रलेखन, आयुर्वेद, निवेदन प्रशिक्षण, खाद्यसंस्कृती, एकपात्री कार्यक्रम अशा अनेक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलेल्या सुसंवादिनी मंगला खाडिलकर यांना ‘अनिल मोहिले चतुरस्र कलायोगिनी पुरस्कार’ फाऊंडेशनच्या विश्वस्तांच्या हस्ते देऊन गौरवण्यात आलं.

या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मंगला खाडिलकर आणि किशोर सोमण यांनी केलं. या कार्यक्रमाला अनिल मोहिले यांचे पुत्र संगीतकार अमर मोहिले आणि त्यांचे कुटुंबीय आवर्जून उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *