एखादी वस्तू किंवा महत्त्वाची कागदपत्रं एका ठिकाणाहून दुसरीकडे सुरक्षितरित्या आणि जलदगतीने पाठवायची असतील तर टपाल खात्यानंतर कुरिअर सर्व्हिस या कायदेशीर पर्यायाचा उपयोग मोठ्या प्रमाणावर करण्यात येतो. पण कुरिअरसारखीच एक सेवा आहे जी मौल्यवान गोष्टी तसंच रोख रक्कम पाठवण्यासाठी वापरली जाते ती म्हणजे अंगाडियांची सेवा. या अंगाडियांना कायद्याचा तसा कुठलाही आधार नाही. मात्र तिचा सर्रास वापर आज होत असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत असल्याचं समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि मुंबई पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत अंगाडियांचे कोट्यवधी रुपयांची रोकड आणि हिर्यांनी भरलेले ट्रक्स मुंबई सेंट्रल स्टेशन परिसरात सापडले. रोख रक्कम, हिरे, दागिने यांची १३७ पार्सल्स चार ट्रकमध्ये भरली होती. ही पार्सल्स मुंबईहून अहमदाबादला पाठवण्यात येत होती.

पोलिसांनी या प्रकरणात ४० जणांना अटक केली. सुरुवातीला यामध्ये साधारणपणे २५०० कोटी रुपयांची रोकड असण्याची शक्यता वर्तवण्यात आली, तर त्यानंतर ती रक्कम २०० कोटी आणि नंतर १०० कोटी असल्याचं सांगण्यात आलं. मात्र १० दिवसांनंतर या पार्सल्समध्ये सापडलेल्या रकमेची आणि वस्तुंची नेमकी किंमत कोणालाही समजलेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ५० जण या रकमेची तसंच हिरे आणि दागिन्यांची मोजदाद करत आहेत परंतु अजूनही नेमकी किंमत पोलीस किंवा एनआयएकडून सांगण्यात आलेली नाही. मात्र यामध्ये बनावट नोटा सापडल्या नसल्याचं सूत्रांनी सांगितलं. याचाच अर्थ रोकड आणि दागिन्यांची मोजदाद झाल्याचं कळत आहे.

त्यानंतर पोलिसांनी काही पार्सल्सच्या मालकांची ओळख पटवून त्यांना त्यांचा माल परत केल्याच कळतं. मात्र यामध्ये त्यांनी किती रक्कम अंगाडियाच्या ग्राहकांना परत केली आणि ओळख पटवण्यासाठी कोणती कागदपत्रं तपासली याची माहिती मिळालेली नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अंगाडिया कंपनीने काही प्रथमच व्यवहार केलेला नाहीये. एका अंगाडिया कंपनीने तसंच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ वर्षांपासून असे व्यवहार सुरू असून मोठ्या प्रमाणात असलेली रोकड आणि मौल्यवान गोष्टी सुरक्षितरित्या पोचवण्यासाठी स्थानिक पोलीस स्टेशनमधील एक पोलीस या अंगाडियांबरोबर जात असे. दरोडा आणि चोर्या रोखण्यासाठी अशी व्यवस्था करण्यात येत असे. यावरून हे सिद्ध होतं की मोठी रक्कम आणि मौल्यवान गोष्टींचा अशाप्रकारचा व्यवहार अनेक  वर्षांपासून सुरू आहे. तसंच एका अंगाडियाने माहिती देताना सांगितलं की, अशाप्रकारे प्रवास करताना खूनही करण्यात आले आहेत. पाच वर्षांपूर्वी चोरीच्या उद्देशाने एका अंगाडियावर हल्ला करण्यात आला होता. त्यावेळेस व्यापार्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आणि गुजरातला मोठ्या प्रमाणावर अशा मौल्यवान गोष्टी पाठवण्यासाठी इतर पर्यायांचाही वापर करण्यात येऊ लागला. सूत्रांच्या मते पोलिसांनी दिलेल्या संरक्षणासाठी त्यांना चांगले पैसे देण्यात येतात.

अंगाडिया अर्थात कुरियरच्या या धंद्यात एक ठरावीक गट गुंतलेला आहे. मुंबईत साधारणपणे २०० अंगाडिया आहेत. याप्रमाणेच अहमदाबाद, सुरत अशा व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या शहरांमध्ये तसंच इतर राज्यांतही अंगाडिया समाज अस्तित्वात आहे. मुंबईमध्ये भुलेश्वर, ऑपेरा हाऊस, झवेरी बाजार, मालाड या परिसरात अंगाडियांचं जाळं पसरलेलं आहे. तर काही अंगाडिया मुंबई सेंट्रल स्टेशनमधून कार्यरत असून सुरक्षारक्षकाबरोबर वाहनातून वस्तुंची ने-आण करतात. काही अंगाडिया गुजरातला जाण्यासाठी बसेसचा वापर करतात पण यामध्ये मोठ्या प्रमाणावर धोका असतो. काही वेळेला कारमधूनही मोठ्या प्रमाणावर रोकड नेण्यात येते. रोख रक्कम घेऊन जाणारे अंगाडिया भारतातल्या चेन्नई, दिल्ली, चंदिगढ, भुवनेश्वर, कोलकाता, बँगलोर, गोवा आणि इतर अनेक ठिकाणी कार्यरत आहेत ही वस्तुस्थिती आहे. हिरे आणि दागिनांचा व्यापार हे प्रतिष्ठित व्यवसाय आहेत. जर का त्यांना त्यांच्या पैशाचा योग्य आणि खरा व्यवहार दाखवायचा असेल तर ते अंगाडियांची सेवा वापरणार नाहीत. कारण आज एखाद्या ठिकाणाहून दुसरीकडे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी नेट बँकिंग, आयटीजीएस किंवा एनएफटी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. परंतु यामधील एकही व्यापारी या कायदेशीर आणि सुरक्षित पर्यायांचा पैसे पाठवण्यासाठी उपयोग का करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अंगाडियांनी अशाप्रकारे एखाद्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसे घेणं हे कायद्याच्या दृष्टीने ठरतं का?

आयकर विभाग या व्यापार्यांचे वार्षिक व्यवहार तपासताना हे प्रश्न का विचारत नाही. एखादा नागरिक ५० हजारपेक्षा अधिक रक्कम नेत असेल तर त्याला पॅन कार्ड जवळ बाळगणं आवश्यक असतं. मात्र अशाप्रकारे २५०० कोटी रुपयांचा व्यवहार करतानासुद्धा पॅनकार्ड किंवा इतर कागदपत्रं तपासण्यात का येत नाहीत, हा व्यवहार कायदेशीर आहे का?

खरंतर बेकायदेशीर संपत्तीची अशा प्रकारची एक समांतर अर्थव्यवस्था आपल्या देशात कार्यरत आहे. प्रत्येक विभागाला याबद्दलची माहिती असून काही वेळेला तर कळतनकळतपणे यंत्रणा त्याचा एक भाग बनलेली असते. निवडणुकांच्या दिवसात सर्व राजकीय पक्ष पैशांची देशभर देवाणघेवाण करण्यासाठी अंगाडियांचा वापर करतात. हिरे व्यापारी, ज्वेलर्स, शेअरब्रोकर्स, धान्यांचे घाऊक व्यापारी, बेकायदेशीर वाईनचे व्यापारी – (बूटलगेर्स), खाजगी कर्ज देणारे, बांधकाम व्यावसायिक आणि इतर अनेकजण अशाप्रकारे पैसे आणि बेकायदेशीर गोष्टी पाठवण्यासाठी अंगाडियांचा वापर करतात.

हे बघून वाटतं की अर्थखातं समजून उमजून ही समांतर अर्थव्यवस्था सांभाळत आहे. कदाचित देशासाठी किंवा काही व्यक्तिंसाठी ही चांगली गोष्ट असावी.

बालेन्द्र वाघेला (गुजरात)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *