माली हे उत्तर आफ्रिकेतलं अत्यंत गरीब राष्ट्र. लोकसंख्या दीड कोटी. राजधानी बमॅकोमध्ये १७ लाख लोक रहातात. या देशात सोनं, चुना, युरेनियम, जिप्सम अशा किमती खनिजद्रव्यांचा साठा आहे. पण ती जमिनीतून वर काढण्यासाठी ना देशाकडे पैसा ना कोणी गुंतवणुकदार. १९६० साली माली देश फ्रान्सच्या जोखडाखालून मुक्त झाला. नायजर, अस्लेरिया, चाड, लिबिया हे शेजारी असलेले देश. मालीमध्ये ९० टक्के मुस्लीम आहेत. आतापर्यंत जे कार्यकर्ते निवडून आले त्यांनी देशाची अतोनात लुटमार केली. डिसेंबर २००८ मध्ये तर आतंकवाद्यांनी दोन कॅनेडियन डिप्लोमॅटस्ना सव्वाशे दिवस ओलीस ठेवलं होतं. जेव्हा त्यांच्या चार कडव्या, खुनी सहकार्यांची सरकारने सुटका केली आणि भरपूर खंडणी दिली त्याचवेळी त्यांची सुटका झाली होती. देशाचा इतिहास हा पूर्णपणे रक्तलांछित आहे. लिबियामध्ये क्रांती होऊ लागली आणि त्याची परिणती तिथला हुकूमशहा मोम्मार गदाफी याची हत्या होण्यात झाली, तेव्हा पाश्चात्य देशांनी विजयाचा जल्लोष केला होता. बंडखोरांना भरीव साहाय्य कॅनडाचा चार्लस् बुशार्ड याने केलं होतं. त्याबद्दल त्याचा खूप उदोउदो झाला होता. पार्लमेंट हिलवर त्याला २१ तोफांची सलामीही दिली गेली होती.

गदाफीचा अंत झाल्यामुळे आता लोकशाहीचे वारे वाहू लागतील अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्र आणि पाश्चात्य देश करत होते. त्याचवेळी अमेरिकेहून ६००० किलोमीटर्स दूर असलेल्या माली देशात आणखी एका घातक आणि क्रूर संघटनेचा नेता विजयोत्सव साजरा करत होता. अल् कायदाचा नेता मोख्तर बेलमोख्तर. अल् कायदा ओसामा बिन लादेनने न्यूयॉर्कवर हमला करून दोन गगनचुंबी मनोरे उद्ध्वस्त केले आणि ३००० निरपराध अमेरिकन्स्ची हत्या केली, तेव्हापासून बहुतेक देशांनी आतंकवादी म्हणूनच जाहीर केलेली संघटना आहे. कडवी मुस्लीम राष्ट्रं निर्माण करायची, पाश्चात्य राष्ट्रांचा बिमोड करायचा हाच एककलमी कार्यक्रम अल् कायदाचा आहे. ते भारतालाही आपला शत्रूच समजतात. पाकिस्तान आणि अन्य मुस्लीम राष्ट्रांतही त्यांच्या घातपाती कारवाया अखंड सुरू असतात. बेल मोख्तर आणि गदाफी यांचं हाडवैर होतं. त्यामुळे आपल्या शत्रूचा निःपात झाल्यामुळे अल् कायदाला आनंदाच्या उकळ्या फुटणं स्वाभाविकच होतं. आणखी एक मोठा फायदा गदाफीच्या मृत्युमुळे झाला तो म्हणजे गदाफीच्या सैन्याच्या हातात असलेली बहुतेक शस्त्रसामग्री अल् कायदाच्या रानटी टोळीच्या हाती पडली! त्यात रॉकेटवरून उडवू शकणारी ग्रॅर्नेडस्, अँटीटँक आणि अँटीएअर क्राफ्ट मिसाईल्स, रॉकेट लाँचर्स, लँड माईन्स-जणू काही शस्त्रांची अलिबाबाची गुहाच अल् कायदाच्या ताब्यात आली.

‘अल् कायदा इस्लामिक माघरेब’AQIM असं बेलमोख्तारच्या संघटनेचं पूर्ण नाव आहे. अमेरिकेने माली देशास ४२ मिलीटरी ट्रक्स भेटीदाखल दिले होते. पण या दारिद्र्यात खिचपत पडलेल्या देशाकडे ते ट्रक चालवण्यासाठी लागणारं पेट्रोल विकत घेण्याकरताही पैसे नव्हते! अल् कायदाने एका सरकारी वाहनांच्या ताफ्यावर जोरदार हल्ला चढवला आणि ३० माली सैनिकांची शिरं धडावेगळी केली. वाहनं चालवण्याकरता तिथे ड्रायव्हर्सचीही चणचण होती. अनायसे वाहनं अल् कायदाच्या ताब्यात आली. एकाने मशिनगन बेफामपणे चालवून आतंकवाद्यांचे मुडदे पाडले. पण धुमश्चक्रीत त्याचाही बळी गेल्यावर बाकीचे खांबासारखे तटस्थ उभे राहिले, कारण त्यांच्यापैकी कोणालाही ती मशिनगन कशी चालवायची याचं प्राथमिक ज्ञानही नव्हतं! अल् कायदापासून प्रेरणा घेऊन अनेक लहानसहान टोळ्या मुस्लीम आतंकवादाला वाहून घेऊन, त्या भागामध्ये खूपच सतर्क बनल्या आहेत. लिबियामध्येच अजूनही शस्त्रांनी सज्ज असे दोन लाख सैनिक असावेत असा संयुक्त राष्ट्र निरीक्षकांचा अंदाज आहे. अल्जेरियात तर एका रिफायनरीमध्ये बेलमोख्तारच्या अनुयायांनी तिथल्या कर्मचार्यांना ओलीस ठेवलं. शेवटी निकराच्या लढाईत ३८ आतंकवादी नष्ट झाले तेव्हा त्यांच्याकडे लिबियातून मिळालेली शस्त्रं सापडली असं अमेरिकेच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटननी जाहीर केलं होतं. सिरीयातही आसादची राजवट उलथून टाकण्यासाठी बंडखोरांना अल् कायदा मदतीचा हात देत आहे त्या हातात लिबियातून मिळालेली भयानक शस्त्रंच आहेत.

हुकूमशहा कितीही जुलमी असले तरी त्यांच्या कारकिर्दीत भयाने का होईना पण फुटीरवृत्ती काबूत राहिलेल्या असतात. इराकचा सद्दाम, इजिप्तचा मुबारक, रुमेनियाचा चौचेस्कू, युगेस्लाव्हियाचा टिटो, क्युबाचा कॅस्ट्रो, फिलिपाईन्सचा मार्कोस अशी अनेक उदाहरणं नमूद करता येतील. आफ्रिकेला  Dark Continent म्हणतात, केवळ त्यांच्याकडे काळी जनता आहे म्हणून नव्हे तर पाण्याचंही अफाट दुर्भिक्ष आहे. लिबियात गदाफीची गच्छंती झाल्यावर तिथे सुप्तावस्थेत असलेल्या अल् कायदाला एकदम शस्त्रं मिळाली आणि प्रतिस्पर्धीही उरला नाही. लिबियाचा पाडाव ही पुढील स्फोटक परिस्थितीची नांदी ठरेल असा इशारा आफ्रिकेतले अनेक नेते देत होते. पण त्यांच्या म्हणण्याकडे जगाने पाठ फिरवली होती. चाड या देशाच्या अध्यक्षाने तर जाहीरच केलं होतं की अल् कायदा आता आधुनिक शस्त्रांनी समृद्ध होत आहे आणि त्याचे गंभीर परिणाम लवकरच प्रत्ययाला येतील. अल्जेरियामध्ये तर सरकार आणि आतंकवादी यांच्यामधून विस्तवही जात नाही. म्हणून त्या देशातही या घातपाती संघटनेकडे शस्त्रं मुबलक प्रमाणात येत असल्याचं पाहून खूपच अस्वस्थता होती. नायजर देशातले पोलीस सरहद्दीवर गस्त घालत असताना त्यांना शेकडो ट्रक्स रांगेत कूच करताना आढळले. त्यामध्ये ६४५ किलो स्फोटकं, ४४० डिटोनेटर्स आढळले. हे सर्व बेलमोख्तरच्या हातात पडण्यापूर्वीच जप्त केलं गेलं.

२०११मध्ये वर्षअखेर आतंकवादाचा कसा मुकाबला करायचा याची आफ्रिकन देशांनी चर्चा केली. त्यावेळी चार देशांचे परराष्ट्रमंत्री यांनी गंभीर इशारा दिला की, ‘आमच्या लगत असलेल्या माली देशांत शस्त्रास्त्रं कडव्या मुस्लिमांच्या हातात पडताहेत आणि तो फार मोठा धोका आहे. सर्वच भाग ज्वालामुखीच्या टोकावर बसला आहे. हे मुस्लीम इतर कोणताही धर्म मानत नाहीत. सर्वांचा काफर असाच हेटाळणीपूर्वक उल्लेख करतात आणि त्यांना जीवे मारणं हे आपलं धर्मकर्तव्यच समजतात.’ पण या मोहंमद बेझोयमचे कळकळीचे शब्द कोणाच्याही काळजाला भिडले नाहीत. गदाफीचा खून झाला आणि सर्व उत्तर आफ्रिकेत आता आलबेल आहे. असा चुकीचा समज संयुक्त राष्ट्र, युरोप, अमेरिका यांनी करून घेतला. पण ती घोर आत्मवंचना ठरली. कारण अल् कायदावर नुसता राखेचा भर साचला होता परंतु आत अंगार भडकतच होता!

जेव्हा लिबियात गदाफीची राजवट होती तेव्हा त्याने मॉरीटेनिया, चाड (याचा उच्चार चॅड असा स्पेलिंगनुसार होतो) माली, नायजेर आणि इतर आफ्रिकन देशांतून त्याने भरपूर मजुरी आणि वेठबिगारी करणारे लोक लिबियात आणले होते. गदाफीच्या पश्चात अशांतता निर्माण झाली. परदेशीय लोक स्थानिकांच्या डोळ्यांत सलू लागले. ते असंघटित असल्याने अल् कायदाने त्यांना आपलं लक्ष्य बनवलं. जीवास धोका दिसल्याने ते आपापल्या मूळ देशांत परतले. तिथे जाणं म्हणजे आगीतून फुफाट्यात जाण्यासारखंच होतं. जणू एकादशीच्या घरी महाशिवरात्र! मूळ देशात पूर, अवर्षण, धान्याची नासाडी यामुळे तेथील स्थानिक जनताच नसती ही ब्याद कशाला आली, अशा भावनेने मूळदेशी परतलेल्यांकडे पहात होती. रिकामं मन नेहमी सैतानाचं घर असतं. नोकरी गेलेली, मायदेशी सापत्न वागणूक त्यामुळे ही जनता त्वरेने अल् कायदाच्या कचाट्यात सापडली. नवभरती केलेले तरुण म्हणून! दहशतवाद आणखी तीव्र झाला.

अशा अशांततेमध्ये नेहमी फुटीरवृत्तींचं फावतं. माली देशात उत्तरेला ट्युरेग्ज या जमातीचे लोक राहतात. ते निमगोरे असल्याने दक्षिण भागात रहाणार्या आपल्याच देशबांधवांना तुच्छ समजतात! गोर्या कातडीला श्रेष्ठ मानण्याचा सर्व जगभर एकच धागा आहे. भारतामध्ये कुठल्याही विवाहविषयक जाहिरातीत वधू पाहिजे नंतर गोरी हा पहिला शब्दच अटळ असतो! या ट्युरेग्ज लोकांनी देशात अशांतता आहे, अल् कायदा आणि सरकार यांची धुमश्चक्री सुरू आहे. त्या धामधुमीत आपल्या स्वतंत्र राज्याची मागणी पुढे रेटायला हरकत नाही असा विचार केला. कारण ते लिबियातून जरी आपल्या मूळ देशी परतले होते तरी रिकाम्या हातांनी आले नव्हते. त्यांच्या हातात शस्त्रं होती आणि त्या हिमतीवर त्यांनी दादागिरी दाखवण्यास प्रारंभ केला. त्यामुळे अल् कायदा, ट्युरेग्ज आणि सरकार असा त्रिकोणी सामना सुरू झाला. प्रत्येकजण इतरांकडे अतीव तिरस्कारानेच पहात असे. अन्सार डाईन हा फुटीर राज्याची मागणी करणार्यांचा नेता होता. त्याने अल् कायदाशी हातमिळवणी करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. साहजिकच आतंकवाद्यांना अचानक कुमक मिळाली आणि लिबियातून पळवलेल्या शस्त्रांचा साठादेखील.

अमादाक रौमानी या मालीच्या अध्यक्षाने केवळ दोन वर्षांपूर्वीच ट्युरेग्ज जमातीची फुटीरवादी चळवळ कायमसाठी जमिनीत गाडली गेली आहे अशी दर्पोक्ती केली होती. अल्जेरियातही अल् कायदा सरकारबरोबर युद्ध करत होतेच. त्यांचा जागतिक स्तरावरचा एकच उद्देश-जगात इस्लामिक शरीया कायद्याचा अंमल प्रस्थापित करणं. मग ते मुस्लीम सरकारशीसुद्धा संघर्ष करायला तयार असतात. अफगाणिस्तानात तालिबान राजवटीत अल् कायदाला मोकळं रान मिळालं होतं. दोघेही कडवे, क्रूर आणि धर्मांध. तालिबानने बुद्धाच्या मूर्ती तोडल्या कारण त्यांचे वंशजच चेंगीझखान आणि अफजलखानासारखे मूर्तिभंजक. या राजवटीस फक्त तीन देशांनी मान्यता दिली होती. पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब इमिरेटस्. अमेरिकेकडे लष्करी सामग्रीची याचना करणार्या मालीच्या अध्यक्षाने आपलं लष्कर किती निष्प्रभ आहे याचाच पाढा वाचला आणि देशाची सूत्रं नवीन पिढीच्या म्हणजेच अननुभवी लोकांच्या हातात लवकरच दिली जातील, असंही सांगून टाकलं. मालीने कॅनडाकडेही आपली भिकेची झोळी पसरली होती आणि १० कोटी डॉलर्स आपल्या पदरात पाडून घेतले होते. त्यापैकी बहुतेक रक्कम भ्रष्टाचारामध्येच खतम झाली! ट्युरेग्जनी हल्ला चढवला. माली देशातली उत्तर भागामधली काही शहरं आपल्या काबूत आणली. त्यांना तोंड देण्यात मालीच्या लष्कराचा खूपच शक्तिव्यय झाला. अल् कायदाने ही सुवर्णसंधी आहे असं मानून माली देशाच्या टिंबख्तू या शहरावरच चढाई केली. तिथून बमॅको या राजधानीकडे कूच केलं. लष्करी प्रतिकार फिका पडतो आहे हे पाहिल्यावर आपल्याच सरकारविरुद्ध निदर्शनं केली कारण देशाच्या सैनिकांना ना पुरेसं अन्न मिळत होतं, ना शस्त्रास्त्रं. कारण सरकारी अधिकार्यांनी शस्त्रं आणि अन्न शत्रूलाच भरपूर पैसा कमावून विकलं होतं!

सरकारविरुद्ध असंतोष इतका वाढला की मार्च २१, २०१२ ला कॅप्टन अमॅडॉन सॅनोगो हा सरळ अध्यक्षांच्या निवासस्थानावरच चाल करून गेला. आम्हाला बंडखोर आणि आतंकवादी यांच्याशी सामना करायला शस्त्रं पाहिजेत ही त्याची प्रमुख मागणी होती. अध्यक्ष पळाले आणि बंडखोरांच्या हातात राजवाडा पडला. पण पुढे काय करायचं याचा आराखडा नव्हता. अमॅडॉनने टीव्हीवर जाहीर केलं की दुबळ्या आणि अकार्यक्षम राजवटीची इतिश्री झाली आहे. आणि घटना बरखास्त केली गेली आहे. पण हा अतिरेकीपणा इतर देशांच्या पचनी पडला नाही. कॅनडाने आपली वकिलात त्वरेने बंद केली. काही बंडखोरांनी देशातल्या निवडून आलेल्या सरकारलाच गुंडाळून ठेवल्याबद्दल निषेध व्यक्त केला आणि मदतीचा नळ बंद केला. आफ्रिकन युनियनने मालीचे सर्व Assetsफ्रिझ् केले. मालीभोवतालच्या देशांनी सरहद्दीवरील गस्त वाढवली. त्यामुळे दीड कोटी नागरिक जणू पिंजर्यामध्येच बंदिस्त झाले. पण देशाचे नागरिक दुबळ्या भ्रष्टाचारी सरकारचा अंत झाला म्हणून खूशच होते. त्यांचा बंडखोरांनाच पाठिंबा होता.

जगात मालीची प्रतिमा लोकशाहीच्या पथावर असलेला देश अशीच होती. प्रत्यक्षात राज्यकर्ते आणि सनदी अधिकारी यांनी संगनमताने अंमली द्रव्यं आणि शस्त्रास्त्रं यांची बेकायदा विक्री करून देशास भिकेला लावलं होतं. परकीय मदतीमधल्या प्रत्येक डॉलरमधील एकही पैसा सामान्य जनतेच्या हिताकरता खर्च होत नव्हता! अशा राजवटीबद्दल कोणाला प्रेम वा आत्मीयता वाटेल? ट्युरेग्ज फुटीरवाद्यांनी उत्तर भागात आपलं स्वतंत्र राज्य स्थापन झाल्याची राष्ट्राने अधिकृत घोषणा केली. देशाचे लचके तोडले जात होते. अर्थात, त्या नवीन देशाला कोणत्याच राष्ट्राने मान्यता दिली नाही. ट्युरेग्जनी सैतानाशीच हातमिळवणी केली असल्याने त्यांचे साथीदार अल् कायदा आपल्या भागीचा हिस्सा गिळंकृत करण्यास उत्सुक होते. त्यांनी ताबडतोब शरीया कायदा जारी केला. टिंबख्तू शहरातली मद्यालयं उद्ध्वस्त केली. टूरिस्टना सळो की पळो करून सोडलं, महिलांवर बुरखा घालण्याची सक्ती केली. त्यांच्या शाळा बंद केल्या. लोकांनी संगीत ऐकायचं नाही असा वटहुकूम जारी केला. फुटबॉलवर बंदी आली. आणि जो कोणी या इस्लामी राजवटीच्या रानटी कायद्याचं पालन करणार नाही त्याच्या पाठीवर सार्वजनिक जागी फटक्यांचे वळ उठू लागले.

इतिहासात प्रथमच अल् कायदाला स्वतःच्या अखत्यारीतला देश मिळाला होता – माली. त्यामुळे अल्जेरिया, सोमालिया, पाकिस्तान, नायजेर या देशांतून जिहादी आतंकवादी मालीमध्ये शेकड्यांनी येऊन दाखल झाले. आणि टिंबख्तू रेडिओवरून घोषणा होत राहिल्या. परकीय वाटणारे हे आपले रक्ताचेच भाईबंधू आहेत. त्यांचं खुल्या मनाने स्वागत करावं. पण ट्युरेग्जच्या जनतेला असला आतंकवाद पसंत नव्हता. त्यांनी शरीया कायद्याचा निषेध केला. ट्युरेग्जना स्वातंत्र्य हवं होतं पण जिहादी मंडळींनी त्यांना हतबल करून टाकलं होतं. जगातल्या देशांनी गरीब माली नागरिकांची सुटका करावी अशा प्रचाराला पाश्चात्य राष्ट्रांचा थंडा प्रतिसाद होता. तो आफ्रिकेचा प्रश्न आहे. आफ्रिकन युनियनमधील लष्कराने लढा द्यावा अशी ती भूमिका होती. अर्थात हे सर्व अल् कायदा आतंकवाद्यांच्या पथ्यावरच पडणारं होतं. ही कर्करागाची सुरुवात आहे. आणि हा हळूहळू सर्व आफ्रिकेत पसरेल अशी शक्यता नाकारता येणार नाही.

हा लेख मुंबईत बसून वाचणार्याच्या मनात मालीमध्ये चाललेल्या उलाढालींच्या विषयी उदासिनता असणं शक्य आहे. आफ्रिकेमधला एक दारिद्री देश. त्यात अल् कायदाचं राज्य आलं म्हणून आपल्याला काय त्याचं सुखदुःख अशीही प्रतिक्रिया शक्य आहे. पण ही खतरनाक संघटना आहे. त्यांना मुस्लीम पद्धतीनुसारच जगाची पुनर्रचना करायची आहे. त्यांना मानवी मूल्यांशी देणंघेणं नाही. त्यांच्या क्रौर्याला सीमा नाही. आणि अल् कायदाचे समर्थक, पाठीराखे आणि त्यांना सहानुभूती दाखवणारे लाखो देशद्रोही भारतातही पसरले आहेत. या संघटनेने पाकिस्तानमध्येही खून, जाळपोळी, घातपात आणि मारामार्यांचं सत्र चालवलं आहेच. उद्या त्यांच्या हातात अण्वस्त्रं पडली तर भारताला त्यापासून प्रचंड धोका आहे. म्हणूनच जगाच्या पाठीवर देश पादाक्रांत केलेल्या अल् कायदाची आपणही गंभीरपणे दखल घेतली पाहिजे. तिथे बोटचेपं धोरण कामी येणार नाही. आज माली देशांतले नागरिक रडताहेत. उद्या ती अश्रुंची लाट इतरत्रही पसरू शकते. मग दिवाळी सण साजरा करणं विसरा. फक्त ईदच! राज कपूरने पडद्यावर एक गाणं गायलं होतं. त्यातला माली शब्दाचा उल्लेख माली देशालाही लागू पडतो! गाण्याचे शब्द होते… एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है। उजडा हुआ गुलशन है, रोता हुआ ‘माली’ है।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *