आरोग्यरक्षक डॉक्टरांचंच आरोग्य आता धोक्यात येत असल्याचं लक्षात येतंय. मुंबईसारख्या महानगरीत येऊन डॉक्टरकीचं शिक्षण घेताना MBBS झाल्यानंतर पदव्युत्तर शिक्षणाकरता पुन्हा वेगळ्या देशव्यापी स्पर्धापरीक्षेला सामोरं जायचं ओझं सांभाळत Internship पूर्ण करावी लागते. हे करताना आमची डॉक्टरमंडळी प्रचंड तणावाखाली अभ्यास आणि काम अशी तारेवरची कसरत करत असतात. खरं तर दोन दशकांपूर्वी पदव्युत्तर शिक्षण हे MBBS च्या मार्कांवर ठरत असे. त्यातूनही सर्जरी किंवा शल्यशास्त्र विषयाकरता त्या विषयाचे मार्क्स तर गायनॅकॉलॉजी करता त्याचे मार्क्स ग्र्राह्य धरले जात. यात MBBS  च्या तिसर्या वर्षापासूनच्या अभ्यासक्रमात ज्या विषयात आपल्याला पुढे शिक्षण घ्यायचं आहे त्याचा सखोल अभ्यास करून इतर विषयांचं पाहिजे तितकंच ज्ञान घेऊन, ज्या विषयात आपल्याला जास्त गती आहे किंवा आपली Aptitude आहे, तो विषय निवडता येत असे. परंतु आज देशव्यापी NEET मध्ये पूर्णतः प्रश्न सोडवावे लागतात, तेही Multiple Choice Questions मधील… यात प्रथम वर्षापासून सगळे विषय आणि प्रश्न कोणत्याही कानाकोपर्यातून विचारणार! बरेच वेळा विद्यार्थ्यांना जो विषय पुढे शिकायचा आहे, ज्यात अधिक कौशल्यवान बनून रुग्णांना लवकरात लवकर बरं करण्याचा प्रयत्न करायचा आहे, त्या ताज्या दमाच्या होतकरू डॉक्टर्सवर हा अन्यायच नाही काय? प्रश्नपद्धती आणि परीक्षापद्धती पूर्णतः वेगळी असल्याने त्याची तयारीही वेगळ्याप्रकारची आणि पदवीनंतर पुरा करायचा असतो बाँड. आमच्या एका विद्यार्थ्याने या विषयावर ‘Bonded Labour’ म्हणून असलेली डॉक्टरांची परिस्थिती वर्णन केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याचा देशातील आरोग्यव्यवस्था सुधारायला खरंच उपयोग झाला आहे का?

महाराष्ट्राने आपल्या आरोग्यविषयक समस्या उदाहरणार्थ, कोकणात होणारे विंचूदंश, सर्पदंश, मेळघाटमधील कुपोषण, मुंबई महानगरीतील Life Style Diseases आणि Accidents, क्षयरोग आणि इतर साथीचे आजार या सर्वांकरता स्थानिक आरोग्यकेंद्रं सक्षम करण्याची गरज आहे.

Internship मध्ये रुग्णसेवेचा अनुभव नसलेले, डॉक्टरीची पदवी अजून हातात येण्याची बाकी असलेले आणि डोक्यावर स्पर्धापरीक्षेचा बोजा असलेले डॉक्टर्स त्यांचं पदव्युत्तर शिक्षण सुरूहोण्याआधीच दमून जात आहेत. चार दशकांपूर्वी MBBS पास झाल्यावर Internship चा पूर्ण काळ,कोणत्याही परीक्षेचा तणावविरहित शिक्षण घ्यायला मिळत असे आणि हे मोलाचं वर्ष रेसिडेंट डॉक्टर्स होण्याआधी उत्तम तर्हेने वापरता येई. होतकरू डॉक्टरांच्यात आजारांचं वाढतं प्रमाण लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करण्याचं केईएम रुग्णालयात श्वसनचिकित्सा विभागाने ठरवलं आहे.

मुंबईत डॉक्टरांना काम करताना तिथल्या कामाची आणि परिसराची संपूर्ण माहिती असेल, तिथले कोणते विषय संवेदनशील आहेत याची कल्पना असेल आणि मुख्यत्वे डॉक्टर या समस्या समजून घेऊन त्यांची उकल करू शकत असतील तर रुग्णांचा त्रास लवकर कमी होतो. पण जर भाषेच्या अडचणीने सुरुवात असेल तर डॉक्टरांबरोबर दुभाषिक माणसाला बरोबरीने बसवावं लागतं. महाराष्ट्रात सक्तीची मराठी दक्षिणेकडून MBBS होऊन आलेल्या डॉक्टरांना उमगत नाही आणि आधीच तब्बेत सावरत आलेल्या पेशंटना मात्र अधिक तिष्ठत बसायला लागतं. याचा विचार करायला हवा, महाराष्ट्राने! आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयातील डॉक्टरांकरता पूर्वी प्रचलित असलेली पद्धती जुनं ते सोनं म्हणून परत आणावी का? जिथे संशोधन आणि समस्यांवरील उपाय याला महत्त्व असेल आणि डॉक्टरांच्या आरोग्यालाही प्राधान्य मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *