असं म्हणतात की फार फार पूर्वी जेव्हा भारतात महात्मा गांधींचा करिष्मा सुरू होता, म्हणजे नोटेवरील गांधीपेक्षा खरेखुरे गांधी जेव्हा लोकांना अधिक प्रिय होते, तेव्हा त्यांना पत्र पाठवताना केवळ महात्मा गांधी एवढंच टाईप केलं जायचं. ते जिथे असतील तिथे त्यांना पत्र पोहचतं केलं जायचं.. वर्षं उलटली… त्यानंतर महाराष्ट्रात काहीसं असंच ऐकायला मिळायचं… अगदी आजही शरद पवार कुठले म्हटले की शाळेतलं शेंबडं पोरही बारामती असं उत्तर देतो म्हणे… इतका शरद पवारांचा बारामतीशी जिव्हाळा… असं असतानाही शरद पवारांनी आता मुंबईकर होण्याचं ठरवलंय आणि तेही सक्रिय राजकारणात ४६ वर्षं उलटल्यानंतर म्हणजे शरद पवारांचा दक्षिण मुंबईत तसा मोठा बंगला आहे. पण कागदोपत्री पवार बारामतीकरच होते. यापुढे शरद पवारांचा पत्ता असणार आहे. बंगलो नंबर २, सिल्व्हर ओक इस्टेट, भुलाभाई देसाई मार्ग, मुंबई २६.

आजवर महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेला हा पत्ता सध्या यामुळेच चर्चेत आलाय. शरद पवारांनी तब्बल ४६ वर्षं राजकारणात आपला ठसा उमटवल्यानंतर असं नेमकं काय घडलं की पवारांना आपला पत्ता निवडणूक आयोगाकडे बदलावा लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पवारांनी मतदार नोंदणी कार्यालयात फॉर्म नंबर ६ चा अर्ज दाखल केलाय. यानुसार आता बारामती मतदार केंद्रातील पवारांचं नाव वगळलं जाणार आणि मुंबईत ते दाखल करून घेणार…

राष्ट्रवादीला मुंबईत मिळणारं मत किमान एकने तरी वाढवण्यासाठी पवारांनी हा निर्णय घेतल्याची टीका विरोधक करतायत. पण पवार कोणतीच गोष्ट कधी विनाकारण करत नाही. क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा बॅटिंग करण्यासाठीच ही पत्ता बदलाची फिल्डिंग लावली गेल्याची चर्चा आहे. मुंबई क्रिकेट संघटनेच्या घटनेनुसार केवळ मुंबईचाच रहिवासी हा कार्यकारी पदाची निवडणूक लढवू शकतो. पवार हे बारामतीचे रहिवासी असल्यामुळे गेल्यावेळी पवारांना निवडणूक लढवता आली नव्हती. हा नियम म्हणे याआधीही अस्तित्वात होता आणि तो असतानाही पवार दहा वर्षं एमसीएचे अध्यक्ष होतेच. अचानक विलासराव देशमुख मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले आणि मग पवार मुंबईकर नसल्याचा साक्षात्कार झाला आणि नो बॉलवर पवारांची विकेट काढली गेली. आता येत्या ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा मुंबई क्रिकेट संघटनेची निवडणूक होऊ घातलीय आणि या निवडणुकीसाठीच पवारांनी आपला पत्ता बदलून घेतलाय असं म्हटलं जातंय.

शरद पवारांनी जाहीरपणे एमसीएच्या कार्यालयात महिनाभरापूर्वी आपण अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाही असं म्हटलं होतं. पण आजवरचा इतिहास पाहता ते जे बोलतात त्याच्या नेमकं उलट करतात. त्यामुळे ते निवडणूक नाही लढवणार म्हटले म्हणजे हमखास लढवणार असा आपण अर्थ घ्यायचा. नुकताच नाही का महाराष्ट्रात दुष्काळ असताना शाही पद्धतीने लग्न करणार्या आपल्याच पक्षाच्या कॅबिनेट मिनिस्टर भास्कर जाधव यांच्यावर पवारांनी जाहीर टीका केली होती. अशा लोकांनी सार्वजनिक जीवन सोडून इतर पर्यायांचा विचार करावा, अशा कडक शब्दांत त्यांनी फटकारलं होतं. पण त्यानंतर चारच महिन्यांत त्याच जाधवांना शरद पवारांनी प्रदेशाध्यक्ष केलं. आणि त्यांच्यावर स्तुतिसुमनंही उधळली. तेव्हा शरद पवार हे मराठी मातीतले कसलेले पैलवान आहेत, कधी कुणाला धोबीपछाड देतील हे सांगता येणार नाहीत. तुर्तास पवारांनी मुंबईकर होण्याचा निर्णय घेतलाय. एकप्रकारे हे मुंबई क्रिकेट संघटनेच्या दिशेने टाकलेलं आणखीन एक पाऊल आहे. कदाचित हा लेख वाचत असताना पवार मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार ही ब्रेकिंग न्यूज पहायला मिळू शकते. तेव्हाच पवारांची प्रतिक्रियाही आताच सांगून टाकतो… पवार त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये म्हणतील, क्रिकेट कार्यकर्त्यांच्या आग्रहाला मी नाही म्हणू शकलो नाही…

पवारांच्या या प्रतिक्रियेनंतर मीडियाची आणखीन एक कॅम्पेन सुरू होईल… पवारांनी वयाच्या ७२ व्या वर्षी अध्यक्ष व्हावं का? कारण काँग्रेसप्रणित देशातील सरकार ज्यात शरद पवारही सामील आहे, ते जे क्रीडा बिल आणू पाहतायत त्यानुसार ७० वर्षांवरील व्यक्ती कोणत्याही संघटनेचं पद भूषवू शकत नाही. पण नियम हे तोडण्यासाठीच असतात नाही का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *