प्रेम म्हणजे अनुभव. प्रेम हे कोणी सांगून किंवा कोणाच्या अनुभवावरून आपल्याला कळणारं नसतं. खरं प्रेम म्हणजे काय हे प्रत्येकजण प्रत्येकाच्या अनुभवावरून जाणत असतो. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना, प्रेमात पडल्यावर जो खरा अनुभव आपल्याला मिळतो तेच खरं प्रेम. माझ्यासाठी तरी प्रेमाची व्याख्या हीच आहे.
मी सामाजिक प्रश्नांवर बेतलेला ‘श्वास’, ‘डोंबिवली फास्ट’सारखे चित्रपट तर ‘साने गुरुजी’ सारखा आत्मचरित्रपर चित्रपट केलेला आहे. तसंच ‘गैर’सारखा थ्रिलर चित्रपटही मी केलेला आहे. पण मी कधीही प्रेमकथेवर आधारित चित्रपट केलेला नव्हता. त्यामुळे माझा ‘प्रेमसूत्र’ हा चित्रपट माझ्या इतर चित्रपटांपेक्षा खूपच वेगळा आहे. हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला लोकांचा खूपच चांगला रिस्पॉन्स मिळत आहे. प्रेमाबद्दलची एक वेगळी जाणीव या चित्रपटातून करून देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. या चित्रपटाची संकल्पनाही माझीच आहे. ती जवळजवळ एक-दीड वर्षं माझ्या डोक्यात होती. पण ती खरी फुलवली तेजस देऊस्कर आणि प्रसाद मिरासदार यांनी. कारण मी केवळ कॉन्सेप्ट नोट त्यांना सांगितली होती. त्यावर कथा-पटकथालेखन त्यांनीच केलं. नात्यात न अडकू इच्छिणार्या आजच्या पिढीची ही कथा आहे. पण हा चित्रपट काही एका पिढीसाठी नाहीय. माझ्यामते प्रेमाची जाणीव ही मुलाला जन्मल्यापासूनच होते आणि ती जाणीव मृत्यूपर्यंत असते. केवळ त्याच्या व्याख्या या वयानुसार बदलत जातात आणि त्यामुळे ही कथा जरी तरुणपिढीची असली तरी सर्वच पिढ्यांना आपलीशी वाटणारी आहे. चित्रपटाच्या सुरुवातीलाच या चित्रपटातील नायिका सानिया म्हणजेच पल्लवी सुभाष हिची आजी शुभा खोटे यांचा एक खूपच चांगला संवाद आहे. आणि या संवादातूनच आम्हाला चित्रपटात काय मांडायचं आहे हे आम्ही सुरुवातीलाच स्पष्ट केलं आहे. शुभा खोटे या त्यांच्या नातीला म्हणतात की ‘प्रेम, लग्न आणि शरीरसंबंध या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्या कधीच एकत्र मिळत नाहीत आणि या तिन्ही गोष्टी ज्यांना एकत्र मिळतात ते खरंच खूप भाग्यवान असतात.’ त्यामुळे हा चित्रपट एका बोल्ड विषयावर आहे हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. या चित्रपटाचा विषय जरी बोल्ड असला तरी कोणतीही आक्षेपार्ह दृश्यं यात नाहीत. आणि त्यामुळे वडिलधार्या माणसांनाही हा चित्रपट खूप आवडत असल्याचं ते सांगतात. तसंच सगळ्याच वयोगटातील लोकांना या चित्रपटाची संकल्पना खूपच आवडत आहे. माझ्या बायकोला तर हा चित्रपट खूप आवडला. माझी कॉन्सेप्ट नोट ही खूपच लहान होती आणि हे तिला माहीत होतं आणि त्यामुळे हा चित्रपट पाहिल्यावर छोट्याशा संकल्पनेवर किती सुंदर चित्रपट बनलाय अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया तिने दिली.
दादरच्या हिंदू कॉलनीत राहणारा एक मुलगा गोव्याला कामानिमित्त जातो आणि तिथे त्याची ओळख एका गोवानिस मुलीशी होते आणि त्यांच्यात शारीरिक संबंध येतात आणि त्यातून कथेला एक वेगळी कलाटणी कशाप्रकारे मिळते हे या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळतं. या चित्रपटात मी, पल्लवी सुभाष, श्रुती मराठे, लोकेश गुप्ते, शुभा खोटे प्रमुख भूमिकेत आहेत. पल्लवीची स्क्रिन टेस्ट घेतल्यावर ती अस्सल गोवानिस मुलगी दिसत असल्याने ती या भूमिकेसाठी आम्हाला योग्य वाटली. या चित्रपटात सार्यांनीच आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे.
‘प्रेमसूत्र’ या चित्रपटाचं अधिकाधिक चित्रीकरण आम्ही गोव्यात केलं आहे. पण चित्रपटात केवळ आम्हाला गोव्याचं सौंदर्य न दाखवता तिथलं कल्चर, तिथल्या लोकांचं राहणीमान दाखवायचं होतं आणि त्यामुळे चित्रीकरणाच्या अगोदर आम्ही दोनदा गोव्याला जाऊन आलो आणि त्यामुळे आम्हाला सारं खूप चांगल्या पद्धतीने दाखवता आलं. तसंच आता गोव्यात बंद असलेली मायनिंग इंडस्ट्री त्यावेळी सुरू असल्याने त्याचंही चित्रीकरण आम्ही या चित्रपटात केलं आहे आणि त्यामुळे संपूर्ण गोव्याचा आनंद प्रेक्षकांना या चित्रपटातून घेता आला आहे. या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफर पुष्पांक ऌगावडे याने खूपच चांगल्यारितीने गोवा त्याच्या कॅमेरात टिपला आहे. चित्रपट पाहिल्यानंतर एक वेगळा गोवा आम्हाला पहायला मिळाला अशाही प्रतिक्रिया लोक देतात. प्रेम या नात्याविषयी एक वेगळी जाणीव आम्ही लोकांना करून दिली आहे असंही अनेक लोक आम्हाला सांगतात. सुस्मित लिमये याने खूपच चांगलं संगीत दिलं आहे आणि विशेष म्हणजे सॅक्सोफोन आणि विविध गिटारांचा संगीत देण्यासाठी त्याने वापर केला आहे. आणि त्यामुळेच हेच या संगीताचं वेगळेपण असल्याने संगीत प्रेक्षकांना खूप आवडत आहे.
प्रेमाच्या या वेगळ्या जाणिवेसाठी प्रेक्षकांनी एकदातरी ‘प्रेमसूत्र’ नक्कीच पहावा.
संदीप कुलकर्णी