हॉलिवूडला एखाद्या चित्रपटाचा उत्तरार्ध बनवायची पद्धत प्रचलित आहे जी ‘सिक्वल’ म्हणून आपल्यालाही परिचित आहे. ही पद्धत आता भारतीय मुख्य हिंदी चित्रपटातही रुजली आहे. भाग २,३ असं जमेल तेवढ्या आवृत्त्या निघताहेत. काही चालतात, काही आपटतात. आता तर मराठी चित्रपटाचाही सिक्वल थेट थ्रीडीत आलाय.

लेखकांची/दिग्दर्शकांची सृजनशीलता आटली म्हणून किंवा यशाचा हमखास फॉर्म्युला म्हणून हे सिक्वल जन्मतात असा एक आरोप केला जातो. थोडक्यात नारळाच्या झाडासारखं एकाच कथेचं शहाळं ते करवंटी असे भाग पाडून प्रेक्षकांच्या माथी मारले जातात किंवा गळी उतरवले जातात.

या सर्व चित्रपटसृष्टींना लाजवेल आणि रजनीकांतलाही नमवेल असा एक ‘हिरो’ या भारतभूमीत आहे आणि तो मराठी असला तरी मराठीमिश्रित हिंदीने तो भारतीयांचा हिरो आहे. अमिताभ बच्चन यांच्या सत्तरीला काखेत मारेल अशा या ७५च्या हिरोचं नाव आहे. किसन बाबूराव तथा अण्णा हजारे!

गानकोकिळा लता मंगेशकर यांची जशी एक ‘कथा’ आहे, तशी अण्णांची पण आहे. ६५च्या भारत-पाक युद्धात त्यांच्या जीपवर हल्ला झाला. जीपमधले इतर सगळे ठार झाले. अण्णा वाचले! मग हे बोनस आयुष्य समाजाला द्यायचं ठरवलं. विवेकानंद वाचले. घर सोडलं. मंदिरातच राहू लागले. मग राळेगणचा ग्रामविकास, त्या प्रभावातून राज्यात, भारतात अनेक सरकारी समित्यांवर, मग ट्रस्टची स्थापना, पुढे भ्रष्टाचाराविरोधी लढा, माहितीचा अधिकार, मंत्र्यांचे राजीनामे घेण्याचे साखळी सामने इत्यादी इत्यादी. लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी हा राळेगणहून दिल्लीत धडकलेला गांधी टोपीधारी हिरो एका रात्रीत तमाम भारतीयांचा नवा (महात्मा) गांधी झाला.

आजपर्यंत यादव बाबा मंदिराच्या ओट्यावर बसणारा हा नवा गांधी,

जंतरमंतरवरून प्रसारमाध्यमांनी थेट भारताच्या कानाकोपर्यात नेला. राजघाटावर समाधीत गांधीही किंचित असूयेने तळमळले असतील इतकी प्रसिद्धी! जे गांधींना जमलं नाही ते अण्णांनी केलं! गांधींनी नुस्ती गांधी टोपी दिली. अण्णांनी गांधी टोपी दिलीच वर त्यावर ‘मैं हू अन्ना’ असं लिहून प्रत्येक मस्तकाला स्वतःची आयडेंटीटी दिली. परमेश्वर कपाळावर विधिलिखित लिहितो पण ते दिसत नाही म्हणतात. अण्णांनी याबाबतीत परमेश्वरालाही मागे टाकून आपल्या अनुयायांच्या टोपीवर त्यांचं विधिलिखीत लिहून टाकलं. एका वाक्यात. मैं हू अन्ना! या मैं हू अन्नाने, महानायकाच्या ‘मैं हूँ डॉन’ ला पण मागे टाकलं…

असेल हरी तर देईल खाटल्यावरी अशी सर्वसाधारण वृत्ती असलेल्या भारतीयांना किसन बाबूराव म्हणजे संभवामि युगे युगे म्हणत परत आलेले भगवानच वाटले. आता सत्याग्रह उपोषणरूपी सुदर्शनचक्राने ते सत्ताधार्यांचं धोतर पितांबरात बदलणार या उत्कंठतेने, त्यांनी वर्गणी न देता गणपती उत्सवाच्या कार्यक्रमाला जावं तशी ‘फुकट’ गर्दी केली!

अण्णा आणि सहकारी नवे गांधीवादी असले तरी त्यांनी पाठीराख्यांना चिमूटभर मीठ हाती दिलं नाही. उलट स्वतः उपास करून कार्यकर्त्यांसाठी ‘रसोई’ अखंड चालू ठेवली. प्रत्यक्ष सरकार अजूनही अन्नसुरक्षा विधेयक आणू शकलं नाही पण अण्णांनी भक्तांची अन्नसुरक्षा व्यवस्थित केली. अन्नदेता सुखी भवः हा मंत्र अन्नादेता सुखी भवः असा गिरवला लोकांनी.

खाऊन पिऊन, गाऊन, ओरडून, मेणबत्त्या पेटवून सारा भारत आपल्यामागे आहे म्हटल्यावर अण्णा फ्लॅशबॅकमध्ये गेले. त्यांना भारत पारतंत्र्यात असून कालपरवाच भगतसिंह फासावर चढलाय असं वाटून त्यांनी ‘इन्किलाब’ झिंदाबाद असे नारे दिले. मग परत ते फ्लॅश फॉरवर्ड करून गोरे गए काले आए असं स्वतःच्या रंगाची तमा न बाळगता नारे देऊ लागले. ड्रीम सिक्वेन्समध्ये हिरो हिरोईन झोपडपट्टीयुक्त महानगरातून थेट युरोपात जातात तसं अण्णा रणांगणावरून क्रिकेट मैदानात पोचले. स्वतः गोलंदाजी हाती घेऊन, मंत्र्यांच्या ‘विकेट’ घेऊन, क्रिकेटपट्टूंसारखे हात उंचावून, येस्स, येस्स करत विजयी मुद्रा स्टेडियमभर पर्यायाने भारतभर फिरवत राहिले.

धरण फुटल्यावर जसं गाव वाहून जावं तसं सरकार वाहून जायची वेळ आल्यावर संसदेत खास अधिवेशन बोलवून सरकारने लोकपाल नावाचं गाढव मारलं!

पण त्यामुळे अण्णांची अवस्था गाढवही गेलं नि ब्रह्मचर्यही गेलं अशी झाली! सरकारने वेळ काढला, विरोधी पक्षांचा आणि माध्यमांचाही वेळ बरा गेला. सगळे आपआपल्या कामात गुंतले आणि नवा गांधी कॉन्ट्रॅक्ट लेबरसारखा बेकार झाला!

एका उपोषणाने थांबेल तो (नवा) गांधी कसला? त्यांनी दिल्लीचा सिक्वल मुंबईत करायचं ठरवलं. जय्यत तयारी झाली पण ओम फट स्वाहा झालं. सिक्वल आपटला. अण्णांनी (आणखी एकदा) लिंबू पाणी पिऊन टिमसह गाशा गुंडाळला!

गांधीवादी म्हणतात ‘गांधींना मरण नाही! हे तत्त्वज्ञान नवे गांधी किसन बाबूराव यांनी अमरपट्ट्यासमान मानून आता आपल्या ७५ निमित्त ऑक्टोबरमध्ये सिक्वलचा पुढचा भाग घोषित केलाय!

ऑक्टोबरनंतर निवडणुकाच जाहीर होतील. त्यामुळे सरकार बिनघोर असेल. दिल्लीत ऑक्टोबर हिट असेल. माध्यमांना दसरा दिवाळीसाठी आयता टीआरपी मिळेल. अण्णांनी काहीतरी ७५ कलमी कार्यक्रम जाहीर केलाय. सध्याच्या बाजारपेठीय व्यवस्थेत आम्हालाही नामीसंधी वाटतेय आणि आम्ही या ‘अण्णा ३’ या भागासाठी उत्सुक असून त्याचा प्रचार करून प्रसिद्धी आणि चार पैसे मिळवायचा विचार केलाय.

अण्णांच्या मराठीमिश्रित हिंदीत ‘पिक्चर अभी शिल्लक है’ असे फलक, स्टिकर्स, टी शर्ट छापतोय. ‘मैं हू ७५’ असं लिहिलेल्या टोप्या तयार करतोय. बाल हनुमान, गणेश, सुपरमॅन, स्पायडरमॅनसारख्या अण्णांच्या प्लास्टीक, सॉफ्ट टॉईजमधल्या प्रतिकृतीही बाजारात आणतोय. भगतसिंह, विवेकानंद आणि अण्णा अशा त्रिमूर्ती विक्रीस असतील. भरत दाभोळकर आणि शायना एनसी यांच्या मदतीने गांधी वेषातल्या अण्णांचा एक रॅम्प वॉक पंचतारांकित अनुयायांसाठी केला जाईल. ‘अण्णा’ नावाने लिंबाचा नवा ब्रॅण्ड मोठ्या मॉलसह रस्त्यावरही उपलब्ध करून दिला जाईल. ‘अण्णा डाएट’ नावाचा नवा डाएट प्लान अण्णांच्या स्वाक्षरीने, अल्पदरात मिळेल. अण्णांचा मराठी हिंदी इंग्रजी शब्दकोशही तयार केला जातोय. अण्णा नेहमी जब तक है जान म्हणत आंदोलन करतात म्हणून त्यांना दोन्ही हात फैलावलेल्या शाहरुखच्या रूपात पोस्टरांकित करून तरुणांना आकर्षित केलं जाईल!

तिकडे मूळ गांधींच्या वस्तुंचा लिलाव भाव गडगडल्याने बारगळला असला तरी आम्हाला नफ्याची पूर्ण खात्रीय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *