महाराष्ट्राने यावर्षी दुष्काळ सोसला. ‘अवर्षण आणि अतिवृष्टी या गोष्टी निसर्गाच्या हातात’ असं म्हणत हातावर हात धरून न बसता काही गावात आधीच तयार करण्यात आलेली शेततळी दुष्काळात कामी आली. हे सांगण्याचं कारण म्हणजे यावर्षीच्या ‘पर्यावरण दिनाच्या’निमित्तानेदेखील साठवलेली पुंजी खरोखरच जीवनदायी ठरते असाच संदेश देण्यात आला आहे. अन्नाची नासाडी टाळण्याकरता विचार करा आणि अन्नाची वेळीच बचत करा असं सांगणारं यावर्षीचं सूत्र आहे Think – Eat – Save.

हा संदेश जागतिक पातळीवर ‘फुकट जात असलेल्या अन्नाबद्दल’ असला तरी आपल्या आरोग्याच्या बाबतीतही ही त्रिसूत्री महत्त्वाची ठरणार आहे. यातील सर्वात महत्त्वाचा ठरतो ‘विचार’ किंवा ‘Thinking’. घराघरातलं उदाहरण घ्यायचं तर ‘अन्नपूर्णा’ म्हणून कुटुंबाची देखभाल करताना जेवताना कमी पडायला नको म्हणून एक मूठ तांदूळ जास्त घेतानाच उरलेलं टाकायचं नाही! याकरता घरातली गृहिणी ते संपवते आणि या संपवासंपवीचा परिणाम पन्नाशीनंतर दिसू लागतो वाढलेल्या वजनात. Instant आहारात  Serving Size  ठरवला जातो तो व्यावसायिकांकडून किंमत वाढवताना. त्याचवेळेस १० टक्के Free मिळतं, ते बहुतकरून नंतर नकोसं होऊन ‘ओला कचरा’ वाढवतं. आज वाढत्या स्थूलतेचं प्रमाण लक्षात घेता एकीकडे एक घास कमी खा हे सांगण्याची वेळ आली आहे, तर दुसरीकडे तो एक घास गरजूंना कसा पोचेल याचा विचार करण्याचीही गरज आहे निदान आपल्या देशाला तरी. मुंबई शहरात एकीकडे Expiry Date झालेलं पॅकेज्ड फूड टाकलं जाताना दुसरीकडे कुपोषणाचं प्रमाण लक्षणीय आहे. हा विरोधाभास आरोग्याच्या दृष्टीने हितावह नाही कारण कुपोषणाने क्षयरोगासारखे आजार बळावतात आणि ते हवेतून पसरत असल्याने जंतुंचा प्रसार उंच इमारती आणि चाळी तसंच झोपड्यांतून त्याच वेगाने होतो. बहुतकरून आपण अमेरिकन संस्कृती आपलीशी करत आहोत की काय की जिथे एक बिलियन टनापर्यंत अन्न फुकट जात असताना आपल्याकडे एकीकडे काही हजार मुलं अर्धपोटी रहातात.

दूध मिळवण्यासाठी गायीला चारा आणि पाणी किती लागतं हे लक्षात घेणं आवश्यक आहे. एक लीटर दुधासाठी गाय एक हजार लीटर पाणी घेते तेव्हा दुधापासून निर्माण केलेले नाशिवंत पदार्थ किती वेळा टाकून देण्याची वेळ आपल्यावर येते याचा विचारच केलेला बरा.

खरंतर आपल्या संस्कृतीत अन्नसाठा करताना अनेक पद्धती सांगितल्या आहेत. लोणची, मुरांबे हे त्यातीलच एक उदाहरण. लिंबू, मिरच्या, कैर्या ते आवळे या सर्वातले गुण राखत वर्षभर उपयोग करता येतील अशा पद्धतीने त्यांची साठवण केली जायची. तांदूळ, गहू हेही निवडून, पाखडून वर्षाकरता पिंपामध्ये साठवून ठेवत. उरलेलं अन्न गाई-म्हशींना आंबोण म्हणून घातलं जाई. शहरीकरणामुळे हे शक्य राहिलेलं नाही. पण त्यामागची संकल्पना लक्षात घेऊन Disposable संस्कृतीचे बळी न ठरता आंब्याचा गोडवा राखत आटवलेला रस आंबा महोत्सवात घेताना कोकणच्या विकासाचं स्वप्न साकारायचा प्रयत्न करूया. आजच्या माहिती-तंत्रज्ञान आणि कम्युनिकेशनच्या युगात एका राज्यात धान्य कीड लागून फुकट जात असतानाच दुसरीकडे आपल्या देशात तरी कुपोषणाचा बळी निदान जाऊ नये ही सदिच्छा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *