लेखक म्हटलं की कुठल्याही विषयावर अक्कल पाजळायचा आयता अधिकार! लेखक तो येता-जाता अधिकृत-अनधिकृतपणे वापरत असतो. मीही लेखक आहे. आणि एकदा खाण्यापिण्याच्या माणसाच्या सवयींवर अक्कल पाजळून घेण्याची माझी इच्छा आहे.

खरं तर खाण्यापिण्यातलं मला फारसं काही कळत नाही. चवीबिवींचं ज्ञानही माझ्याकडे नाही. पण वेळप्रसंगी मी घरातला स्वयंपाक केलेला आहे. अडीअडचणींच्यावेळी घरच्यांची पोटं जमतील तशी सांभाळली आहेत. खाणंपिणं हे अवाढव्य आणि असीम शास्त्र आहे, असं आता माझं एकूण अनुभवांवरून मत झालं आहे. (अनुभव म्हणजे स्वतःचं खाणंपिणं, स्वतः स्वयंपाक करणं आणि संपादक म्हणून खाण्यापिण्याची माहिती प्रकाशित करणं.) पण त्या शास्त्रातला तज्ज्ञ मी अजिबात नाही. पण एवढ्या जगण्यात जगातल्या कोणत्या न् कोणत्या गोष्टीबद्दल आपल्याला काही ना काही मतं किंवा विचार सुचत असतात, तशीच काही मतं किंवा विचार मला जगता जगता सुचले आणि वाटलं की ते लोकांसमोर मांडावेत. अकलेचे काही तारे खुडून पाहावेत. ते किती खरे-खोटे, योग्य-अयोग्य हे लोकांनी ठरवावं.

आपण महाराष्ट्रात जन्माला आलो, तर आपण मराठी माणूस आहोत असं मी मानतो. महाराष्ट्रात जे जे घडतं, चालतं, असतं त्याला ‘मराठी’ म्हणावं असं मला वाटतं. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात जे उन्हाळे, पावसाळे, हिवाळे असतात, त्यांना मराठी वातावरण म्हणावं. मराठी उन्हाळा, मराठी पावसाळा, मराठी हिवाळा असंही म्हणावं. महाराष्ट्रात जे नद्यानाले, डोंगरदर्या, झाडंपानं, प्राणीपशू आहेत त्यांना मराठी निसर्ग म्हणावं. महाराष्ट्रातले लोक जे खातात-पितात त्याला मराठी आहार म्हणावं. महाराष्ट्रातली माणसं जे पेहेरतात त्याला मराठी कपडे म्हणावं. असं सगळ्याच गोष्टींना आपलं मराठीपण लावता येईल.

या मराठीपणाच्या मुद्यावरच मला अकलेचे दिवे खरं तर पाजळायचे आहेत आणि खास करून बोलायचं आहे ते, मराठी आहार, मराठी निसर्ग, मराठी वातावरण आणि मराठी आरोग्य यावर.

निसर्ग मूर्ख नसतो अशीही माझी एक धारणा आहे. निसर्ग त्याच्या परिसरात राहणार्या लोकांसाठी, प्राण्यांसाठी, आपल्या सगळ्या सुविधा पुरवतो. निसर्गच त्या परिसरातल्या वातावरणानुसार माणसाला विशिष्ट प्रकारचं अन्न पुरवतो. त्या वातावरणानुसारच तिथल्या माणसांचं आरोग्य सांभाळण्याचं काम करतो. निसर्ग आपल्या परिसरातल्या लोकांसाठी फार सुज्ञपणे वागतो आणि माणसाच्या आयुष्याची काळजी घेतो, असं मला वाटतं. त्यानुसार मराठी माणसासाठी मराठी निसर्ग कार्यरत असतो का? तर असतो असंच दिसेल. जगातल्या कुठल्याही भागातला निसर्ग घ्या, तो आपल्याच भागातल्या लोकांसाठी फार नेमकेपणानं राबत असतो. जशी तिथली माणसं तसाच तिथला निसर्ग किंवा याच्या उलट, जसा तिथला निसर्ग तसाच तिथला माणूस किंवा सरळ म्हणता येईल की, ज्या प्रकारच्या निसर्गात माणूस राहतो, त्या प्रकारच्या निसर्गाचे नियमच माणसानं पाळायला हवेत, तिथल्याच निसर्गानुसार त्यानं राहायला हवं, तरच तिथल्या माणसाचं आयुष्य सुखी, आरोग्यपूर्ण, आनंदी होईल. एखाद्या प्रदेशातल्या माणसानं तिथल्या निसर्गाच्या विरोधात जगण्यावागण्याचा प्रयत्न केला तर, आपल्या स्थानिक निसर्गाचं म्हणणं ऐकलं नाही तर, निसर्ग त्याची हमखास कडक शिक्षा देतो. माणसाला त्याची वाईट फळं भोगायला लावतो.

या म्हणण्यानुसार मराठी माणूस मराठी निसर्गाचे नियम पाळतो का? मराठी निसर्गाप्रमाणे वागतो का? तर मला वाटतं, फारशी मराठी माणसं मराठी निसर्गानुसार वागत नसावीत. बहुतेक जण तर मराठी निसर्गाच्या विरोधातच वागत असताना आणि त्याच्या शिक्षा भोगताना दिसतात. माझं असं मत आहे की जो माणूस स्वतःच्या प्रदेशाच्या निसर्गानुसारच जगतोवागतो तो आयुष्यभर निरोगी, ठणठणीत, आनंदी राहतो. असा माणूस दीर्घायुषीसुद्धा होत असणार. त्याला कधी गंभीर आजार होत नसणार.

आहार आणि आरोग्याचा संबंध आहेच. आहारासाठी माणसाला निरनिराळ्या वनस्पतींची गरज असते. माणूस वनस्पतींवरच जगतो. वेगवेगळ्या प्रकारे तो स्वतःच्या खाण्यापिण्यासाठी वनस्पतींचा वापर करतो. कोणत्या वातावरणात राहणार्या माणसासाठी कोणत्या वनस्पती असाव्यात, याचं निसर्गाचं नियोजन थक्क करणारं असतं. कुठलीही वनस्पती कुठंही उगवत नाही आणि कोणतीही वनस्पती कधीही उगवत नाही. तर कुठल्या वनस्पतीनं कुठं उगवावं आणि कधी उगवावं याचे निसर्गाचे नियम आहेत. कोणत्याही वनस्पतीच्या उगवण्याचा त्याच भागातल्या माणसांसाठी, प्राणिमात्रांसाठी आहार म्हणून आणि औषध म्हणूनही उपयोग व्हायला हवा, हे पथ्यही निसर्ग पाळतो. या प्रदेशात जे लोक राहतात, त्या प्रदेशातल्या लोकांनी त्याच प्रदेशातल्या वनस्पतींवर जगायला हवं, तसं ते त्याच वनस्पतींवर जगले तरच खाल्लंपिलेलं त्यांच्या अंगी लागतं, त्याचा त्यांच्या आरोग्यासाठी, शक्तीसाठी, टिकून राहण्यासाठी वापर होतो, असाही एक नियम आहे. कोणत्याही प्रदेशातली कोणतीही वनस्पती फक्त त्याच प्रदेशातल्या लोकांसाठी सर्वार्थानं उपयोगी असते. एका प्रदेशातल्या लोकांनी दुसर्या प्रदेशातली वनस्पती आणून खाणं हा मूर्खपणा, निरर्थक आणि निरुपयोगी गोष्ट आणि आरोग्याला घातक बाब आहे. म्हणजे असं की, मराठी प्रदेशातल्या लोकांनी फक्त मराठी निसर्गातल्या मराठी वनस्पतीच खाल्ल्या पाहिजेत, हे निसर्गाचं सांगणं आहे. यानं हे सांगणं मोडलं तो खलास. त्याला निरनिराळे रोग होणार, आजार होणार, खाल्लेल्यापिलेल्या वनस्पतीचा त्याला काही उपयोग नाही न् तो लवकरच मरणार.

तर तक्रार अशी आहे की, सध्याचं मराठी माणसाचं आहारशास्त्र, पाकशास्त्र चिक्कार विकृत झालेलं आहे. त्यामुळे साहजिकच औषधशास्त्रही बिघडून गेलेलं आहे आणि मराठी माणूस सुखी जगेनासा झाला आहे. त्याचं आयुष्य बर्बाद झालं आहे. यांचा मराठी प्रदेश, मराठी निसर्ग, मराठी वातावरण यांच्याशी काडीमात्र संबंध नाही, असे परप्रदेशांचे आहार, पाककला यांनी मराठी माणसावर एवढी आक्रमणं केली आहेत की, मराठी माणूस स्वतःहून आपलं आयुष्य धोक्यात आणि मरणात घालतो आहे. खाण्यापिण्याच्या बाबतीत सध्या मराठी माणूस थेट घाणेरडा नरक भोगतो आहे.

मला काही प्रश्न पडतात. उदाहरणार्थ, बटाटे आणि साबुदाणा ही पिकं पोर्तुगाली आहेत. ती आपल्याकडे येतात ही गोष्ट खरी, पण मराठी माणसांना त्यांचा काय उपयोग? मी जेवढी माहिती मिळवलीय, त्यात बटाटा आणि साबुदाणा मराठी प्रदेशातला- मराठी माणसाला अजिबातच उपयोगी नाही. उलट अनेक रोगांचं निमंत्रणच या दोन गोष्टींत आहे. मराठी माणसाची तब्येत, आरोग्य यांना बटाटा आणि साबुदाण्याचा उपयोगच नाही. ते पदार्थ खाणं निरर्थकच आहे. तर आपण ते का खातो? टमाट्यांचं गणितही असंच आहे. तेही म्हणे बाहेरनं आलेलंच उसनं पीक आहे.

चहा, कॉफी या गोष्टी मराठी निसर्गाच्या नाहीत. त्या ज्या भागात पिकतात, त्याच भागातल्या लोकांनी फक्त त्यांचा वापर करावा, हे नैसर्गिक सत्य आहे. मग आपण चहा, कॉफी या गोष्टी वापरून दिवसागणिक आपलं मराठी आयुष्य धोक्यात का आणतो? चहा- कॉफीनं होणारे रोग विकत का घेतो? कोकणात नारळ होतो, तर तो कोकणातल्या माणसालाच उपयोगी असणार. तो इतर प्रदेशातल्या लोकांनी वापरणं निरर्थकच नाही का? सह्याद्रीच्या पट्ट्यातले लोक तांदळाची, नाचणीची भाकरी करून खातात किंवा त्यांचं ते मुख्य अन्न आहे, तर त्यांच्या निसर्गानुसार ते त्यांना उपयोगी आहे. विदर्भातल्या, मराठवाड्यातल्या माणसांनी जर तांदळाच्या, नाचणीच्या भाकरी खायला सुरुवात केली तर मला वाटतं, त्यांना ते मारकच ठरेल. काश्मिरात सफरचंदं पिकतात. का? तर तिथल्या निसर्गात तिथल्या माणसानं टिकून रहायला ते फळ निश्चितच उपयोगी पडत असणार. पूरक ठरत असणार.

काश्मिरबाहेरच्या लोकांनी, जिथं सफरचंद पिकतच नाही तिथल्या लोकांनी सफरचंद खाणं हे निरर्थक, निरुपयोगी आणि आजारांना निमंत्रण देणारंच नाही का? सफरचंद खाल्ल्यानं माणसाचं सौंदर्य वाढतं, त्वचा तुकतुकीत होते, आरोग्य चांगलं राहतं वगैरे गोष्टी खर्याही असतील, पण त्या काश्मिरी माणसाच्या बाबतीत, मराठी माणसाला ते फळ निरुपयोगीच असणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *