मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात गेल्यावर्षी १० जून १०१२ ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या १३ व्या वर्धापनदिनी राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना झाली. युवतींना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा देशातील पहिलाच राजकीय पक्ष आहे. १८ ते ३५ वयोगटातील युवतींचे प्रश्न समजून घेण्यासाठी माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघात १ आणि २ मार्च २०१२ रोजी पथदर्शी युवती मेळावा घेतला होता, त्याला पाच हजार युवतींची उपस्थिती होती. त्यानंतर पाच विभागीय मेळावे आणि १० जूनच्या स्थापनेनंतर १४ जूनच्या अहमदनगर येथील मेळाव्याने या मोहिमेची सुरुवात झाली. असे ४४ जिल्हा मेळावे जून ते ऑक्टोबर या कालावधित झाले. २८ ऑक्टोबर २०१२ रोजी औरंगाबाद येथील सुवर्णमहोत्सवी ५० व्या मेळाव्याने या मेळाव्यांचा समारोप झाला. राज्यभर या मेळाव्यांच्या निमित्ताने फिरत असताना राष्ट्रवादी युवती काँग्रेसची निमंत्रक म्हणून मला युवतींशी मनमोकळा संवाद साधण्याची संधी मिळाली.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळालेल्या ५० टक्के महिला आरक्षणामुळे राजकीय व्यवस्थेची दारं महिलांना खुली झाली असली तरी युवती मात्र या प्रवाहापासून काहीशा अलिप्त असल्याचं मला जाणवत होतं. सामाजिक आणि राजकीय जाण असणार्या युवतींना एकाच मंचावर आणून त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्यांना अभिव्यक्त होण्यासाठी एक मंच उपलब्ध करून देणं मला आवश्यक वाटत होतं. यासाठीच पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना करण्यात आली. या मेळाव्यांमध्ये उपस्थित युवतींनी त्यांचे प्रश्न, त्यांच्यासमोरील आव्हानं याबद्दल खुलेपणाने माझ्याशी चर्चा केली. या सर्वच मेळाव्यांना युवतींचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. जिल्हा मेळाव्यांनाही ५-७ हजार युवती उपस्थित राहून आपले प्रश्न तळमळीने मांडत होत्या. या मेळाव्यांच्या निमित्ताने सुमारे १० ते १५ लाख युवती या वैचारिक अभिसरणातून गेल्या. स्त्रीभ्रूणहत्या, कौटुंबिक हिंसाचार, हुंडाबंदी, छेडछाड, सुरक्षित आणि वेळेवर एस.टी. प्रवास, उच्चशिक्षणातील अडथळे, स्वच्छ आणि पुरेशी स्वच्छतागृहं, मानसिक समुपदेशन यांसारख्या त्यांच्या जीवनाशी निगडित विविध मुद्दे या युवतींनीच व्यासपीठावरून मांडले. या सगळ्या मेळाव्यातून प्रश्न मांडणार्या मुली आज राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रवाहात सामील झाल्या आहेत.

राजकारणात तर यायचंय पण नेमकं करायचं काय? घरच्यांचा विरोध, मला हे जमेल का? असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन संघटनेत आलेल्या युवती आज अत्यंत आत्मविश्वासाने आपलं काम करत आहेत. छेडछाडच्या मुद्यावर युवतींनी एकत्र येऊन ‘जागर हा जाणिवांचा’ हा जीआर राज्य शासनाच्या सहकार्याने तयार केला. यात महाविद्यालयीन परिसर छेडछाडमुक्त असावा यासाठी महाविद्यालयांसाठी स्पर्धा घेण्यात आली. एस.टी.ने दररोज प्रवास करताना युवतींना येणार्या अडचणी, स्थानकावरची स्वच्छतागृहं याबद्दल राष्ट्रवादी युवती काँग्रेसने वेळोवेळी आंदोलनं करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आहे.

आज राज्यभरात युवती विविध मुद्दे घेऊन काम करत आहेत. पुणे जिल्ह्यात एस.टी. स्थानकावरील स्वच्छतागृहं स्वच्छ असावीत यासाठी युवतींनी एस.टी. महामंडळाच्या अधिकार्यांसोबत चर्चा करून तिथले प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिलं आहे, पोलिसांच्या सहकार्याने ग्रामीण भागातील युवतींना मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आलं, नाशिकमध्ये महाविद्यालयीन युवतींसाठी १० नवीन बसेस् राष्ट्रवादी युवतींच्या प्रयत्नाने उपलब्ध झाल्या, उस्मानाबादमध्ये युवतींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण देण्यात आलं, पोलीस दक्षता समितीत युवतींचा समावेश असावा यासाठी राष्ट्रवादी युवती काँग्रेसने पाठपुरावा केला आणि पोलीस दक्षता समितीत आता दोन युवतींचा समावेश असेल अशी मागणी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मान्य केली. छेडछाडसारखा संवेदनशील मुद्दा घेऊन राज्यभरातील आमच्या युवती स्थानिक पातळीवर काम करत आहेत. तसंच या युवतींना असलेली प्रशिक्षणाची गरज लक्षात घेता विभागीय आणि जिल्हा पातळीवर प्रशिक्षण शिबिरंही युवतींसाठी घेण्यात आलेली आहेत. राजकीय व्यवस्थेत काम करताना सामाजिक भान ठेवणार्या या युवती शदर पवार यांचे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र धरून काम करत आहेत.

विधायक सामाजिक कामांच्या माध्यमातून उद्याचं सक्षम युवती नेतृत्व तयार करून या युवतींच्या पंखात भरारी निर्माण करण्याचा वसा राष्ट्रवादी युवती काँग्रेसने घेतला आहे. शरद पवार यांच्या मार्गदर्शनासोबत प्रदेशाध्यक्ष मधुकरराव पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांचं मार्गदर्शन युवतींना आज लाभत आहे. ग्रामीण असो वा शहरी आज आमची राष्ट्रवादी युवती निर्धास्तपणे या राजकीय व्यवस्थेत सामील होऊन युवतींना संघटित करून त्यांचे प्रश्न, समस्या सोडवण्यासाठी काम करत आहे. आज अशा राजकीय प्रक्रियेतून आलेल्या युवती सत्तेत सहभागी झाल्या तर तळागाळाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. या युवतींचा प्रवास आता तर कुठे सुरू झालाय…

अजून बराच पल्ला त्यांना गाठायचा असला तरी आश्वासक आणि दमदार सुरुवात करत या युवती त्यांची वाटचाल करतायत याचा मला निश्चितच आनंद आहे.

– सुप्रिया सुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *