राजकारणात सर्व काही शक्य आहे. मान्य आहे. आजचा मित्र उद्या शत्रू आणि कालचा शत्रू आज मित्र होऊ शकतो. हेही कबूल आहे. अरे, पण मग सरळ सरळ राजकारण करा ना. धर्मनिरपेक्षता आणि पुरोगामित्वाच्या बाता कशाला मारता? असे पोकळ युक्तिवाद करून तुम्ही आम्हा भारतीय जनतेला मूर्ख समजताय. जनता दल (सं) पक्ष, या पक्षाचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या असलाच भंपकपणा करतायत. सतरा वर्षं भाजपबरोबर राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत संसार केल्यानंतर, एक नरेंद्र मोदी भाजपचे लोकसभा निवडणुकीसाठी प्रचारप्रमुख काय झाले, नितीश कुमार यांनी थेट काडीमोड घेतला. त्यामागील संदर्भांकडे आपण जाऊच पण त्यापूर्वी हा निर्णय जदयुतील नितीश गटाचाच कसा होता तेही पाहावं लागेल. खरं तर या पक्षाचे अध्यक्ष शरद यादव हे काही भाजप म्हणजेच एनडीएशी संबंध तोडण्याच्या मताचे शेवटपर्यंत वाटले नाहीत. जदयुचे नितीशकुमारांसह अनेक नेते जेव्हा निर्वाणीची भाषा करत होते तेव्हा एकटे शदर यादव सबुरीने घेत होते. जदयुने म्हणजेच नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय हा जदयु अंतर्गत नितीश कुमार यांची एकाधिकारशाही कशी प्रस्थापित झालीय याचंही उदाहरण ठरावं. एका अर्थाने नितीश कुमार हे जदयुचे नरेंद्र मोदी बनलेत. त्या अर्थाने पुरोगामीपणाचेच ढोल बडवायचे तर हिटलरच्या पार्टीच्या नावातही समाजवाद होता आणि स्टॅलिन तर साम्यवादी प्रजासत्ताकाचा एकाधिकारशहा होता. (चर्मकार समाजातून आलेला स्टॅलिन सोव्हिएत रशियाचा प्रमुख झाल्याचं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना कौतुक होतं. असं माझ्या वाचनात आहे. चूकभूल द्यावी-घ्यावी. पण, हे खरं असेल तर केवळ मागास समाजातून आलेले नेते पुरोगामीच असतात हा भ्रम स्टॅलिन, मोदी, नितीश यांच्यामुळे दूर होण्यास मदत होऊ शकते.) सांगायचा मुद्दा असा की, ते पुरोगामीपणा वगैरे सोडा पण पार्टीवर एकाधिकारशाही स्थापन करून पुढे आपल्यापेक्षा मोठ्या एनडीएनेही आपल्यालाच सर्वोच्च नेता म्हटलं पाहिजे आणि पंतप्रधानही आपल्यालाच बनवलं पाहिजे अशी मनीषा बाळगणारे नितीश कुमार तितकेच हुकूमशाहीवाले आहेत जितके नरेंद्र मोदी.

आता जरा पुरोगामीपणा, धर्मनिरपेक्षता वगैरे भानगडींकडे वळू. हो, या गोष्टींना भारतात भानगडीच मानलं पाहिजे असं मी मानतो. कारण, या गोष्टींची नावं घेऊन जी काही लफडी आपले पुरोगामी पक्ष आणि नेते करतात, ते सारा देश जाणून आहे.

नितीश कुमार आणि त्यांच्या जदयुने एनडीएशी आपली युती तोडण्यासाठी दोन प्रमुख कारणं दिली. एक, नरेंद्र मोदी यांना भाजपने प्रचारप्रमुखपदी बसवल्याने ते पंतप्रधानपदाचा उमेदवार आणि एनडीएचेही जवळपास सर्वोच्च नेते ठरलेत आणि दुसरं म्हणजे अडवाणींसारख्या संयमी, सर्वसमावेशक चेहर्याला मागे सारून मोदींना पुढे आणल्याने एनडीएच्या प्रतिमेला तडा गेलाय. तसंच आता एनडीएसोबत काम करणं आपल्याला शक्य होणार नाही. यातल्या पहिल्या कारणाकडे बघुयात. कोणत्याही राष्ट्रीय पक्षाला देशावर आपलं सरकार आणण्याची महत्त्वाकांक्षा असते. तेच त्याच्या अस्तित्वाचं कारण असतं. अशा पक्षात काम करून दाखवणार्या व्यक्तिला साहजिकच पक्षाच्या प्रत्येक पातळीवरील वरिष्ठ पद मिळण्याची साधार अपेक्षा असते. त्या व्यक्तिचं वरिष्ठ होत जाणं वरून लादलेलं नसल्यास अशा व्यक्तिला पक्षांतर्गत विरोध नसतो. उलट असलाच तर मोठा पाठिंबाच असतो आणि थोडाफार विरोध हा क्षीण आणि असंतुष्ट गटाचा असतो. जे स्वाभाविक आहे. नरेंद्र मोदी या केसमधले नेते आहेत. अशा परिस्थितीत नितीश कुमारांची (इथे हे लक्षात घेऊयात की नितीश हे एकट्या बिहारमधल्या बहुमत नसलेल्या पक्षाचे नेते आहेत) अशी अपेक्षा का असावी की त्यांचं ऐकून भाजपने मोदींना पुढे आणू नये? त्याचं सोडा, खुद्द भाजपमध्येच मोदींशिवाय दुसर्या कुणाचं नेतृत्व मानायला पार्टी केडर तयार नाही. लोकशाही मानणार्या कुठल्याही पक्षाने पक्षांतर्गत लोकशाहीमधून पुढे आलेला हा कौल मान्य करायलाच हवा. इथे खरी मेख ही आहे की, मोदींच्या अखिल भारतीय करिष्म्याचा धसका नितीशना दोन कारणांसाठी वाटतो. एक म्हणजे मोदी पंतप्रधानपदाचे स्वाभाविक उमेदवार बनतील आणि त्यांच्या प्रतिमेमुळे राजदची मुस्लीम व्होट बँक काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल म्हणजेच लालूंकडे वळू शकेल. आणखी एक कारण आहे. मोदी हे अतिमागास वर्गातून ज्याला ईबीसी म्हणतात त्यातून आलेले नेते आहेत. मोदींचा उदय हा सर्व पक्षातील आणि जनतेतील ओबीसी-ईबीसी गटालाही संदेश देणारा आहे. यातून खुद्द बिहारमध्येच ओबीसी, महादलित, सवर्ण मतं भाजपकडे वळू शकतात. मग, किमान आहे ती मुस्लीम व्होट बँक तरी का सोडा? असा व्यवहारी विचार नितीश कुमारांनी केलाच नसेल असं नाही. दुसर्या कारणाचं विश्लेषण तर अधिक मनोरंजक आहे. नितीश कुमार एकप्रकारे सरळ सरळ म्हणतायत की, वाजपेयी-अडवाणीवाली भाजप पुरोगामी-धर्मनिरपेक्ष आणि मोदीवाली भाजप जातीयवादी-प्रतिगामी-धर्मांध. वा रे नितीशराव! ज्या भाजपच्या वाजपेयी-अडवाणी जोडगोळीने मंडलवादी राजकारणाला (आरक्षण) छेद देण्यासाठी आणि धर्माधारित जातीय ऐक्य साधत मुस्लिमांना लक्ष्य करण्यासाठी राममंदिर आंदोलन उभारलं आणि बाबरी पाडायला लावली, ज्यामुळे पुढे भारतीय समाजात हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण झाली,

ज्याचाच परिणाम गोध्रा ट्रेन जळीतकांड आणि पुढील हिंसाचारात झाला तो भाजप आणि ते वाजपेयी-अडवाणी पुरोगामी? धर्मनिरपेक्ष? जे अडवाणी पक्षातीलच नेतृत्वाच्या कौलाला आपल्या राजीनाम्याने आव्हान देतात ते सर्वसमावेशक? हा नितीश यांचा कुठला बिहारी नुस्खा आहे ते त्यांनाच माहीत.

मला नितीश यांच्यापेक्षा त्या सर्व पक्षांबाबत हसायला येतं जे नितीश यांना आता धर्मनिरपेक्ष बाजूला आल्याचे मानतायत. बरं या धर्मनिरपेक्ष- पुरोगामीवाल्यांसाठी मानूयात आपण नितीश कुमारांनाही ध.पु.! आता सांगा जे भाजपसोबत कधीच गेले नाहीत ते डावे पक्ष, लालू आणि काँग्रेस यांचा ध.पु.पणा आणि नितीश कुमारांचा ध.पु.पणा एकाच लेव्हलचा मानायचा का? जनता सरकारचा प्रयोग त्या काळाचे संदर्भ पाहता अपवाद लक्षात घेऊन सोडून द्या. पण, असं मानायचं का की, एखादा नॉन भाजप-संघवाला पक्ष (एमआयएम वगैरेही धरा हवं तर) ज्याला सेक्युलर म्हणता येईल तो भले कितीही वर्षं या उजव्यांसोबत राहिला असेल, त्याने कधीही उजव्या पक्षांची साथ सोडली तरी तो तत्क्षणी ध.पु,. बनतो? बरं, जेव्हा असा ध.पु. पक्ष उजव्या पक्षांसोबत असतो तेव्हा ते उजवे पक्ष ध.पु.वाले ठरतात का? (जदयुला अडवाणींची भाजप चालते याचा अर्थ असाच होतो) एकूणच पुरोगामी, धर्मनिरपेक्ष या मूल्यांची इतकी घसरण धक्कादायक आहे. तेव्हा प्रश्न नितीश-जदयुच्या म्हातारी मेल्याच्या दुःखाचा नव्हे, तर धर्मनिरपेक्ष-पुरोगामीपणाच्या हस्तांतरणीय परवान्याचा काळ सोकावण्याचा आहे…

– प्रसन्न जोशी

(लेखक ‘एबीपी माझा’ या वाहिनीचे असो. सिनिअर प्रोड्युसर-अँकर आहेत)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *