‘एपिडेमिक’ या शब्दाचा अर्थ समाजात पसरलेला साथीचा रोग. मूळ शब्द लॅटिन भाषेतील आहे. जागतिक आरोग्य संघटना विशिष्ट रोगाची लागण जगातील एखाद्या समाजात/देशात विशिष्ट प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पसरली असेल तर अशा रोगाची साथ पसरली आहे असं घोषित करते. तसंच असा रोग लवकरात लवकर आटोक्यात यावा, इतर भागात पसरू नये यासाठी औषधं आणि इतर उपाययोजनांसाठी मार्गदर्शन करते. उदाहरणार्थ, तीन-चार वर्षांपूर्वी ‘स्वाईन फ्ल्यू’ या एकाप्रकारच्या तापाची साथ जगभरात पसरत आहे असं जागतिक आरोग्य संघटनेने घोषित केलं. त्याचबरोबर स्वाईन फ्ल्यूची साथ कोणकोणत्या देशांत पसरेल, किती काळात पसरेल, त्यावर परिणामकारक औषधं कोणती यासाठी जगभरातील विविध देशांना मार्गदर्शन केलं.

अशाच पद्धतीने प्लेग, टॉइफाईड किंवा अन्य रोगांची साथ पसरली असेल तर हे साथीचे रोग वेळीच आटोक्यात येतात. अनेकांचे प्राण वाचतात. किमानपक्षी साथीच्या रोगाला बळी पडणार्यांची संख्या कमी होते.

विकसित झालेल्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हे शक्य झालं आहे. अगदी अविकसित, मागासलेल्या देशातील रोगाची माहिती वेगाने गोळा केली जाऊ शकते. हा मोठाच फायदा!

तर अशाच प्रकारच्या एका गंभीर साथीच्या रोगाचा अहवाल २० जून रोजी जागतिक आरोग्य संघटनेने प्रसिद्ध केलेला आहे. मात्र त्या साथीच्या रोगाची दखल भारतात फारशी घेतली गेलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार ‘जगातील एकूण स्त्रियांपैकी ३० टक्के स्त्रिया शारीरिक हिंसा किंवा लैंगिक हिंसाचाराच्या बळी ठरत आहेत. एखाद्या अन्य साथीच्या रोगापेक्षाही हे प्रमाण अधिक आहे. हे अत्यंत चिंताजनक आहे.’

‘मोठ्या प्रमाणात स्त्रियांना आपल्या कुटुंबातील पुरुषांकडून नियमितपणे होणार्या शारीरिक हल्ल्यांना आणि मानसिक छळवणुकीला तोंड द्यावं लागतं. वडील, भाऊ, नवरे आणि मित्रांकडून हे हल्ले होतात. यामुळे स्त्रियांना हाडं मोडणं, जखम होणं, गर्भधारणेतील गुंतागुंत, नैराश्य आणि अन्य मानसिक आजार अशा आजारपणाला तोंड द्यावं लागतं.’

जागतिक आरोग्य संघटनेच्या या अहवालाच्या लेखिका चार्लोटी वॅटस् या स्वतः आरोग्यधोरण तज्ज्ञ असून लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन या संस्थेत कार्यरत आहेत. हा अहवाल प्रसिद्ध केल्यावर त्यांची रॉयटर या वृत्तसंस्थेने मुलाखत प्रसिद्ध केली आहे. या मुलाखतीत त्यांनी एक धक्कादायक फोटो दाखवला. या फोटोत जागतिक किर्तीची शेफ निगेला लॉसनच्या नवर्याने, सात्चीने तिचा गळा आवळल्याचे दिसत होते. ‘एका प्रथितयश प्रतिष्ठित स्त्रिची कुटुंबात ही अवस्था असेल तर सामान्य स्त्रियांची काय कथा?’ असा प्रश्न विचारून चार्लोटी वॅटस् म्हणतात, ‘कुटुंबांतर्गत हिंसेच्या बळी केवळ गरीब कुटुंबातील स्त्रिया ठरतात किंवा मागास देशातच आढळतात असं अजिबात नाही तर जगातील सर्व देशातील, सर्व समाजातील सर्व स्तरात असं घडतं हे लक्षात घ्यायला हवं. हिंसाचाराच्या बळी ठरणार्या स्त्रिया हे एक जागतिक वास्तव आहे.’

हा अहवाल वॉटस् आणि क्लॉडिया ग्रासिया-मोरेनो या दोघींनी तयार केला आहे. त्यानुसार जगात होणार्या स्त्रियांच्या एकूण खुनांपैकी ३८ टक्के खून त्यांच्या नवर्यांनी केलेले असतात. तर जखमी होणार्या स्त्रियांपैकी ४२ टक्के स्त्रिया आपल्या नवर्यांच्या किंवा जीवनसाथींच्या हिंसाचाराच्या बळी असतात. दिल्लीतील १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या बलात्कार आणि खुनाची घटना आणि त्यानंतर उसळलेला जनक्षोभाची दखल घेऊन क्लॉडिया ग्रासिया-मोरेनो म्हणतात ‘अशा घटना आणि त्याविरुद्ध होणार्या आंदोलनामुळे स्त्रियांच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधलं जातं. लोकांच्या जाणिवा वाढतात हे खरं आहे. परंतु एक गोष्ट विसरली जाते की जगभरात सतत, रोज सर्व स्तरातील स्त्रियांना शारीरिक हिंसाचार, बलात्कार, छळ यांना तोंड द्यावं लागतं. स्त्रियांचं जगणं हे भीती आणि संकटाच्या छायेत आहे.’

जागतिक आरोग्य संघटनेच्या डायरेक्टर जनरल मार्गारेट चॅन यांनी प्रसिद्ध केलेल्या या विषयावरील निवेदनात असं म्हटलं आहे, ‘या अहवालाने एक सिद्ध केलं आहे की, स्त्रियांविरुद्ध हिंसेचं प्रमाण हे एका साथीच्या रोगाच्या प्रमाणात आहे.’ याचा अर्थ हा एक सामाजिक रोग आहे, सामाजिक विकृती आहे. समाजातील ५० टक्के घटक (म्हणजे पुरुष) या विकृतीचा रोगी आहे. पण या विकृतीचा बळी समाजातील उर्वरित ५० टक्के घटक (स्त्रिया) ठरतात.

जागतिक आरोग्य संघटनेचा हा अहवाल समस्त पुरुषांना लाजिरवाणा ठरणारा आहे. याची नोंद पुरुषांनी घ्यायला हवी! असा हिंसाचार रोखण्यासाठी आम्ही काय करणार हा प्रश्न-पुरुषांसाठी!!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *