पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री आणि प्रतिथयश डॉ. बिंधन चंद्रा रॉय यांच्यास्मृती प्रित्यर्थ १ जुलै हा दिवस दरवर्षी भारतभर ‘राष्ट्रीय डॉक्टर दिन’ म्हणून साजरा केला जातो. डॉ.बी.सी.रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ साली  झाला तर मृत्यू १ जुलै १९११ साली झाला. समाजसेवा आणि रुग्णसेवा अत्यंत समर्पक भावनेने केल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देऊन गौरवलंय. अशा या आदर्श व्यक्तीचं, तिच्या कार्याचं स्मरण रहावं, त्यातून जनतेला, डॉक्टरांना प्रेरणा मिळण्यासाठी १ जुलै हा ‘नॅशनल डॉक्टर्स डे’ म्हणून पाळण्यात येतो. या दिनाच्यानिमित्ताने रुग्ण आणि डॉक्टर यांच्यातील बदलत्या संबंधांबद्दलचा हा लेख…

 

काही वर्षांपासून डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध वेगवेगळ्या कारणांनी बिघडले जात असल्याचं चित्र पहावयास मिळत आहे. डॉक्टरांविषयी आणि त्यांच्या वैद्यक उपचारांबद्दल उलट-सुलट चर्चा होत आहे. डॉक्टर नीट ऐकूनच घेत नाहीत, व्यवस्थित बोलतच नाहीत, खेकसतात, व्यवस्थित तपासतच नाहीत, अशी बरीच विधानं रुग्णांचे नातेवाईक डॉक्टरांबद्दल करू लागले आहेत.

आपल्या मनोशारीरिक समस्यांच्या सोडवणुकीसाठी डॉक्टरांनी मनापासून प्रयत्न करावेत आणि त्यात त्यांनी यशस्वी‘च’ व्हावं अशी रुग्णांची अपेक्षा असते आणि ती रास्तही आहे. पण डॉक्टर हा सुद्धा माणूस आहे आणि मानवी प्रयत्नांना मर्यादा आहेत. त्यामुळे रुग्णाच्या प्रत्येक समस्यांचं, रोगाचं निदान डॉक्टरांना होईल, प्रत्येकवेळी सांगितल्यानुसार आजारमुक्ती, मरणमुक्ती मिळेल असं नसतं. कारण वैद्यकशास्त्र हे संख्याशास्त्रासारखं नाहीय. डॉक्टरांच्या प्रयत्नांच्या पराकाष्ठेलासुद्धा कधीकधी अपयश येऊन रुग्ण वाचू शकत नाही. अशा अनपेक्षित प्रसंगी दोष हा डॉक्टरांचा नसून मूळ आजारच मरण ओढवून आणण्याइतपत गंभीर होता, ही सदसद्विवेकबुद्धी जोपासणं योग्य असतं. अशावेळी खरं तर जनतेने हे लक्षात घेणं आवश्यक असतं की कोणत्याही प्रकारच्या रुग्णावर उपचार करताना सर्व खबरदारी घेऊनही डॉक्टरांची काहीही चूक नसताना अचानक गुंतागुंत होऊ शकते, अनपेक्षित असलेला त्रास उद्भवू शकतो आणि ते कोणाच्याच हातात नसतं. पण असं काही अघटित झालं तर मात्र ‘बिचारा’ डॉक्टर, हॉस्पिटलची निर्जीव इमारत बळीचा बकरा ठरतात. तसं म्हटलं तर डॉक्टरची चूक होत नाही असंही नाही. रुग्णावरील उपचारात हलगर्जीपणा होऊ शकतो, रुग्ण दगावू शकतो. अशा अकल्पित प्रसंगी योग्य उपचार मिळाले नाहीत असं वाटल्यास कोर्ट आहेत, मेडिकल काऊन्सिल आहे, कंझ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट आहे. त्यामध्ये तक्रार करता येते आणि डॉक्टर चुकले असतील तर त्यांना शिक्षाही देता येते. नुकसानभरपाई मिळू शकते. पण शिक्षा देण्याचा बडगा पेशंट किंवा गावगुंड-टग्यांनी, पुढार्यांनी हातात घेणं निश्चितच कायदेशीर नाही. त्यामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील नाजूक संबंधांना गालबोट लागतं.

अपघातामुळे, भाजल्यामुळे, सर्प-विषबाधासारख्या गोष्टींनी रुग्ण गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला तर त्या डॉक्टरांना मृत रुग्णाच्या परिचित पुढार्यांच्या धमक्या येणं, स्थानिक वर्तमानपत्रांना, टीव्ही चॅनेलना हाताशी धरून डॉक्टरची बदनामी करून पैसे उकळणं असे प्रकार सर्रास घडतात.

वास्तविक पाहता कोणत्याही औषधोपचाराला मिळणारा प्रतिसाद आणि त्यातून रुग्ण बरा होणं हे रुग्णाचं वय, आजाराचं स्वरूप, रुग्णाची मनोशारीरिक रोगप्रतिकारकशक्ती, पथ्यापथ्य यासारख्या बाबींवर अवलंबून असतं. बर्याच आजारांची कारणं आजही प्रगतशील वैद्यक जगताला माहीत नाहीत. अशावेळी अमूकअमूक शक्यता (हायपोथिसिस) असू शकतात असं भाकीत करून उपचार प्रणाली कार्यरत ठेवावी लागते. उपचारांना मिळणारं यश हे रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती, वय, मनाची इच्छाशक्ती, वेळ, औषधांची उपलब्धता अशा बाबींवर अवलंबून असतं. मुळात वैद्यकशास्त्र उपचार करतं ते ‘मानवी शरीर’ नावाच्या यंत्रावर… आणि हे यंत्र आहे मानवाला पूर्णपणे न समजलेलं. त्यातून प्रत्येकाच्या शरीराची, मनाची कथा-व्यथा, अपेक्षा वेगवेगळी, उपचाराला मिळणारा प्रतिसाद निरनिराळा. त्यामुळेच हा व्यवसाय (?) बनला जगावेगळा (!)

खरं तर डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, कसब पणाला लावूनही एखादा रुग्ण दगावतो अशा प्रसंगी डॉक्टरांनाही दुःख होत असतं. तसं तर कोणताच माणूस अमरपट्टा बांधून जन्माला आलेला नसतो. आणि उपचार करणार्या डॉक्टरांनी वैद्यकीय शिक्षण जरी मृत शरीरावर घेतलेलं असलं तरी उपचार मात्र जिवंत शरीरावरच करावे लागत असतात, याचं भान लोकांनी ठेवणं जरुरी असतं.

पूर्वी डॉक्टरांना प्रचंड मान मिळत होता. पण हल्ली ‘गरज सरो नि वैद्य मरो’ ही कृतघ्नवृत्ती वाढीस लागलीय. त्यामुळे रुग्ण बरा झाला तरीसुद्धा त्याचं श्रेय डॉक्टरांना न देता उलटपक्षी दवाखान्यात स्वच्छता-व्यवस्थाच ठीक नव्हती, गरज नसताना भरमसाट तपासण्याच केल्या, बिलच बक्कळ केलं, असे कोणते ना कोणते दोषारोप केले जातात. रुग्णावर उपचार करताना ‘कितीही पैसे लागू दे पण पेशंट बरा झाला पाहिजे,’ असं म्हणणारे नातेवाईक उपचारांनंतर मृत्युच्या दाढेतून रुग्ण बाहेर आल्यावर मात्र, ‘एवढं बिल कसं?’ म्हणून डॉक्टरसोबत हुज्जत घालतात. परिणामी उपचारांतही व्यवहाराने प्रवेश केला. यातूनच मग १९९५ सालापासून डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यात ‘ग्राहक संरक्षण कायद्याने’ रितसर प्रवेश केला आणि रुग्ण हा डॉक्टरांचा ग्राहक झाला तर डॉक्टर हा वैद्यकीय सेवा देणारा विक्रेता. या कायद्यामुळे झालं काय, तर डॉक्टरवर पूर्ण विश्वास टाकून आदर देणारा रुग्ण, नातेवाईक जर काही विपरीत झालं-घडलं तर कसा वागेल? झाल्या घटनेचं खापर माझ्यावर फोडून मला कोर्टात खेचेल की मनसोक्त धुलाई करेल? असे भीतीदायक प्रश्न डॉक्टरांना पडू लागलेत. बदनामीची भीती, दवाखान्याचं नुकसान अशा कारणांमुळे डॉक्टरही मग जोखीम घेऊन उपचार करण्याऐवजी हात राखूनच ट्रीटमेंट देऊ लागलेत. परिणामी हा कायदा ग्राहकांचं संरक्षण करतोय की डॉक्टरांचं असा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न वैद्यक व्यावसायिकांत निर्माण झालाय.

आता थोडं डॉक्टरांकडे वळू… रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांनीही प्रत्येक वेळी कोण चुकतं आणि कोण चुकला याचा विचार न करता हा माझा रुग्ण आहे, तो बरा होण्यासाठी मी माझं कौशल्यपणाला लावेन असा सुनिर्धार करायला हवा. तसंच कौशल्याला करुणेची जोड दिली आणि रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनीही डॉक्टरांच्या प्रती सद्भावना जोपासली तर डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील गैरसमजांचा पूर ओसरेल. डॉक्टरांकडे वेगवेगळ्या थरातून रुग्ण येत असतात. त्यामुळे रुग्णांच्या वैचारिक बैठकीची जाणीव समजून घेणं महत्त्वाचं असतं. पुस्तकी ज्ञानाबरोबरच रुग्णांकडे त्याच्या आजारासोबतच त्याचा सामाजिक, आर्थिक, वैचारिक, भावनिक स्तर लक्षात घेऊन सर्वंकषदृष्टीने बघणं जरुरीचं असतं. आपल्याकडे येणारा रुग्ण हा आपला याचक नसून तो आपला ‘अन्नदाता’ आहे. तसंच वैद्यकीय व्यवसायात नाव कमवण्यासाठीच्या निर्विवाद बाबतीत नैतिकता फार महत्त्वाची असते. रुग्णांसोबत आजारांबद्दल बोलायला योग्य तेवढाही वेळ नाही, जमत नाही हे डॉक्टर मंडळीचंही चुकीचं आहे. कारण आजार्यांचं अस्तित्व हेच उपचार्यांच्याही अस्तित्वाचं कारण असतं. उपचाराप्रित्यर्थ येणारा रुग्ण हा डॉक्टरांच्या कामात खोळंबा घालणारा नसून तोच तुमचा ‘पोषणकर्ता’ आहे याचं उचित भान डॉक्टरांनी ठेवावं. त्यांना हिडीस-फिडीस करून दुर्लक्षित करणं, त्यांच्या भावभावनांचा योग्य तो आदर न राखणं, तो आपल्यापेक्षा खूपच कनिष्ठ आहे असा दुराभिमान ठेवून त्याच्यासोबत पेशाला अशोभनीय वर्तन करत राहणं हे डॉक्टरांनाही अशोभनीय आहे. यासाठी रुग्णाला तनमनारोग्य देऊन आपलं धनारोग्य सुधारण्यासोबतच डॉक्टरांनी स्वआयुष्याकडे बघताना आपले विचार, भावना आणि कृतीकडे तटस्थपणे पाहून स्वतःचं आयुष्य, उत्साह, जगण्याचं सामार्थ्य प्राप्त करायला हवं.

वैद्यकशास्त्रात रोज नवनवीन शोध लागताहेत. म्हणून डॉक्टरांनी नव्याने होणारं संशोधन, उपचारपद्धती जाणून घेऊन त्याचा प्रत्यक्ष रुग्णोपचारात वापर करणं अगत्याचं असतं. आजमितीला अॅलोपॅथिक, आयुर्वेदिकसारख्या अनेकानेक वैद्यक शाखांद्वारे उपचार केले जाताहेत. मात्र यापैकी कोणतीच शाखा पूर्णत्वाला पावलेली नसल्याने एका वैद्यक शाखेतील तज्ज्ञाने दुसर्या शाखांना कमी लेखू नये. त्यापेक्षा इतर शाखेतील विचारांचं शास्त्रोक्त अध्ययन करून चांगल्या गोष्टींचा स्वीकार करून रुग्णहितासाठी त्याचा वापर करणं केव्हाही उचित ठरू शकतं. केवळ एकाच शाखेचं शिक्षण घेणारा डॉक्टर योग्य निदान करूशकत नाही. त्यामुळे डॉक्टरांनी उपचारांची अधिकाधिक संलग्न शास्त्रं शिकणं जरुरी असतं. वैद्यकीय क्षेत्रावर होणारं नवनवीन तंत्रज्ञानाचं अतिक्रमण, दिवसेंदिवस कमी होत चाललेली बहुज्ञ चिकित्सकांची (जनरल प्रॅक्टिशनर) संख्या आणि वाढतच चाललेली विशेषज्ञ चिकित्सकांची (स्पेशालिस्ट) संख्या याच्या दुष्परिणामी रुग्णात्मक (पेशंट ओरिएंटेड) होणारे संपूर्ण उपचार आजारात्मक (डिसीज ओरिएंटेड) झाले. त्यामुळे समन्वयक दृष्टिकोन जाऊन मानसिक, सामाजिक, कौटुंबिक रोगकारणं वैद्यकीय क्षेत्रातून हद्दपार होत गेली. त्यामुळे हल्लीचा रुग्ण आताच्या डॉक्टरांना आजार होण्याची कौटुंबिक, आर्थिक, सामाजिक कारणं सांगण्याऐवजी केवळ स्वतःला होणार्या त्रासाची माहिती सांगू लागला. परिणामी उपचारात कोरडेपणा येत गेला. अनेक विषयांचे तज्ज्ञ, हुशार, स्पेशालिस्ट, सुपर स्पेशालिस्ट डॉक्टर निर्माण होणं हे वैद्यकक्षेत्राच्या प्रगतीचं लक्षण असलं तरीही त्यांच्या अनाठायी, गैरवापरांमुळे आरोग्यसेवेचा प्रवास मात्र अधोगतीच्या दिशेने होऊ लागला. पेशंट-नातेवाईकांनी डॉक्टरांनी सांगितलेल्या सर्व बाबी समजून घेऊन उपचाराअगोदरच खर्चाची, संभाव्य धोक्यांची तयारी ठेवायला हवी. खरंतर नावाजलेला डॉक्टर होणं ही एक जशी कला आहे त्याचप्रमाणे जागरूक, चांगला रुग्ण होणं ही सुद्धा एक कलाच होय.

उपचारादरम्यान गैरसमज होऊ नये म्हणून डॉक्टरांनी रुग्णांच्या नातेवाईकांना आजारांची पूर्ण कल्पना, कराव्या लागणार्या तपासण्या, उपचारांचा संभाव्य कालावधी आणि खर्च, अचानकपणे उद्भवणारे धोके अशा बाबींची कल्पना त्यांना समजेल अशा भाषेत सांगणं महत्त्वाचं असतं. आर्थिकदृष्ट्या गरीब रुग्णांना एखाद्या सेवाभावी ट्रस्टच्या रुग्णालयात वा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यासाठी सुचवून स्वतःच्या ओळखीद्वारे जरूर ती मदत करावी. आर्थिक पातळीवर सर्वच रुग्णांना एकाच तराजूत न तोलता प्रामाणिकपणे आपली भूमिका, कर्तव्यं पार पाडल्यास डॉक्टर मंडळी पूर्वीचा आदर, सन्मान निश्चितपणे परत मिळवू शकतील. असे न झाल्यास आजार, तपासण्या, उपचार, फी या चक्राने रुग्ण आणखीनच बेजार होऊन त्याला आर्थिक आणि नर्व्हस (मानसिक) असे दोन्ही ब्रेकडाऊन्स येऊ शकतात. परिणामी रुग्णालयं ही आर्थिक शोषण करणार्या ‘छळछावण्या’ वाटू लागतात.

– डॉ. सचिन गुरव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *