ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न शहरातील मेट्रो रेल्वेसमोर एक नेहमीचं, अत्यंत कंटाळवाणं पण आवश्यक काम असतं. ते म्हणजे त्यांच्या प्रवाशांना सावधगिरीचे इशारे देणं. ‘फलाटापासून दूर उभं राहा’, ‘रेल्वे क्रॉसिंग बंद असताना ते ओलांडायचा प्रयत्न करू नका’, ‘रूळ पायी ओलांडायचा प्रयत्न करू नका’, इत्यादी गोष्टी जाहिरातींच्या, पोस्टर्सच्या माध्यमातून सांगणं त्यांच्यासाठी अनिवार्य आहे. गेल्या वर्षापर्यंत अत्यंत सुमार दर्जाच्या जाहिराती करण्यात त्यांनी समाधान मानलं होतं आणि त्याच त्याच जाहिराती पहायची प्रवाशांनादेखील सवयच झाली होती. या प्रकारच्या जाहिराती जितक्या पाहिल्या जातात तितक्याच दुर्लक्षित ठरतात. जगभरात अशा स्वरूपाच्या जाहिरात करणारे आणि पाहणारे दोघंही त्या संदेशांबाबत आणि त्यांच्या परिणामकारकतेबद्दल उदासीन असल्याचं नेहमीच जाणवतं. मेलबर्न मेट्रो सांगायचं काम करत होतं. पण रेल्वे दुर्घटनांची टक्केवारी काही कमी होत नव्हती. अशा परिस्थितीत त्यांनी मककॅन या त्यांच्या जाहिरातसंस्थेला एक नवीन परिणामकारक जाहिरात तयार करायला सांगितलं. जॉन मेसकॅल या कल्पकता दिग्दर्शकाने या जाहिरात – प्रश्नाकडे एक आव्हान म्हणून पहायचं ठरवलं. सावधगिरीचे संदेश लोकांनी लक्ष देऊन पाहावे यासाठी काय काय करता येईल त्याची शोधाशोध सुरू झाली. रेल्वेच्या या इशार्यांकडे दुर्लक्ष केलं तर मृत्यू अटळ आहे हे प्रवाशांना सांगायचं तर नेहमी भयाचा वापर केला जातो. पण त्याचा किती उपयोग होतो हा वादाचा मुद्दा आहे. (आपल्या रेल्वे स्टेशनवर लावलेल्या गंभीर शब्दात ‘चेतावणी’ देणार्या फलकाच्या चक्क समोरून अनेकजण रूळ ओलांडताना दिसतात) अशा फलकांवर प्रसंगी अपघात मृत्युहून भयंकर ठरू शकतात इत्यादी मोलाचे शब्द देखील वापरले जातात, पण त्याचाही उपयोग (अजूनही शंभर टक्के साक्षरता नसलेल्या आपल्या देशात) होताना दिसत नाही.

जाहिरातींची धून जशी लोकप्रिय होते, कार्टूनमधील गोंडस पात्रं जशी सर्वांना आवडतात तसाच हा सावधानतेचा संदेश सर्वांच्या मनामध्ये घर करू शकला तर? जॉन मेसकॅलने या दिशेने प्रयत्न सुरू केले. स्वतःवर मृत्यू ओढवून घेणं हा निव्वळ मूर्खपणा आहे. याच मूर्खपणाबद्दल एक मनोरंजक जाहिरात करायचं ठरलं. या जाहिरातीचं आणि त्या जाहिरातीतल्या गाण्याचं शीर्षक होतं ‘डंब वेज टू डाय’ अर्थात, ‘मरण्याचे मूर्ख प्रकार’. गाण्याचे शब्द होते खुद्द मेसकॅलचे. या गाण्याच्या व्हिडीओमध्ये छोटी छोटी गोंडस कार्टून पात्रं स्वतःला संपवताना दिसतात. या गाण्यातील शब्दानुसार स्वतःचा शेवट करण्याचे काही उपाय पुढीलप्रमाणे ः जंगलात अक्राळ-विक्राळ अस्वलाची खोडी काढा, एक्सपायरी डेट उलटून गेलेली औषधं खा, अवकाशात आपलं हेल्मेट काढून टाका. काट्याने टोस्टरमधला टोस्ट काढा (टोस्टर ऑफ न करता), शिकारीला मुभा असलेल्या जंगलात हरणाचा वेश घालून जा, विषारी सापाला पाळा, ड्रायरमध्ये लपून बसा, आपल्या दोन्ही किडण्या इंटरनेटवर विकून पैसे कमवा, मधमाश्यांच्या पोळ्याला उगीचच हलवा, सुपर-ग्लू खा, इत्यादी. या काही गंमतीच्या तर काही खरोखर धोकादायक असलेल्या प्रकारांबरोबर ‘प्लॅटफॉर्मच्या कडेला उभे राहा’, ‘रेल्वे क्रॉसिंगला न जुमानता खुशाल गाडी चालवा’, ‘रूळ बिनधास्त ओलांडा’ इत्यादी प्रकार बेमालूमपणे गुंफण्यात आले. प्रेक्षकांचं गाण्याने आणि मजेशीर व्हिडीओमुळे मनोरंजन झालं, पण त्याचबरोबर रेल्वेबद्दलचे सावधानतेचे इशारेदेखील त्यांना दिले गेले.

‘डंब वेज’ प्रसिद्ध झाल्यानंतर अवघ्या दोन आठवड्यांत पाच कोटी रुपयांत मिळेल एवढी प्रसिद्धी त्याला इंटरनेटच्या माध्यमातून मिळाली. सुमारे सातशेवेळा ‘डंब वेज’बद्दल ब्लॉग्ज्वर लिहिलं गेलं. नोव्हेंबर २०११ ते डिसेंबर २०१२ या काळात घेतलेल्या एका सर्वेक्षणानुसार ‘डंब वेज’ला मिळालेल्या प्रसिद्धीमुळे अपघाताची शक्यता निर्माण करणार्या प्रसंगांच्या संख्येत ३० टक्के घट झाल्याचं ऑस्ट्रेलियन रेल्वेने कबूल केलं.

The Cat Empire ओली मॅकगिल हिने संगीतबद्ध केलेलं आणि एमिली लुबित्झ हिच्या आवाजातील गाणं आय ट्युन्सवर चोवीस तासात सर्वोच्च स्थानावर जाऊन पोहोचलं. यूट्यूबवर ही व्हायरल ठरलेली जाहिरात पहिल्या दोन आठवड्यांत सुमारे दोन कोटी ऐंशी लाख वेळा पाहण्यात आली आणि तिची सुमारे पंच्याऐंशी विडंबनं आतापर्यंत यूट्यूबवर दाखल झाली आहेत.

नुकताच या जाहिरातीला कान्स् समारोहात सर्वोच्च मानला जाणारा ग्रां प्री सन्मान पाचवेळा (पाच वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये) देण्यात आला.

डॅन वायडन आणि ली क्लाऊसारख्या जाहिरात उद्योगातील नावाजलेल्या व्यक्तिंनी ‘डंब वेज’ आपल्याला न सुचल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि जॉन मेसकॅलचं तोंडभरून कौतुक केलं आहे. एका कंटाळवाण्या समजल्या जाणार्या जाहिरात प्रकल्पाचा शेवट तरी मेसकॅलच्या कल्पकतेमुळे गोड झाला आहे असं म्हणणं योग्य ठरेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *