मलेरिया उच्चाटनासाठी महापालिकेतर्फे होणार्या उपाययोजनांसंबंधी आपण चर्चा केली. परंतु आपणही आपल्यापरिने यासाठी काय करू शकतो याची आता माहिती घेऊया…

मलेरिया पसरवणार्या डासांच्या अळ्या नष्ट करण्याकरता काय करू शकाल?

डास पाण्यात अंडी घालतात आणि त्यापासून पुन्हा डास तयार होण्यापर्यंत दहा दिवसांचा कालावधी लागतो. तेव्हा सर्वप्रथम ते पाण्यात वाढणार नाहीत याकरता साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न करा.

पावसाचं पाणी वळचणीला साठू देऊ नका. साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याकरता योग्य पद्धतीचा वापर करा. उदाहरणार्थ, अडचणीकरता पिंपात पाणी साठवून ठेवत असाल तर निदान दर रविवारी साठवलेलं पाणी कपडे/भांडी धुवायला वापरून टाका आणि नवीन पाण्याने पिंप भरा अथवा रिकामी बादली/भांडी उपडी वाळत घाला. अनेकदा बाथरूममध्ये कोपर्यात असलेल्या एखाद्या टब/बादलीकडे लक्ष न जाऊन तिथेच डासांच्या अळ्यांना जागा मिळते. मनीप्लँट/बांबू शूटस् पाण्यात वाढवली आणि त्यातलं पाणी बदललं गेलं नाही तर तीही घराची शोभा वाढवताना अनारोग्यास कारणीभूत ठरू शकतात.

गावात, घरगल्ल्यांमध्ये साठलेल्या डबक्यांना चर किंवा मार्ग काढून त्यांचा निचरा करायला हवा. साध्या कुदळ, फावडं आणि झाडू इतक्याने हे काम होऊ शकतं. भुसभुशीत मातीत जेव्हा पाण्याचं डबकं तयार होतं तेव्हा त्याला वाट काढून त्याचा निचरा केला तर डासांच्या अळ्या वाढू शकत नाहीत.

जर खड्डे असतील तर ते आजूबाजूच्या मातीने, खड्ड्यांनी भरले तरी पुरे आणि ज्या कामाकरता रस्ता खणला गेला त्या Local Agency ने इतकी स्वतःची जबाबदारी स्वीकारून काम केल्यास खड्ड्यांचं प्रमाणच दिवसागणिक कमी होईल.

अळ्या मारण्याकरता विविध औषधं उपलब्ध आहेत. ती महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसात संपर्क साधल्यास फवारणीकरता उपलब्ध करून दिली जातात. काही तेलांच्या वासानेदेखील डास पळतात. त्यात Citronella चा नंबर वरचा लागतो. निलगिरीच्या झाडांची लागवडही गावांमध्ये पाणी शोषण्याकरता उपयुक्त ठरते परंतु डासांची उत्पत्ती होण्याआधीच स्वच्छता राखून आपला परिसर मलेरियामुक्त करण्यासाठीची सूत्री ः

१. आपल्या परिसरातल्या मलेरिया ब्रीडिंगच्या जागा शोधा. त्या कुठे आणि कशा पसरल्या आहेत ते मोजून घ्या. एका छोट्या बाटलीत साचलेलं पाणी भरून आपण त्याची तपासणी मलेरियाच्या अळ्यांकरता करून घेऊ शकता.

२. किती जागा आहेत यावरून साधारण किती लोक कामाला लागतील याचा अंदाज घ्या.

३. अवजारांमध्ये कुदळ, फावडं, विळा इत्यादी उपयुक्त ठरतात.

४. कामाचा आराखडा तयार करा (वेळापत्रक).

५. काय करायला हवं याचा अॅक्शन प्लॅन. – खड्डे भरणं, बुजवणं, चर काढणं (Drainage) नालेसफाई, पाण्यातील शेवाळ वनस्पती स्वच्छ करणं (पाण्यातील वनस्पती अळ्यांना लपायला जागा देतात.)

६. आपल्या वॉर्डातील अधिकार्याकडून औषध फवारणीकरता आणि पाण्याचे नमुने तपासण्याकरता माहिती आणि मदत.

कॉलेज आणि शाळांकरता हा एक महत्त्वाचा आरोग्यदायी अॅक्शन रिसर्च ठरू  शकतो. आणि हो, आपण केलेल्या कामाच्या माहितीचा रेकॉर्ड ठेवून  ‘कलमनामा’ला कळवायला विसरू  नका.

घेऊया ध्यास २०२० पर्यंत मलेरियामुक्तिचा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *