‘चार दिवसांपूर्वीपर्यंत शेतीची काम करत होते, डॉक्टर. कधी काही आजार नव्हता. एकदम अचानक इतकी कशी तब्बेत बिघडली त्यांची?’ एक बाई आपल्या पतीच्या आजाराबद्दल विचारत होत्या. ताप, कावीळ आणि निकामी झालेल्या किडनी, थोडक्यात ज्याला weil’s disease म्हणतात तो आजार होता. आमच्याकडे खात्रीलायक रक्तचाचण्यांचे रिपोर्ट हातात असल्याने आम्ही कारण सांगू शकत होतो पण Leptospirosis (लेप्टेस्पायरोसीस) या आजाराचे औषधोपचार आणि खासकरून उशिरा आलेल्या रुग्णांवर उपचार करताना मनात आलं की आपल्या सर्वांनाच त्याबद्दलची माहिती असली तर कदाचित या आजाराचं प्रमाण निश्चित कमी होईल.

महाराष्ट्रात २००५ सालापासून लेप्टेस्पायरोसीस जास्त दिसून आला आहे. जुलै २००५ मध्ये मुंबईत आलेल्या पुरानंतर याचं प्रमाण वाढलं आहे. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यातून मुख्यत्वे हे जंतू पायावरील जखमेवाटे शरीरात प्रवेश करतात. परंतु नाकावाटे आणि तोंडावाटेही हा प्रसार संभवतो.

उंदीर आणि घुशी तसंच डुक्कर, कुत्रे आणि शेळ्या-मेंढ्या हे लेप्टेस्पायरोसीस पसरवू शकतात. त्यांच्या लघवीतून लेप्टेस्पायरोसीसचे जंतू साचलेल्या पाण्यात जिवंत राहू शकतात आणि या साचलेल्या पाण्याशी संपर्क आल्याने कातडीमधून ते शरीरात शिरकाव करतात. त्याखेरीज खाटीकखान्यात काम करणार्यांना इन्फेक्शन असलेल्या प्राण्यांशी संपर्क आल्याने तसंच सफाई कामगारांचा दूषित पाण्याशी संपर्क आल्याने तर शेतकर्यांमध्ये भात शेतीसारखी शेती करताना जिथे चिखलाशी संपर्क येतो आणि त्यात तिथे उंदीर-घुशींचा प्रादुर्भाव असेल तर हा आजार होऊ शकतो. साधारणतः ४ ते १० दिवसांत अंगदुखी, ताप अशी लक्षणं दिसायला लागतात. त्यामध्ये ताप आल्यास तो एक दिवसही अंगावर न काढता ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घेतल्यास लेप्टेस्पायरोसीसच्या जंतुंवर प्रभावी प्रतिजैविकं (Antibiotics) वापरून पुढचा त्रास टाळता येतो. Amoxicillin, Penicillin आणि Doxycycline ही प्रतिजैविकं त्यावर उपयुक्त ठरतात. मात्र ती डॉक्टरी सल्ल्यानुसारच घ्यायला हवीत.

३० ते ५० टक्के रुग्ण हे व्यवसायजन्य तसंच प्राण्यांच्या आणि दूषित पाण्याच्या संपर्कात आल्याने आजारी पडतात. यासाठी प्रामुख्याने पाळीव प्राण्यांचं लसीकरण हा एक महत्त्वाचा प्रतिबंधात्मक उपाय ठरतो.

विशेषतः बाहेर जाताना पायाला जखम असेल तर ती निर्जंतुक करून त्यावर पुन्हा पाणी जाणार नाही अशी मलमपट्टी करावी आणि निदान पावसाळ्यात तरी हात आणि पाय बाहेरून आल्यानंतर स्वच्छ धुवावेत. डबक्यातील, पूलमधील आणि तळ्यातील पाण्यात कित्येक दिवस Leptospira चे जंतू जिवंत राहू शकतात. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय आणि ताप आल्यास लगेच निदान करून घेणं अतिशय महत्त्वाचं ठरतं. जंतुसंसर्ग झाल्यानंतर साधारण ४ ते १० दिवस Incubation Period असतो आणि त्यामुळे औषधयोजना जितक्या लवकर होईल तितका धोका कमी होतो. तेव्हा लेप्टोस्पायरांचा त्रास टाळण्यासाठी पावसाळ्यात अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *